संतप्त वारकरी संप्रदायाची महाविकास आघाडी समवेत रहाणार नसल्याची भूमिका !

महाविकास आघाडीचे उमेदवार अजित गव्हाणे यांनी संतपिठाच्या संचालकांचा इतिहास, पात्रता तपासण्याचे केलेले विधान

प्रतिकात्मक चित्र

पिंपरी (जिल्हा पुणे) – जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठ पिंपरी-चिंचवडमधील ऐतिहासिक टाळगाव चिखलीत उभारण्यात आले आहे. संतपिठावरील संचालकांच्या पात्रतेवर महाविकास आघाडीचे उमेदवार अजित गव्हाणे यांनी जाहीर सभेत प्रश्नचिन्ह निर्माण केले. त्यावर आता ‘तुका म्हणे ऐशा नरा… मोजुनी माराव्या पैजारा..’ अशा संतप्त प्रतिक्रिया वारकरी संप्रदायातून उमटू लागल्या आहेत. महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी थेट लढत पिंपरी-चिंचवडमध्ये चालू आहे. पिंपरी, चिंचवड आणि भोसरी अशा तिन्ही जागांवर महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून उमेदवार रिंगणात उतरले आहेत. भोसरीतून अजित गव्हाणे, पिंपरीतून सुलक्षणा शिलवंत आणि चिंचवडमध्ये राहुल कलाटे निवडणुकीच्या ‘तुतारी’च्या चिन्हावर रिंगणात आहेत.

अजित गव्हाणे काय म्हणाले ?

भोसरीतील एका सभेमध्ये अजित गव्हाणे यांनी विद्यमान आमदार आणि महायुतीचे उमदेवार महेश लांडगे यांना संतपिठाच्या सूत्रावरून लक्ष्य केले आहे. ‘संतपिठावर ज्यांना संचालक केले आहे, त्यांचा इतिहास तपासा, त्यांची पात्रता तुमच्या लक्षात येईल’, असा गंभीर आरोप गव्हाणे यांनी केला आहे. विशेष म्हणजे संतपिठावर महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती महामंडळाचे अध्यक्ष आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे वंशज, संतसाहित्याचे गाढे अभ्यासक प्रा. डॉ. सदानंद मोरे (देहुकर), आळंदी देवस्थान ट्रस्टचे माजी सदस्य, शिक्षणक्षेत्रातील तज्ञ आणि संपादक, लेखक, अर्थतज्ञ असा लौकीक असलेले डॉ. अभय टिळक यांचा संतपिठाच्या संचालक मंडळामध्ये समावेश आहे. त्यामुळे अजित गव्हाणे आता तुकोबारायांचे वंशज, आय.ए.एस्. दर्जाच्या अधिकार्‍यांचे ‘कॅलिबर’ म्हणजे पात्रता पडताळणार आहेत का ? असा संतप्त प्रश्न उपस्थित केला जात आहे.

जो पक्ष आणि त्यांचा नेता राम, कृष्णाला मानत नाही त्यांना ‘रामकृष्ण हरि’ म्हणण्याचा नैतिक अधिकार नाही ! – ह.भ.प. दत्ताआबा गायकवाड

दिघी येथील भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये दिघीतील ज्येष्ठ नेते आणि वारकरी संप्रदायाचे ह.भ.प. दत्ताआबा गायकवाड यांनी दिघीच्या विकासाच्या सूत्रावर राष्ट्रवादी शरद पवार पक्षावर प्रहार करतांनाच जो पक्ष आणि त्यांचा नेता राम, कृष्ण यांना, देवतांना मानत नाही, आमच्या स्वामी समर्थांचा, आमच्या गजानन महाराजांचा अवमान केला जातो, त्यांना ‘रामकृष्ण हरि’ म्हणण्याचा नैतिक अधिकार नाही, असे खडे बोल जाहीर सभेत सुनावले. वारकरी संप्रदाय कदापि महाविकास आघाडीसोबत रहाणार नाही, अशी प्रतिक्रिया दत्ताआबा गायकवाड यांनी दिली.