निसर्गोपचारतज्ञ दीपक जोशी यांच्याकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साधकांना बिंदूदाबनाविषयी शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

डॉ. दीपक जोशी

सिंधुदुर्ग जिल्ह्यात १ ते ३ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत बिंदूदाबन शिबिर झाले. या वेळी निसर्गोपचारतज्ञ दीपक जोशी यांनी शिबिरार्थींना प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन केले. त्या वेळी साधकांना शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

सौ. पल्लवी पेडणेकर, सावंतवाडी.

१. वेळेचे पालन करणे : ‘निसर्गोपचारतज्ञ दीपक जोशी बिंदूदाबनाविषयी मार्गदर्शन करतांना आणि प्रात्यक्षिक दाखवतांना समयमर्यादेचे पालन करण्याकडे ते कटाक्षाने लक्ष देत होते.

२. सोप्या पद्धतीने शिकवणे : ते आम्हाला सोप्या भाषेत शिकवत होते. ते ‘प्रत्येक साधकाला सूत्र समजले आहे का ? साधक नीट लिहून घेत आहेत का ?’, याची निश्चिती करत होते.

३. प्रेमभाव : ते बिंदूदाबन शिबिरात आम्हा सर्व साधकांना सर्व उपाय पुष्कळ प्रेमाने शिकवत होते. काही समजले नाही, तर पुनःपुन्हा सांगत होते.

४. कृतज्ञताभाव : त्यांचा गुरुदेवांप्रती पुष्कळ कृतज्ञताभाव आहे. प्रत्येक सूत्र सांगताना गुरुदेवांप्रती त्यांचा भाव जागृत होत होता. ते पाहून आम्हा सर्व साधकांचाही भाव जागृत होत होता.

५. बिंदूदाबन शिबिराला येण्यापूर्वी साधिकेला होणारे त्रास निसर्गोपचारतज्ञ दीपक जोशी यांनी बिंदूदाबनाचे उपचार केल्यावर नष्ट होणे : ‘मी बिंदूदाबन शिबिराला येण्याच्या आदल्या दिवशी मला डोकेदुखी, अंगदुखी आणि अस्वस्थता वाटत होती. मी शिबिराला आल्यावर निसर्गोपचारतज्ञ दीपक जोशी यांनी माझ्यावर बिंदूदाबानाचे उपचार केल्यानंतर माझे सर्व त्रास दूर झाले. एरव्ही मला पुष्कळ शारीरिक आणि मानसिक त्रास होतात; मात्र या वेळी गुरुदेवांच्या कृपेने सर्व त्रास दूर झाले आणि मला शिबिरातील आनंद घेता आला. शिबिराच्या ३ दिवसांत ‘मी वेगळ्या जगात आहे’, असे मला वाटत होते.’

श्री. वीरेश माईणकर, शिरोडा

१. ‘निसर्गोपचारतज्ञ दीपक जोशी यांची गुरुदेवांवर अपार श्रद्धा आणि भाव आहे. ते स्वतः नेहमी आनंदी असतात आणि इतरांनाही आनंदी ठेवतात.’

सौ. अनुश्री गावस्कर,  वेंगुर्ला

१. शिबिरात सहभागी झाल्यावर मन सकारात्मक होणे : ‘मी शिबिराला येतांना माझ्या मनामध्ये नकारात्मक विचार होते; पण शिबिराच्या ३ दिवसांत मन सकारात्मक आणि आनंदी झाले.

२. ‘परिपूर्ण कृती कशी करावी ?’, हे शिकता येणे : निसर्गोपचारतज्ञ दीपक जोशी यांनी ‘प्रत्येक कृती परिपूर्ण कशी करावी ?’ याविषयी शिकवले, उदा. तेलाची बुधली हाताळणे, रुग्णांना झोपण्यासाठीच्या ‘फ्लेक्स’ची घडी घालणे, कठीण विषय सोपे करून सांगणे इत्यादी.

३. गुरुदेवच व्याधींतून बरे करणार आहेत, असा भाव ठेवल्यावर शिबिरातील उपचारांमुळे व्यवस्थित चालता येणे : मला गुडघे आणि मणके दुखीचा आजार आहे. मी बरेच औषधोपचार केले आहेत; पण त्रास दूर झाले नव्हते. मी शिबिराला जाण्यापूर्वी माझ्या मनात भीती होती, तरीही मी शिबिराला गेले. ‘निसर्गोपचारतज्ञ दीपक जोशी यांच्या माध्यमातून गुरुदेवच मला व्याधींतून बाहेर काढणार आहेत’, असा मी भाव ठेवला. ते उपचार करत असतांना मी सूक्ष्मातून गुरुदेवांचे चरण पकडून धावा केला. उपचारानंतर गुरुकृपेने मी दोन्ही पायांनी नीट चालू शकले आणि पायर्‍याही चढू शकले.’

(सर्व सूत्रांचा दिनांक ९.२.२०२४)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक