आमदारांनी एकमेकांची कॉलर पकडून केली धक्काबुक्की !
श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – जम्मू-काश्मीरच्या विधानसभेत कलम ३७० पुन्हा स्थापित करणारा प्रस्ताव ६ नोव्हेंबर या दिवशी प्रचंड गदारोळात संमत करण्यात आल्यानंतर ७ नोव्हेंबरला सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांच्या आमदारांमध्ये हाणामारी झाली. सभागृहात गदारोळ झाल्यानंतर अध्यक्षांनी विधानसभेचे कामकाज २० मिनिटांसाठी स्थगित केले.
आमदार खुर्शीद अहमद शेख यांनी कलम ३७० लागू करण्याचा फलक सभागृहात फडकवला. यावर लिहिले होते, ‘आम्हाला कलम ३७० आणि ‘३५ अ’ पुनर्स्थापित करायचे आहे अन् सर्व राजकीय बंदीवानांची सुटका हवी आहे.’ या फलकाला भाजप आमदार आणि विरोधी पक्षनेते सुनील शर्मा यांनी विरोध केला. या वेळी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी चालू झाली. शर्मा यांनी शेख यांच्याकडे जाऊन त्यांच्या हातातील फलक हिसकावून घेतला. या वेळी शेख यांच्या समर्थनार्थ सज्जाद लोन आणि वाहिद पारा अन् नॅशनल कॉन्फरन्सचे काही आमदार भाजप आमदारांशी भिडले. हा फलक फाडण्यासाठी संघर्ष झाला. दोन्ही बाजूंच्या आमदारांनी एकमेकांची कॉलर पकडून फलक हिसकावून घेण्यास चालू केले. गदारोळ वाढत असल्याचे पाहून मध्यस्थी करणार्या सुरक्षारक्षकांनी भाजप आमदारांना सभागृहाबाहेर हाकलून दिले.
फलक फडकवणारे आमदार खुर्शीद अहमद शेख बारामुल्लाचे लोकसभेचे खासदार इंजिनिअर रशीद यांचे भाऊ आहेत. रशीद यांना वर्ष २०१६ मध्ये आतंकवाद्यांना अर्थपुरवठा केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. ते वर्ष २०१९ पासून तिहार तुरुंगात बंद होते. विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांना जामीन संमत करण्यात आला.
संपादकीय भूमिकाजम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेच्या निवडणुका घेण्यात आल्यानंतरही तेथील मुसलमानांनी निवडून दिलेले आमदार देशद्रोही मानसिकतेतूनच वागत आहेत, हेच या घटनेतून उघड झाले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने ही विधानसभा विसर्जित करून पुन्हा तेथे राष्ट्रपती राजवट लावणेच योग्य ठरणार आहे. आज नाही, तर उद्या ते करावेच लागणार आहे ! |