मुंबई, १ नोव्हेंबर (वार्ता.) – अरेरावी, भाडे नाकारणे, तसेच गैरवर्तन यांविषयी टॅक्सी आणि रिक्शा चालकांच्या विरोधातील वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन प्रादेशिक परिवहन विभागाने (आर्.टी.ओ.ने) तक्रार करण्यासाठी ऑनलाईन क्रमांक प्रसारित केले आहेत. या क्रमांकवर नागरिकांना ‘व्हॉट्सअॅप’ संदेश पाठवून तक्रार करता येणार आहे.
टॅक्सी आणि रिक्शा यांविरोधात तक्रार करण्यासाठी !
तक्रार करण्यासाठी असलेले ‘हेल्पलाईन क्रमांक’ प्रत्येक टॅक्सी आणि रिक्शा यांमध्ये दर्शनी भागात लावण्याची सूचनाही प्रादेशिक परिवहन कार्यालयातून देण्यात आली आहे; मात्र अद्याप अनेक रिक्शा आणि टॅक्सी चालक यांनी ‘हेल्पलाईन क्रमांक’ लावलेला नाही.
नागरिकांना संबंधित प्रादेशिक परिवहन कार्यालयांच्या वरील हेल्पलाईन क्रमांकावर तक्रार नोंदवता येणार आहे. तक्रार खोटी असल्यास मात्र तक्रार करणार्यांच्या विरोधात मोटर वाहन कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्याचे प्रावधान आहे.
‘व्हॉट्सअॅप’ क्रमांकावर तक्रार प्राप्त झाल्यावर तक्रारीचे स्वरूप समजून घेतले जाते. तक्रारदाराचे नाव, पत्ता आणि संबंधित टॅक्सीचे छायाचित्र मागितले जाते. तक्रारीच्या स्वरूपानुसार चालकाला कारणे दाखवा नोटीस पाठवली जाते किंवा अधिकार्यांकडून समुपदेशन केले जाते. चालकाची बाजू समजून घेतल्यानंतर चालक दोषी आढळल्यास तक्रारीच्या स्वरूपानुसार दंडात्मक कारवाई केली जाते. एखाद्या चालकाविषयी वारंवार तक्रार येत असेल, तर त्याची प्रत्यक्ष भेट घेऊन त्याचे समुपदेशन करण्यात येते.