‘माझिया मराठीचे नगरी…’

मराठी भाषेला ‘अभिजात (समृद्ध) दर्जा’ मिळाल्याच्या निमित्ताने…!

१० ऑक्टोबर या दिवशी शासकीय वाहिनी ‘डीडी मराठी’वर ‘सखी सह्याद्री’ या कार्यक्रमामध्ये भाषेच्या अभ्यासिका, लेखिका आणि मराठी भाषेसाठी मंत्रालय स्तरावर दायित्व सांभाळणार्‍या डॉ. (सौ.) मंजुषा कुलकर्णी आणि मुंबईतील रूपारेल महाविद्यालयातील मराठीच्या प्राध्यापिका डॉ. अनघा मांडवकर यांची मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीतील दोन्ही तज्ञांनी मराठी भाषेच्या अभिजात दर्जाविषयी आणि संवर्धनाच्या दृष्टीने काही उपयुक्त अन् उत्साहवर्धक सूत्रे सांगितली. ती वाचकांना कळावीत, यासाठी या मुलाखतीचे स्वैर शब्दांकन येथे देत आहोत. या वेळी त्यांना काही मराठीप्रेमींनी ‘ऑनलाईन’ वैशिष्ट्यपूर्ण प्रश्नही विचारले. त्याचीही त्यांनी उत्तरे दिली. निवेदिका चैताली कानिटकर यांनी ही मुलाखत घेतली.

(भाग १)

… अन्यथा तो केवळ मिरवणारा मुकुट राहील !

प्रा. डॉ. मांडवकर

प्रा. डॉ. मांडवकर – मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यावर त्याचे लाभ करून घेण्यासाठी निश्चित अशी पावले उचलावी लागतील. काही ठोस प्रकल्पांचे प्रस्ताव द्यावे लागतील. त्यासाठी यंत्रणा उभ्या कराव्या लागतील. समित्या नेमाव्या लागतील. तमिळ भाषा वगळता अन्य कुठल्याही अभिजात भाषेला शासनाकडून निधी मिळालेला नाही. त्यांना १५ कोटींचा निधी मिळाला; कारण त्यांनी भाषेच्या संवर्धनाच्या कार्यासाठी तशा यंत्रणा उभ्या केल्या. भाषेचे जतन, अर्वाचिनीकरण, बोली भाषांचे संवर्धन आदी कार्यांसाठी संस्थात्मक यंत्रणा उभी केली. मराठीच्या संदर्भातही तसे काही करावे लागेल; अन्यथा ‘अभिजात भाषा’ म्हणून तो केवळ एक मिरवण्याचा मुकुट राहील !

प्रसारमाध्यमांत प्रमाण मराठी वापरली जाण्यासाठी कायदे हवेत !

श्री. रूपेश रेडकर

या कार्यक्रमात देवद, पनवेल येथील श्री. रूपेश रेडकर यांनी पुढील ‘ऑनलाईन’ प्रश्न विचारला, ‘‘नियतकालिके, दूरचित्रवाहिन्या आदी प्रसारमाध्यमांमध्ये प्रमाण मराठी भाषा वापरली जात नाही; उदा. बर्‍याच वेळा ‘राडा’ यांसारखे शब्द वापरले जातात. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यावर अशा प्रसारमाध्यमांवर काही नियंत्रण येणार आहे का ? किंवा त्यांच्यावर काही कायदेशीर कारवाई करू शकता येणार आहे का ?’’ या वेळी डॉ. (सौ.) मंजुषा कुलकर्णी आणि प्रा. डॉ. मांडवकर यांनी श्री. रूपेश रेडकर यांचे पुष्कळ कौतुक केले अन् त्यांच्या प्रश्नाचे उत्तर दिले.

डॉ. (सौ.) मंजुषा कुलकर्णी – तुमचा प्रश्न पुष्कळ चांगला आहे. मराठीचा मुख्य प्रसार हा प्रसारमाध्यमांतूनच होत असतो. त्यामुळे तीच प्रमाण मराठी आहे, असे होते. मराठी भाषा प्रसारमाध्यमांमध्येही योग्य पद्धतीने बोलली जावी, प्रमाण मराठी बोलली जावी, यासाठी काही कायदे हवेत. आपल्याला वैयक्तिक स्तरावरही यासाठी प्रयत्न करावे लागतील.

संकलक – सौ. रूपाली वर्तक

डॉ. (सौ.) मंजुषा कुलकर्णी

१. अभिजात शब्दाचा अर्थ !

डॉ. (सौ.) मंजुषा कुलकर्णी – ‘जन जा’ या संस्कृत धातूपासून ‘जात’ शब्द सिद्ध झाला. त्याचा अर्थ जन्मलेला. निर्माण झालेला. ‘अभितः जाता इति अभिजाता ।’ समग्र, सर्वांगीण बाजूंनी जी समृद्ध अशी निर्माण झालेली आहे, ती अभिजात भाषा असते. तिच्यात प्राचीनता, श्रेष्ठत्व, निरंतरता असते, जी स्वयंभू असते, स्वतःच्या सामर्थ्याने जी पुढे येते, घरंदाज, कुलीन असते. या सगळ्यांचे मिश्रण, म्हणजे ‘अभिजात’ हा शब्द आहे.

२. मराठी ही ‘धर्मज्ञान’ देणारी भाषा !

सौ. रूपाली वर्तक

प्रा. डॉ. अनघा मांडवकर – मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळत असतांना ज्यांचे यात अमूल्य योगदान आहे, त्यांची आपण आठवण काढायला हवी; कारण ही आपली संस्कृती आहे. ‘भाष’ या संस्कृत धातूपासून मराठीत ‘भाषा’ हा शब्द आला आहे. ‘भाष्य’ म्हणजे बोलणे. बोलली जाते ती भाषा. व्यवहारामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये ज्यांनी मराठी भाषेला टिकवून धरले, तिचा वापर वाढेल, विकास होईल, हे पाहिले, त्या सर्वांमुळेच आज मराठीचा गौरव होत आहे. हा शतकांपासूनचा इतिहास आहे. भक्तीसंप्रदायापासून याचा आरंभ आहे. ‘संस्कृत ही गीर्वाणवाणी, देवांची भाषा; मग मराठी (प्राकृत) चोरांपासून आली का ?’, असा प्रश्न संत एकनाथांनी विचारला. ‘माझी मराठी अमृताशीही पैजा जिंकू शकते’, असे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी ठामपणे सांगितले. महानुभाव संप्रदायाच्या चक्रधरस्वामींनीही मराठी रचना करण्याचा आग्रह धरला. या सर्वांमुळे ‘धर्मज्ञान’ हे मराठीतून मांडले जाऊ शकते, हे लक्षात आले. धर्मज्ञानाची शक्ती मराठीच्या पाठी उभी राहिली !

३. संदर्भ साधने बनवून मराठीला ‘ज्ञानभाषा’ करणार्‍यांचे महत्त्व अनन्यसाधारण !

प्रा. डॉ. अनघा मांडवकर – अत्यंत धामधुमीच्या युद्धकाळातही त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी भाषेचा विचार करून ‘राज्यभाषा कोश’ सिद्ध करून घेतला. शब्दांच्या प्रमाणाविषयी आपण नेहमी बोलतो; पण त्यासाठी काय काय व्हायला हवे ? राज्यकर्ता जेव्हा भाषेच्या पाठीशी उभा रहातो, तेव्हा काय घडते ?, हे चित्र तिथे दिसते. अव्वल इंग्रजी काळातही आपल्या मराठी भाषेसाठी महाराष्ट्रात जन्मलेल्या लोकांप्रमाणेच महाराष्ट्राबाहेरील लोकांनीही पुष्कळ योगदान दिले. ते धर्माने, कर्माने मराठीच म्हणावे लागतील. थॉमस कँडी यांनी मराठीतील ‘विरामचिन्हांची परिभाषा’ पुस्तक लिहिले. मोल्सवर्थ यांनी मराठीसाठी शब्दकोश सिद्ध केला. कोश, सूची, संदर्भ साधने सिद्ध करणारे अनेक लोक झाले. मराठी केवळ घरी-दारी बोलली जाणारी भाषा रहाता कामा नये, तर ज्ञानभाषा व्हायला हवी. त्यासाठी संदर्भ-साधने सिद्ध करावी लागतात. कुठलीही अनुकुलता, साधने नसतांना त्यांनी हे केले. एकेका व्यक्तीने तिचे संपूर्ण आयुष्य त्यासाठी व्यय केले. शंकर गणेश दाते यांसारख्यांनी गावोगावी जाऊन, पुस्तकांचा शोध घेऊन पदरमोड करून (अल्प पैसे असतांना स्वतःचे पैसे व्यय करून) एकहाती, एकट्याने ग्रंथसूची, मराठी नियतकालिकांची सूची सिद्ध केली. वि.का. राजवाडे यांच्यापासून आप्पा प्रियोळकर यांच्यापर्यंत मराठीत भाषाविषयक संशोधकांची परंपरा राहिली. हे संशोधन करण्यासाठी त्यांनी ‘अस्सल’ साधने मिळवली. त्यामुळे आता हा ‘अभिजात दर्जा’ आपल्याला पहायला मिळाला आहे, त्या निकषांमध्ये शीलालेख, ताम्रपट आदी साधनांचा भाग आहे. यासाठी काम केलेले श.गो. तुळपुळे, वि.भी. कोलते आदी अनेक आहेत. मौखिककडून लिखितकडे आणि नंतर नवीन आलेले मुद्रण तंत्रज्ञान यासाठी अनेकांनी पुष्कळ परिश्रम घेतले. ‘निर्णयसागर’ मुद्रणालयापासून र.कृ. जोशी आणि आताचे ‘आयआयटी’मधील गिरीश दळवी यांच्यापर्यंत ज्यांनी मराठी ‘टंक’ घडवले अन् मुद्रणाच्या क्षेत्रात मराठी यावी यासाठी प्रयत्न केले. आता संगणक माहिती तंत्रज्ञान आले आहे. यात मराठी कशी विकसित होईल, हे प्रयत्न चालू आहेत. ‘युनिकोड’मध्ये मराठी येण्यासाठी र.कृ. जोशी यांनी प्रयत्न केले. मराठी ही सगळीकडे कशी वावरेल, विकसित होईल, यासाठी अनेकांनी परिश्रम घेतले. सगळी नावे येथे सांगू शकणार नाही. त्या सर्वांमुळेच ‘अभिजात मराठी’चा दर्जा मिळाल्याचा दिवस आपण पाहू शकलो.

४. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी अनेकांनी त्यांच्या ‘जीवनाचे स्वप्न’ असल्याप्रमाणे काम केले !

डॉ. (सौ.) मंजुषा कुलकर्णी – मराठीला अभिजात होण्याच्या प्रवासात स्वातंत्र्यवीर सावरकर यांना विसरून चालणार नाही. त्यांनी मराठी शब्द देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या कार्याला प्रणाम करायला हवा. मी वर्ष २०१५ ते २०१७ या काळात मराठी भाषा संचालनालयाची भाषा संचालक होते; परंतु महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून, म्हणजे वर्ष १९६० पासून आपण मराठी भाषेसाठी प्रयत्न करत आहोत. वर्ष २०१३ मध्ये मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी प्रयत्न चालू झाले. माझ्या काळातही आम्ही त्याचा पुष्कळ पाठपुरावा केला. अभिजात मराठीचा दर्जा मिळण्यासाठी एका शासनाने समितीची स्थापना केली होती. त्या समितीने अनेक वेळा केलेल्या पाठपुराव्यामुळे अखेर हा दर्जा मिळाला. मराठीच्या अभिजात दर्जासाठी लागणार्‍या सर्व अटींविषयीच्या पुराव्याची कागदपत्रांची पूर्तता झाली होती; परंतु त्यासमवेत ज्या अन्य काही भाषांनाही अभिजात दर्जा दिला जात आहे, त्याविषयीचे पुरावे गोळा करण्याचे काम चालू होते. त्यात तांत्रिक अडचणी होत्या. मराठी भाषेच्या अहवालात काही अडचणी, त्रुटी नव्हत्या. शासनस्तरावर प्रयत्न होत होते, तसे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी अनेक संस्था, तज्ञ व्यक्ती, अभ्यासक, लेखक, कवी यांनी त्यांच्या ‘जीवनाचे स्वप्न’ असल्याप्रमाणे काम केले.

५. आपण मराठी शब्दांना पारखे झालो आहोत !

डॉ. (सौ.) मंजुषा कुलकर्णी – ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी ‘राजव्यवहार कोश’ सिद्ध केला, व्यवहारात मराठी शब्द असावेत, यासाठी ते संस्कृतमधून सिद्ध करून घेतले. आताही शासनाच्या व्यवहारात १०० टक्के मराठीचा वापर व्हावा, यासाठी शासन आग्रही आहे. आताही लोक ‘शासकीय शब्द कळत नाहीत’, असे म्हणतात. (१६.१०.२०२४)

शासकीय मराठीतील शब्द काहींना अवघड वाटतात; पण हे लक्षात घेतले पाहिजे की, आपण सध्या मराठी शब्दांना ‘पारखे’ झालो आहोत; म्हणून ते आपल्याला कळत नाहीत, असे आपल्याला वाटते. आपणच आपल्या भाषेकडे पाठ फिरवत आहोत. आपण त्यांचा वापर चालू केला की, ते आपल्याला कळतील.

६. भाषेला अभिजात दर्जा मिळण्याचे निकष !

डॉ. (सौ.) मंजुषा कुलकर्णी – अभिजात म्हणजे स्वयंभू. मराठी भाषेची जननी म्हणजे मातृभाषा संस्कृत असली, तरी तिला आता अभिजात म्हणून दर्जा मिळाला आहे. अभिजात दर्जा मिळण्यासाठी न्यूनतम साडेतीन सहस्र वर्षे प्राचीन हवी. त्या वेळी तिचे जुने रूप असणार. तो धागा आज वापरल्या जाणार्‍या भाषेत असणे आवश्यक असते. ती सांगड घालून तो धागा आपल्याला दाखवता आला पाहिजे. दुसरे म्हणजे त्या काळापासून आजपर्यंत तिच्यात निरंतर साहित्यनिर्मिती होत असलेली हवी. तिसरे म्हणजे ते साहित्य मौलिक, अन्य भाषांवर प्रभाव टाकणारे, तसेच आध्यात्मिक स्तरावर प्रभाव टाकणारे हवे.

७. अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने होणारे लाभ !

डॉ. (सौ.) मंजुषा कुलकर्णी – अभिजात दर्जा मिळाल्यामुळे भाषेसाठी केंद्राकडून निधी मिळतो. तज्ञांचे मार्गदर्शन मिळते. भाषेच्या संवर्धनासाठी नव्या वाटा उपलब्ध होतात. केंद्रशासनाकडून भाषेतील विद्वानांना राष्ट्रीय पुरस्कार मिळतात. बोली भाषांचे संवर्धन, जतन, प्रयत्न यांसाठी केंद्रशासनाकडून साहाय्य मिळते. भाषेतील प्राचीन ग्रंथांचे भाषांतर करणे शक्य होते. जगातील भाषांत त्यांचे भाषांतर करणे शक्य होते. आज देशातील ग्रंथालयांमध्ये २५ टक्क्यांहून अधिक ग्रंथालये (१२ सहस्र ग्रंथालये) महाराष्ट्रात आहेत. ही ग्रंथालये सशक्त करण्यासाठी लाभ होतो. एकूणच भाषेच्या उत्कर्षाला हातभार लागण्यास साहाय्य होते. असे अनेक लाभ होतात. भाषिक चळवळींना वेग देण्यास संधी मिळते. मराठी भाषेला अनुदानाच्या रूपातून साहाय्य झाले, तर त्यातील विचारवैभव प्रसारित करण्यास साहाय्य होईल. (१६.१०.२०२४)

(क्रमश: पुढच्या रविवारी)

संकलक : सौ. रूपाली वर्तक, सनातन आश्रम, देवद, पनवेल.