मराठी भाषेला ‘अभिजात (समृद्ध) दर्जा’ मिळाल्याच्या निमित्ताने…!
१० ऑक्टोबर या दिवशी शासकीय वाहिनी ‘डीडी मराठी’वर ‘सखी सह्याद्री’ या कार्यक्रमामध्ये भाषेच्या अभ्यासिका, लेखिका डॉ. (सौ.) मंजुषा कुलकर्णी आणि मुंबईतील रूपारेल महाविद्यालयातील मराठीच्या प्राध्यापिका डॉ. अनघा मांडवकर यांची मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीतील दोन्ही तज्ञांनी मराठी भाषेच्या अभिजात दर्जाविषयी आणि संवर्धनाच्या दृष्टीने काही उपयुक्त अन् उत्साहवर्धक सूत्रे सांगितली. ती वाचकांना कळावीत, यासाठी या मुलाखतीचे स्वैर शब्दांकन येथे देत आहोत. या वेळी त्यांना काही मराठीप्रेमींनी ‘ऑनलाईन’ वैशिष्ट्यपूर्ण प्रश्नही विचारले. त्याचीही त्यांनी उत्तरे दिली. निवेदिका चैताली कानिटकर यांनी ही मुलाखत घेतली. २० ऑक्टोबर या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण मराठी भाषेच्या संदर्भातील विविध तज्ञांचे योगदान, मराठी माणसांनी मराठी शब्दांना पारखे होणे आदी सूत्रे पाहिली. या भागात पुढील सूत्रे पाहू.
(भाग २)
मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/846128.html
भ्रमणभाषमध्ये देवनागरीत लिहून त्याद्वारेच भाषेचे चलनवलन केले पाहिजे !
डॉ. (सौ.) मंजुषा कुलकर्णी यांनी सध्या मराठीमध्ये झालेल्या मिश्र भाषेची काही उदाहरणे !
१. आपण म्हणतो, माझा ‘नंबर’ ‘सेव्ह’ केलास का ? ‘संरक्षित केला का ?’, असे म्हणत नाही.
२. ‘भ्रमणभाषवर एक ‘हाय’ टाक’, असे म्हटले जाते. ‘हाय’ शब्द कशाला वापरायचा ? मराठी माणूस ‘हाय’ देतही नाही आणि ‘हाय’ घेतही नाही ! (‘हाय लागणे’ असा शब्दप्रयोग वेगळ्या अर्थाने वापरला जातो. – संकलक) ‘नमस्कार’ म्हणा, ‘रामराम’ म्हणा. काहीतरी मराठी शब्द वापरा.
आपण भ्रमणभाषमध्ये इंग्रजी लिपीतून संदेश लिहितो, तर आपली देवनागरी कधी प्रसारित होणार ? आपण देवनागरीतून लिहिले पाहिजे आणि देवनागरीतून संदेशांचे चलनवलन केले पाहिजे.- सौ. रूपाली वर्तक
मुंबईकरांनी घराबाहेर पडल्यावरही मराठीतच बोलायला हवे !
डॉ. (सौ.) मंजुषा कुलकर्णी म्हणाल्या, ‘‘भाषेचे संस्कार मनातून व्हायला हवेत. मुंबईकरांना तर बाहेर पडल्यावर वाटते की, मी एकटाच मराठी आहे, बाकी सगळे हिंदी भाषिक आहेत आणि मनानेच तो हिंदी बोलायला आरंभ करतो. इथपासून मराठी बोलायला हवी. तिचा स्वीकार केला पाहिजे. ती वाचता आली पाहिजे.’’ – सौ. रूपाली वर्तक
८. ‘आयआयटी’मध्ये मराठी मुद्रणचिन्हांविषयी काम होत आहे !
प्रा. (डॉ.) अनघा मांडवकर – अभ्यासकाने कोणत्या अभ्यासविषयात काम करायचे ? ते ठरवून मुंबई किंवा पुणे विद्यापीठ यांमध्ये प्रवेश घेऊ शकतात, अन्यही विद्यापिठे आहेत. भाषाविषयक अभ्यास करण्याचे त्यांचे विशेष क्षेत्र वेगळे आहे; पण त्याही पलीकडे जाऊन ‘आयआयटी’सारख्या संस्थेत सायली थारळी ही विद्यार्थिनी डॉ. गिरीश दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘विरामचिन्हे’ या विषयावर काम करत आहेत. मुद्रणविद्या आणि भाषालिपी यांच्या सीमारेषेवर येऊन हे काम करत आहेत. अशा प्रकारे पारंपरिक क्षेत्रांचा अभ्यास करण्यासमवेतच जरा वेगळ्या वाटांकडेही पहायला हवे. आपल्या भाषा संवर्धनाचा परीघ विस्तारायला हवा. आता मराठीचे विद्यापीठही येऊ घातले आहे.
९. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने होणारे लाभ !
डॉ. (सौ.) मंजुषा कुलकर्णी – अभिजात दर्जा मिळाल्यामुळे भाषेसाठी केंद्राकडून निधी मिळतो. तज्ञांचे मार्गदर्शन मिळते. भाषेच्या संवर्धनासाठी नव्या वाटा उपलब्ध होतात. केंद्रशासनाकडून भाषेतील २ विद्वानांना राष्ट्रीय पुरस्कार मिळतात. बोली भाषांचे संवर्धन, जतन, प्रयत्न यांसाठी केंद्रशासनाकडून साहाय्य मिळते. भाषेतील प्राचीन ग्रंथांचे जगातील भाषांत भाषांतर करणे शक्य होते. अनुवादामुळे एका भाषेचे विचारवैभव दुसर्या भाषेत नेता येते. आज देशातील ग्रंथालयांमध्ये २५ टक्क्यांहून अधिक ग्रंथालये (१२ सहस्र ग्रंथालये) महाराष्ट्रात आहेत. ग्रंथालये सशक्त करण्यासाठी याचा लाभ होतो. एकूणच भाषेच्या उत्कर्षाला हातभार लागण्यास साहाय्य होते. भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याने विविध विद्यापिठांमध्ये मराठी भाषेविषयीचे संशोधन करणे सोपे जाऊ शकते. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे मराठी भाषेसाठी काम करणार्या संस्था आणि व्यक्ती यांना साहाय्य करणे शक्य होते. मराठीच्या भाषिक चळवळींना वेग मिळतो. असे अनेक लाभ होतात. भाषिक चळवळींना वेग देण्यास संधी मिळते. मराठी भाषेला अनुदानाच्या रूपातून साहाय्य झाले, तर त्यातील विचारवैभव प्रसारित करण्यास साहाय्य होईल.
१०. संस्थात्मक, रचनात्मक आणि नियोजन करून काम करायला हवे !
प्रा. (डॉ.) अनघा मांडवकर – लाभ हे करून घ्यावे लागतात. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी आपण १ तप प्रयत्न केले. आता इथे थांबता येणार नाही. भारत सरकारच्या ‘माध्यम माहिती केंद्रा’ने दिलेल्या माहितीनुसार केवळ तमिळ भाषा सातत्याने निधी मिळवू शकत आहे. तुम्हाला एकगठ्ठा, एकरकमी निधी कुणी देणार नाही. या उत्सवाच्या धुंदीतून बाहेर येऊन प्रत्यक्ष काम करायला आरंभ केला पाहिजे. आपल्याला ठोस प्रकल्पांचे प्रस्ताव मांडावे लागतील. वेगवेगळ्या संस्था उभ्या कराव्या लागतील. वेगवेगळ्या क्षेत्रांत काम करणार्या अभ्यासकांना हाताशी घेऊन समिती बनवून काही कार्य उभे करून काही ठोस ठरवावे लागेल. प्राचीन भाषेचे संवर्धन, जतन, अर्वाचिनीकरण, बोली भाषांचा अभ्यास यांचे प्रकल्प तमिळ भाषिकांनी निर्माण केले आणि संस्थात्मक यंत्रणा निर्माण केली आहे. आपल्याला जर याचा खरोखर लाभ करून घ्यायचा असेल, तर आपल्याला नियोजनपूर्वक ही कामे करावी लागतील.
११. मराठीचा अभिमान वाटला पाहिजे !
डॉ. (सौ.) मंजुषा कुलकर्णी – प्रसारमाध्यमांतूनच मराठीचा प्रसार होत आहे. ती प्रसारमाध्यमेच जर चुकीचे मराठी बोलू लागली, तर नव्या पिढीला तीच प्रमाण मराठी आहे, असे वाटते. भाषेचे उच्चारण, शब्दांवर आघात देण्याचे तंत्र जे आहे, ते योग्य असायला पाहिजे. असे प्रयत्न मी भाषा संचालनालयाची संचालक असतांनाही केले होते. मराठीत एका शब्दाला अनेक शब्द आहेत; परंतु आपण ते वापरत नाही. त्यासाठी दृष्टीकोन फार महत्त्वाचा असला पाहिजे. आपल्याला आपल्या भाषेचा अभिमान वाटला पाहिजे. आपल्याला आपली मराठी भाषा सोडून अन्य मराठी भाषांविषयी पुष्कळ कळवळा वाटू लागतो. अन्य भाषांचा दुस्वास करायचा नाही; परंतु आपण आपल्या आईला फाटक्या लुगड्यात ठेवायचे आणि शेजारणीला पैठणीमध्ये मिरवायला आपणच लावायचे, ही कोणती रित आहे ?
१२. सध्या आपण मराठी नव्हे, तर इंग्रजी आणि हिंदी अशी ‘मिश्र भाषा’ बोलतो !
डॉ. (सौ.) मंजुषा कुलकर्णी – प्रसारमाध्यमांप्रमाणे व्यक्तीशः प्रयत्न आपल्या कुटुंबापासून करायला हवेत. कुटुंबात मराठी चांगली बोलली गेली पाहिजे, चांगली ऐकायला मिळाली पाहिजे. कोणतीही भाषा चांगली ऐकली, तरच चांगली बोलता येते. आज आपण हिंदी, इंग्रजी, मराठी अशी काही तरी मिश्र भाषा बोलतो आणि त्या सगळ्या गोंधळात आपण मराठीचे शब्द विसरत आहोत. इतकी कोशसंपदा आहे, एवढे सगळे असतांना हा दृष्टीकोन पालटायला हवा. जोपर्यंत भाषेत चैतन्य येणार नाही, तोपर्यंत भाषेचे हे सगळे प्रकार होत रहाणार.
१३. केवळ ग्रंथालये नको, वाचनालये हवीत !
डॉ. (सौ.) मंजुषा कुलकर्णी –
‘वाचतो मज कोण येथे । घेईल का कुणी ही दीक्षा ।।
मज मनी वसते निरंतर । युगयुगांची ही प्रतीक्षा ।।’
आता ग्रंथालये पुष्कळ आहेत; मराठी भाषेच्या संवर्धनासाठी केवळ ग्रंथालये नकोत, तर वाचनालये हवीत. ग्रंथालये वाट पहात आहेत. आपण जात नाही. वाचत नाही. लेखन, वाचन, भाषण, संवाद हे सगळे मराठी भाषेतून झाला पाहिजेत. ‘मराठी बोलल्यामुळे माझा दर्जा खालावतो’ असे ज्यांना वाटते, त्यांच्यासाठी मी सांगीन की, इंग्रजी येत असली, तरीसुद्धा आपण मराठी आवर्जून बोलली पाहिजे. ‘इंडो-युरोपीय’ भाषा कुळातील या भाषेला अतिशय प्राचीन वारसा आहे. दुधावरच्या सायीप्रमाणे मराठीतील साहित्य आहे. ते अतिशय गोड आहे. त्याचा प्रसार केला पाहिजे. वैयक्तिकरित्या प्रत्येकाने ही चळवळ चालू केली, तर मराठीचा वापर निःसंकोचपणे होईल, त्याला मर्यादा येणार नाही.
१४. ‘मॅडम’, ‘सर’ यांना मराठी प्रतिशब्द वापरणे आवश्यक !
मुलाखतीचा कार्यक्रम चालू असतांना रत्नागिरी येथून सौ. शुभांगी मुळे यांनी ‘ऑनलाईन’ प्रश्न विचारला, ‘‘या मुलाखतीच्या कार्यक्रमात संवाद साधतांना ‘मॅडम’, ‘सर’ असा उल्लेख होत आहे, तर याला मराठी प्रतिशब्द काही निर्माण करता येतील का ?’’ त्यावर प्रा. डॉ. मांडवकर म्हणाल्या, ‘‘ हो अगदी योग्य आहे. ‘ताई’ किंवा ‘बाई’ या शब्दांत जो आदर आणि जिव्हाळा आहे, तो ‘मॅडम’ या औपचारिक शब्दात नाही. ‘सर’च्या ऐवजी आपण ‘महोदय’ किंवा ‘आचार्य’ म्हणू शकतो का ?, हे पाहिले पाहिजे.’’
हे मराठी प्रतिशब्द निर्माण करण्याचे काम आतापर्यंत माधव ज्युलियन, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी केले आहे. आताही अनेक माणसे हे काम करत आहेत.’’
(क्रमशः पुढच्या रविवारी)
– सौ. रूपाली अभय वर्तक, सनातन आश्रम, देवद, पनवेल.
लग्नाची पत्रिका मराठी भाषेतूनच करा !
डॉ. (सौ.) मंजुषा कुलकर्णी म्हणाल्या, ‘‘लग्नाची पत्रिका इंग्रजी भाषेतून कशाला पाहिजे ? आपले संस्कार असतात. लग्नाची पत्रिका मराठीतून का करत नाही ? मी तर असा संकल्प केला आहे की, इंग्रजीतून पत्रिका येते, त्या लग्नाला मी उपस्थित रहात नाही.’’ – सौ. रूपाली वर्तक
मराठी भाषेत अन्य भाषांची होणारी सरमिसळ रोखण्यासाठी सरकारसह भाषाप्रेमी, महाराष्ट्रवासीय यांनी कटाक्षाने मराठीत बोलण्याचा प्रयत्न करावा ! |