Police Gambling In ‘Big Cash Poker’ : महाराष्ट्र पोलीस अधिकार्‍याला जुगार खेळण्याचे आवाहन करतांना दाखवले !

‘बीग कॅश पोकर’ जुगाराचे विज्ञापन

पोलिसांच्या गणवेशासह कार्यालयात कामावर असतांना विज्ञापनातील अधिकारी खेळतो जुगार

मुंबई – ‘बीग कॅश पोकर’ या ऑनलाईन जुगाराच्या विज्ञापनात अतिशय संतापजनक प्रकार दाखवण्यात आला आहे. अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याने या विज्ञापनात काम केले आहे. यामध्ये नवाजुद्दीने सिद्दीकी हे महाराष्ट्र पोलीस अधिकार्‍याच्या गणवेशामध्ये नागरिकांना ‘बीग कॅश पोकर’ हा ऑनलाईन जुगार खेळा. मी नियमित हा खेळ खेळतो’, असे आवाहन करतांना दाखवले आहे. पोलिसांच्या गणवेशासह कार्यालयात कामावर असतांना विज्ञापनातील हा अधिकारी जुगार खेळण्याचे आवाहन करतांना दाखवले असून त्याच्या मागील भिंतीवर महाराष्ट्र पोलिसांचे चिन्हही आहे.

‘पोलीस खात्यामध्ये नाव मिळवायचे असेल, तर मोठे काम करावे लागते आणि त्यासाठी बुद्धीची आवश्यकता असते. गुन्हेगार स्वत:चा गुन्हा मान्य करत नाही; मात्र मी त्यांच्या हावभावावरूनच गुन्हेगाराला त्वरित ओळखतो; कारण त्यांना ठाऊक नाही, जो खेळ ते माझ्यासमवेत खेळतात, तो मी नियमित ५ कोटी लोकांसमवेत खेळतो’, असे म्हणत विज्ञापनातील पोलीस अधिकारी खिशातून भ्रमणभाष काढून त्यावर ‘बीग कॅश पोकर’चे विज्ञापन दाखवतो. ‘जीवनात मोठे काम करणारे ‘बीग कॅश पोकर’ खेळतात.

तुम्हीही खेळा’, असे आवाहन करतांना दाखवले आहे. गुन्ह्यांचा शोध घेण्यासाठी लागणारी बुद्धीमत्ता ‘बीग कॅश पोकर’ ऑनलाईन जुगार खेळातून मिळत असल्याचे महाराष्ट्राचा पोलीस अधिकारी सांगतांना दाखवून विज्ञापनात पोलिसांच्या कर्तृत्वाचा अवमान करण्यात आला आहे. या विज्ञापनाच्या शेवटी ‘या खेळाची सवय लागणे किंवा यातून आर्थिक हानीची शक्यता आहे’, अशी सूचना देण्यात आली आहे.