Online Ramleela from Ayodhya : देश-विदेशांतील ४१ कोटी लोकांनी ऑनलाईन पाहिली अभिनेत्‍यांचा सहभाग असणारी अयोध्‍येतील रामलीला !

अयोध्‍या (उत्तरप्रदेश) – नवरात्रोत्‍सव काळात अयोध्‍येत होणारी रामलीला दूरदर्शनसमवेत ऑनलाईन मंचांवरूनही थेट प्रसारित करण्‍यात आली. ३ दिवसांत ४१ कोटी लोकांनी ही रामलीला देश-विदेशांत पाहिली. ४० देशांतील २६ भाषांमध्‍ये तिचे प्रसारण झाले आहे. विशेष म्‍हणजे या रामलीलेमध्‍ये चित्रपट अभिनेते आणि अभिनेत्री यांचा सहभाग असतो.

१. रामलीला समितीचे अध्‍यक्ष सुभाष मलिक यांनी सांगितले की, अयोध्‍येत चित्रपट कलाकारांची रामलीला वर्ष २०२० मध्‍ये प्रारंभ झाली. प्रतिवर्षी ऑनलाईन रामलीला पहाणार्‍या प्रेक्षकांची संख्‍या वाढत आहे. मागील वर्षी ४० कोटी लोकांनी रामलीला पाहिली. यंदा ४१ कोटी लोकांनी ही रामलीला देश-विदेशांत पाहिली. दूरदर्शनवर आतापर्यंत २२ कोटी, तर यू ट्यूबवर १७ कोटी आणि इतर मंचांवरून २ कोटी लोकांनी रामलीला पाहिली.

२. रामलीलाचे दिग्‍दर्शक शुभम् मलिक यांनी सांगितले की, रामलीलाचे २६ भाषांमध्‍ये थेट प्रसारण होते. रामलीला अमेरिका, ऑस्‍ट्रेलिया, थायलँड, त्रिनिदाद, श्रीलंका, मलेशिया, फिजी, रशिया दक्षिण कोरिया यांसह जगातील ४० देशांमध्‍ये दाखवली जाते. हिंदी, मल्‍ल्‍याळम्, तेलुगु, तमिळ, बंगाली, पंजाबी आणि गुजराती या भाषांमध्‍ये रामलीलाचे प्रसारण होते.

रामलीलामध्‍ये काम करणारे अभिनेते !

अभिनेता बिंदु दारा सिंह, मनीष पाल, अवतार गिल, रझा मुराद, राकेश बेदी, वेद सागर, अनिमेष मिढा़, विनय सिंह, तर अभिनेत्री भाग्‍यश्री, शीबा, ऋतु शिवपुरी, अमिता नागिया, मैडोना, पायल गोगा कपूर आणि मालिनी अवस्‍थी यांच्‍या भूमिका आहेत.

संपादकीय भूमिका

श्रीरामाची लीला पहाण्‍यासाठी जगभरातील लोक आतुर असतात, हे पुनःपुन्‍हा लक्षात येते ! एखाद्या राजकारण्‍याचे चरित्र पहाण्‍यासाठी जनता कधी इतकी आतुर असते का ? असा एकतरी राजकारणी या देशात आहे का ?