Kailash Mansarovar Darshan : भाविकांना कैलास पर्वताचे दर्शन होण्‍यासाठी आता हेलिकॉप्‍टरचा वापर !

डेहराडून – उत्तराखंडच्‍या पिथौरागढ जिल्‍ह्यातील जुन्‍या लिपुलेखच्‍या टेकड्यांवरून पुढील आठवड्यापासून ‘एम्.आय-१७’ हेलिकॉप्‍टरद्वारे कैलास पर्वताचे दर्शन चालू होणार आहे. या प्रवासासाठी ७५ सहस्र रुपये खर्च येणार आहे.

१. कैलास पर्वत चीनच्‍या कह्यात असलेल्‍या तिबेटमध्‍ये आहे. कैलासाचे दर्शन घडणारे ठिकाण १४ सहस्र फुटांहून अधिक उंच आहे. त्‍यामुळे ५५ वर्षांपर्यंतच्‍या व्‍यक्‍तींनाच प्रवास करण्‍याची अनुमती असेल.

२. यापूर्वी भारतीय नागरिक ३ मार्गांनी कैलास पर्वतावर पोचू शकत होते. पहिला नेपाळमार्गे, दुसरा जुना लिपुलेखमार्गे आणि तिसरा सिक्‍कीममार्गे. या मार्गांवरील प्रवास ११ ते २२ दिवसांत पूर्ण होतो आणि त्‍यासाठी १ लाख ६ सहस्र ते २ लाख ५० सहस्र रुपये खर्च येत होता.

३. नवीन मार्गानुसार भाविकांच्‍या यात्रेला पिथौरागढ येथून प्रारंभ होईल. येथून सैन्‍याचे  ‘एम्.आय-१७’ हेलिकॉप्‍टर एकावेळी १५ भाविकांना जुन्‍या लिपुलेखच्‍या आधी ३० किमी अंतरावर असलेल्‍या गुंजी गावात घेऊन जाईल. तेथे असलेल्‍या गाड्या भाविकांना २१ किमी पुढे नाभिडंगपर्यंत घेऊन जातील. तेथे प्रथम ओम पर्वत पहाता येईल. त्‍यानंतर भारतीय सैन्‍याचे सैनिक भाविकांना ९ किमी पुढे जुन्‍या लिपुलेख खिंडीपर्यंत घेऊन जातील. येथे भाविकांना शिखरावर बांधलेल्‍या ‘दृष्‍य बिंदू’वरून कैलास पर्वताचे दर्शन दिले जाईल.

४. ही यात्रा ४ दिवसांची असणार आहे. या यात्रेसाठी प्रत्‍येक भाविकाला ७५ सहस्र रुपये खर्च करावे लागतील. यामध्‍ये हेलिकॉप्‍टर-जीपचे भाडे, निवास, भोजन, गरम पाणी, रजाई-गादी इत्‍यादींचा समावेश आहे.