Kejriwal Will Resigned : केजरीवाल २ दिवसांत मुख्‍यमंत्रीपदाचे त्‍यागपत्र देणार !

अरविंद केजरीवाल

नवी देहली – देहलीचे मुख्‍यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी येत्‍या २ दिवसांत मुख्‍यमंत्रीपदाचे त्‍यागपत्र देण्‍याची घोषणा आम आदमी पक्षाच्‍या कार्यकर्त्‍यांना संबोधित करतांना केली.

देहलीतील मद्य घोटाळ्‍याच्‍या प्रकरणी केजरीवाल यांना सर्वोच्‍च न्‍यायालयाने १३ सप्‍टेंबर या दिवशी जामीन संमत केला. ते गेल्‍या १७७ दिवसांपासून कारागृहात होते. कारागृहातून बाहेर आल्‍यानंतर अरविंद केजरीवाल यांनी वरील घोषणा केली. केजरीवाल पुढे म्‍हणाले, ‘‘काही लोक म्‍हणत आहेत की, सर्वोच्‍च न्‍यायालयाने जामीन देतांना काही अटी घातल्‍या आहेत. त्‍यामुळे मी काहीच काम करू शकणार नाही. मागील वर्षभरात केंद्र सरकारने काय कमी अटी घातल्‍या होत्‍या का ? केंद्र सरकारने कायद्यांवर कायदे करून आमचे अधिकार आणि शक्‍ती अल्‍प करण्‍याचा प्रयत्न केला. पुढील २ दिवसांमध्‍ये  मुख्‍यमंत्रीपदाचे त्‍यागपत्र दिल्‍यानंतर मी आणि मनिष सिसोदिया आम्‍ही दोघेही देहलीच्‍या लोकांमध्‍ये जाऊन त्‍यांच्‍याशी संवाद साधणार आहोत. त्‍यानंतर जनतेला आम्‍ही प्रामाणिक वाटत असलो, तर आम्‍हाला ते पुन्‍हा निवडून देतील. २ दिवसांत आम आदमी पक्षाच्‍या विधीमंडळ पक्षाची बैठक होईल. त्‍या बैठकीमध्‍ये माझ्‍याऐवजी आम आदमी पक्षामधील दुसर्‍या नेत्‍याची मुख्‍यमंत्रीपदी निवड करण्‍यात येईल. आता देहलीच्‍या जनतेचा निर्णय जोपर्यंत येत नाही, तोपर्यंत मी मुख्‍यमंत्रीपद स्‍वीकारणार नाही.’’

संपादकीय भूमिका 

असे करून केजरीवाल हे जनतेची सहानुभूती मिळवण्‍याचाच प्रयत्न करत आहेत. त्‍यांच्‍या पक्षातील भ्रष्‍टाचारी, गुंड आदींचा असलेला भरणा पहाता त्‍यांच्‍या पक्षाला निवडणूक लढवण्‍यासच बंदी घातली पाहिजे !