४०२ मुलांची सुटका, १७१ जणांना अटक
कुवालालंपूर : मलेशियातील पोलिसांनी २० ‘इस्लामिक वेल्फेअर होम्स’वर (इस्लामी कल्याण गृहांवर केंद्रांवर) धाडी टाकल्या आणि लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या तेथील ४०२ मुलांची सुटका केली. यांमध्ये १ ते १७ वर्षे वयोगटातील २०१ मुलगे आणि २०१ मुली यांचा समावेश आहे. ही कल्याणगृहे ‘ग्लोबल इखवान सर्व्हिसेस अँड बिझनेस होल्डिंग्ज’ (जी.आय.एस्.बी.) नावाच्या इस्लामी व्यवसाय समुहाशी संबंधित आहेत. या प्रकरणी १०५ महिलांसह १७१ जणांना अटक करण्यात आले आहे, असे पोलीस महानिरीक्षक रझाउद्दीन हुसैन यांनी सांगितले. या कल्याण गृहातील मुलांना इतर मुलांवर अत्याचार करण्यासाठी दबाव टाकला जात होता. या प्रकरणी कह्यात घेतलेल्या आरोपींमध्ये धार्मिक शिक्षकांचाही समावेश आहे. मुलांच्या शिक्षणाचे आणि त्यांची देखभाल करण्याचे दायित्व त्यांच्यावर होते.
‘ग्लोबल इखवान’ने लहान मुलांचे शोषण केले आणि देणगीचे पैसे मिळवण्यासाठी धार्मिक भावनांचा वापर केला’, असे पोलिसांचे मत आहे. ग्लोबल इखवानच्या चीन, ब्रिटन, यूएई यांसह २० देशांमध्ये शाखा आहेत. धार्मिक नेते अशरी महंमद यांनी ग्लोबल इखवानची स्थापना केली होती.