सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने श्री गणेशमूर्तीचे वहात्या पाण्यात विसर्जन करता आल्याची कोल्हापूर येथील श्री. शिवानंद स्वामी यांना आलेली अनुभूती

१. धर्मशास्त्रानुसार श्री गणेशमूर्तीचे वहात्या पाण्यात विसर्जन करण्यास अनुमती मिळवण्यासाठी हिंदुत्वनिष्ठांनी प्रशासनाला निवेदन देऊनही प्रतिसाद न मिळणे

‘वर्ष २०२३ मधील गणेशोत्सवात कोल्हापूर येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने धर्मशास्त्रानुसार श्री गणेशमूर्तींचे वहात्या पाण्यात विसर्जन करण्याविषयी मोहीम राबवण्यात आली होती. प्रशासनाच्या वतीने तथाकथित प्रदूषणाच्या नावाखाली नदीमध्ये श्री गणेशमूर्ती विसर्जन करण्यास बंदी घालण्यात आली होती. हिंदुत्वनिष्ठांनी श्री गणेशमूर्ती वहात्या पाण्यातच विसर्जन करण्याचा निश्चय करून प्रशासनाला त्यासंदर्भात निवेदन दिले. त्यामध्ये ‘नदीमध्ये इतर कारणांमुळे (नाल्याचे पाणी, औद्योगिक रासायनिक पाणी इत्यादी नदीत सोडल्याने) प्रचंड प्रदूषण होते; मात्र श्री गणेशमूर्तींच्या विसर्जनामुळे नगण्य प्रदूषण होते’, असे नमूद केले होते. यासाठी काही स्थानिक लोकप्रतिनिधींचे साहाय्य घेण्याचाही प्रयत्न केला; परंतु जिल्हाधिकारी नदीमध्ये गणेशमूर्ती विसर्जन करू देण्याच्या विरोधात ठाम होते.

२. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना प्रार्थना केल्यावर भावजागृती होणे आणि ‘गणरायाच गणेशमूर्ती विसर्जनासाठी साहाय्य करणार आहे’, याची जाणीव होणे

श्री. शिवानंद स्वामी

त्यानंतर मी सूक्ष्मातून गुरुदेवांना (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना) प्रार्थना केली, ‘धर्मशास्त्रानुसार श्री गणेशमूर्तीचे विसर्जन होण्यासाठी आपणच काहीतरी करा.’ मी गणरायाला सूक्ष्मातून आलिंगन दिले. तेव्हा गणराया मला सूक्ष्मातून म्हणाला, ‘तू आणि मी वेगळे नाही.’ तेव्हा माझी भावजागृती होऊन माझ्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. ‘आता श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी गणरायाच साहाय्य करणार आहे’, याची मला जाणीव झाली.

३. नदीमध्ये गणेशमूर्ती विसर्जन करण्यास अनुमती मिळण्यासाठी पुन्हा प्रयत्न करणे

त्यानंतर मी हिंदु एकता आंदोलन संघटनेच्या जिल्हाध्यक्षांना भेटून श्री गणेशमूर्ती विसर्जनाविषयी सांगितले. आम्ही पुन्हा प्रशासनाला भेटलो; पण काही उपयोग झाला नाही. शेवटी ‘देवच साहाय्य करणार’, असे आम्हाला वाटले.

४. हिंदु जनजागृती समिती आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्या तळमळीमुळे नदीच्या पाण्यात गणेशमूर्ती विसर्जन करण्याचा मार्ग मोकळा होणे

श्री गणेशमूर्ती विसर्जनाच्या दिवशी दुपारी ३ वाजता मी प.पू. गुरुदेव आणि श्री गणेश यांना ‘तुम्हीच आता काहीतरी करा’, अशी प्रार्थना केली. ‘हिंदु जनजागृती समिती’चे कार्यकर्ते आणि काही हिंदुत्वनिष्ठ आम्ही नदीकडे निघालो. आम्ही तेथील काही धर्मप्रेमींना विनंती केल्यावर आमच्या समवेत २० ते २५ धर्मप्रेमी आले. नदीच्या पात्राजवळ बॅरीकेड्स (अडथळे) लावले होते. आम्ही तेथे पोचेपर्यंत आमच्या समवेत अकस्मात् जवळजवळ १०० धर्मप्रेमी जमा झाले. एका धर्मप्रेमींनी श्री गणेशमूर्ती हातात घेतली आणि ते आमच्या पुढे चालू लागले. तेव्हा ‘त्यांच्या हातातील श्री गणेशाने रौद्ररूप धारण केले आहे’, असे मला वाटले. परिणामी श्री गणेशमूर्ती विसर्जनाचा मार्ग मोकळा झाला आणि सर्वांना नदीतील वहात्या पाण्यात श्री गणेशमूर्तीचे विसर्जन करता आले.

पोलीस-प्रशासन आदींची ठाम भूमिका असून, तसेच लोकप्रतिनिधींकडून सहकार्य न लाभूनही श्री गणेशमूर्तींचे वहात्या पाण्यात विसर्जन करण्याच्या मोहिमेला यश मिळाले. त्यासाठी प.पू. गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– गुरुचरणांचा दास,

श्री. शिवानंद स्वामी, उंचगाव, कोल्हापूर. (२१.१०.२०२३)


प्रभावी हिंदु संघटनामुळेच हिंदूऐक्य शक्य !

‘आतापर्यंत अन्य पंथियांनी त्यांच्या धर्माच्या नावाखाली केलेल्या अयोग्य कृत्यांना प्रशासन रोखू शकले नाही; परंतु अन्यायाला सनदशीर मार्गाने विरोध करणार्‍या सहिष्णु हिंदूंवर मात्र पोलीस अरेरावी आणि बळाचा वापर करून रोखतात, हे आपण अनेक प्रसंगांतून अनुभवले आहे. प्रत्येक वेळी कायद्यांचे पूर्णतः पालन करूनही पोलीस आणि प्रशासन हिंदूंनाच बळाचा वापर करून मोहीम मागे घेण्यास सांगतात. त्याला अपवाद म्हणजे कोल्हापूर येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राबवण्यात आलेली श्री गणेशमूर्तींचे शास्त्रानुसार वहात्या पाण्यात विसर्जन करण्याविषयी मोहीम ! निधर्मी राजकारणी आणि लोकनेते यांनी पाठिंबा दिला नव्हता, तरीही श्री. शिवानंद स्वामी यांची गुरु (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्यावर) आणि श्री गणेश यांच्यावर असलेल्या दृढ श्रद्धेमुळे अन् हिंदुत्वनिष्ठ आणि समितीचे कार्यकर्ते यांचा श्री गणेशकृपा संपादन करण्याचा निश्चय अटळ असल्याने परिणामतः वहात्या पाण्यात श्री गणेशमूर्तीचे विसर्जन झाले. हिंदु जनजागृती समितीच्या प्रबोधनामुळे समाजात झालेल्या जागृतीच्या हा परिणाम, म्हणजे हिंदूऐक्य आणि हिंदुत्वाचा विजयच आहे ! अशा प्रकारे ठिकठिकाणी जर हिंदूंनी भक्ती करून देवाला प्रसन्न करून घेतले, तर हिंदु राष्ट्र लवकरच साकारेल, यात शंकाच नाही.’ – संकलक

 

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक