‘मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मुंबई येथील सेवाकेंद्रात सेवा करण्यासाठी जात असे. तेव्हा मला परात्पर गुरु डॉक्टरांचा सत्संग लाभला. परात्पर गुरु डॉक्टर प्रीतीचा सागर आहेत. त्यांनाच ‘साधकांची आध्यात्मिक उन्नती व्हावी’, याची तळमळ अधिक आहे. त्यांचे आचरण सर्व साधकांना आदर्शवत आहे. मला घडलेले त्यांच्यातील गुणांचे दर्शन आणि त्यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती यांविषयी येथे दिले आहे. ३ सप्टेंबर या दिवशी या लेखाचा काही भाग पाहिला. आज पुढील भाग पाहूया.
(भाग ३)
भाग २ वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/831081.html
२ ई. गुरुदेवांकडून मौनातून शिकायचे असे ठरवणे
२ ई ३. ‘गुरुदेवांप्रती जसा भाव ठेवू, त्याप्रमाणे ते आपले ध्येय साध्य करून देतात’, हे लक्षात येणे : गुरुदेवांनी ‘तुझे ध्येय साध्य झाले’, असे म्हटल्यावर माझ्या लक्षात आले, ‘आपण गुरुदेवांप्रती जसा भाव ठेवू, त्याप्रमाणे ते आपले ध्येय साध्य करून देतात.’ गुरुदेवांना संस्थेत असणार्या वाहनांच्या संदर्भात जिज्ञासा होती की, ‘इंधनावरती होणारा व्यय अल्प कसा होईल ?’ या अनुषंगाने ते मला प्रश्न विचारत होते. ‘माझेही त्याविषयीचे चिंतन असायला हवे’, हे मला शिकायला मिळाले.
२ उ. गुरुदेवांनी साधकाला चारचाकी गाडी चालवत असतांना लक्षात घ्यावयाच्या गोष्टींची जाणीव करून देणे
२ उ १. ‘चारचाकी गाडी चालवतांना काही अयोग्य घडत असल्यास ते शोधून कसे थांबवायचे ?’, याविषयी गुरुदेवांनी स्वतःच्या कृतीतून शिकवणे : एकदा मी गुरुदेवांना त्यांचे बंधू डॉ. सुहास आठवले यांच्या मुलीच्या लग्नाला चारचाकी गाडीने घेऊन जात होतो. तेव्हा गाडीत कसलातरी आवाज येत होता; पण ‘तो आवाज कुठून येत आहे ?’, हे माझ्या लक्षात येत नव्हते. गुरुदेवांनी गाडीतील देवघराच्या खालून एक नाणे काढले. तेव्हा आवाज येणे बंद झाले.
२ उ २. गुरुदेव चारचाकी गाडी चालवत असतांना ते चारचाकी गाडीत बसलेल्या व्यक्तींची घेत असलेली काळजी : एकदा मी डॉ. (सौ.) कुंदाताईंसह लांबचा प्रवास करत असतांना त्यांनी सांगितले, ‘‘परम पूज्यांचे ‘ड्रायव्हिंग’, म्हणजे ‘सुरक्षित ड्रायव्हिंग’ असे. परम पूज्य चारचाकी गाडी चालवत असतांना चारचाकी गाडीत बसणार्या व्यक्तीच्या पोटातील पाणीही हलत नसे.’’ तेव्हा ‘चालकाच्या अंगी कोणते गुण असायला हवेत ?’, हे माझ्या लक्षात आले.
२ उ ३. गुरुदेवांनी चारचाकी गाडीची गती योग्य ठेवण्यास शिकवणे : एकदा मी गुरुदेवांना घेऊन चारचाकी गाडीने पनवेल येथून मुंबई येथे जात होतो. तेव्हा मी प्रतिघंटा ७० ते ८० कि.मी. गतीने गाडी चालवत होतो. त्या वेळी मार्गात खड्डे आल्यावरही मी गती अल्प केली नाही. त्या वेळी गुरुदेवांनी मला माझ्या चुकीची जाणीव करून दिली. त्यांनी मला ही चूक सत्संगात सांगायला सांगितली.
२ ऊ. गुरुदेवांना पुष्कळ ताप आणि खोकला असतांनाही त्यांनी साधकांना मार्गदर्शन करणे अन् स्वतःच्या बंधूंच्या भेटी घेणे आणि गुरुदेवांमधील देवत्वाची जाणीव होणे
२ ऊ १. गुरुदेव साधकांना अडीच घंटे मार्गदर्शन करत असतांना त्यांना खोकला न येणे : वर्ष २००५ मधील गुरुपौर्णिमेसाठी गुरुदेव इंदूर येथे गेले होते. ते तेथून परत आल्यावर त्यांचे मुंबई, ठाणे आणि रायगड या जिल्ह्यांतील साधकांसाठी परळ, मुंबई येथील शिरोडकर हायस्कूलच्या सभागृहात मार्गदर्शन होते. त्या वेळी गुरुदेवांना पुष्कळ ताप होता आणि खोकला येत होता. गुरुदेव मला म्हणाले, ‘‘मी गोवा येथे रहायला गेल्यापासून साधक मला भेटत नाहीत. मला साधकांना भेटायची ही संधी आहे. मला मार्गदर्शनाच्या वेळी खोकला आला, तर मी लगेच थांबीन. आपण तेथून पुढे निघून जाऊ. तू सिद्ध रहा.’’ गुरुदेव तेथे अडीच घंटे बोलले; पण त्यांना खोकला आला नाही. याविषयी त्यांनी साधकांनाही सांगितले.
२ ऊ २. गुरुदेवांनी त्यांचे बंधू श्री. विलास आठवले, रुग्णाईत डॉ. सुहास आठवले आणि सद्गुरु वसंत आठवले यांच्या भेटी घेणे अन् त्याच्या दुसर्या दिवशी डॉ. सुहास आठवले यांचे निधन होणे : गुरुदेवांच्या मार्गदर्शनाचा कार्यक्रम संपल्यावर आम्ही गुरुदेवांचे लहान भाऊ श्री. विलास आठवले (वर्ष २०१७ मधील आध्यात्मिक पातळी ६५ टक्के) यांची भेट घेतली. त्यानंतर आम्ही विलेपार्ले, मुंबई येथे रहाणारे गुरुदेवांचे बंधू डॉ. सुहास आठवले (वर्ष २०१७ मधील आध्यात्मिक पातळी ६५ टक्के) यांना भेटायला गेलो. त्या वेळी डॉ. सुहासकाका पुष्कळ रुग्णाईत होते. त्यांच्या इमारतीजवळ गेल्यावर गुरुदेव मला म्हणाले, ‘‘मी रुग्णाईत आहे’, हे त्यांना समजता कामा नये.’’ त्यांना भेटून आम्ही इमारतीतून खाली उतरत असतांना गुरुदेवांचा तोल जात होता. मी त्यांना आधार देत गाडीजवळ आणले. त्या वेळी त्यांचे शरीर चटका बसण्याएवढे पुष्कळ तापले होते. गुरुदेव चारचाकी गाडीमध्ये झोपून पुष्कळ कण्हत होते. तेव्हा मी ‘गुरुदेवांना बरे वाटावे’, यासाठी प.पू. भक्तराज महाराज आणि प.पू. अनंतानंद साईश यांना पुष्कळ आळवले. आम्ही विलेपार्ले येथून निघून चेंबूर येथे रहाणारे गुरुदेवांचे बंधू सद्गुरु डॉ. वसंत आठवले (आप्पाकाका) यांना भेटायला गेलो. तेव्हा प्रवासात गुरुदेवांना पुष्कळ त्रास होत होता, तरीही गुरुदेवांनी ते रुग्णाईत असल्याचे कुणालाही कळू दिले नाही. त्यानंतर मी गुरुदेवांना देवद, पनवेल येथील आश्रमात घेऊन गेलो. दुसर्या दिवशी गुरुदेवांचा ताप उतरला. डॉ. सुहासकाकांचे निधन झाल्याचे कळले. ‘गुरुदेव स्वतः रुग्णाईत असतांनाही श्री. विलासकाका, डॉ. सुहासकाका, सद्गुरु डॉ. आप्पाकाका आणि जिल्ह्यातील अन् देवद आश्रमातील साधकांना का भेटले ?’, हे माझ्या लक्षात आले. या प्रसंगातून मला गुरुदेवांमधील देवत्वाची जाणीव झाली.
२ ए. टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू बनवणे : वर्ष १९७६ मध्ये गुरुदेव इंग्लंड येथून मुंबईला आले. त्यांनी तिकडून धुलाई यंत्र आणि विद्युत शेगडी आणली होती. त्यांच्या बांधणीसाठी (पॅकींगसाठी) वापरलेल्या लाकडी फळ्यांपासून गुरुदेवांनी शयनगृह आणि स्वयंपाकघर यांच्या दारामागे ६ फूट उंचीची मांडणी (कपाट) सिद्ध केली होती. अशा रितीने ते टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू बनवत असत.
२ ऐ. साधकांना जाणकार साधकांकडून छायाचित्रे काढण्यास शिकवणे : गुरुदेवांनी मुंबई सेवाकेंद्रातील साधकांचे छायाचित्र काढण्यास शिकण्याचे नियोजन केले होते. गुरुदेवांचा ‘सर्व साधकांना सर्व सेवा करता यायल्या हव्यात’, असा दृष्टीकोन आहे. तेव्हा छायाचित्र काढल्यावर त्याच्यावर पुढील प्रक्रिया करण्यासाठी व्यय येत असे, तरीही गुरुदेवांनी आम्हा साधकांना छायाचित्र काढणार्या जाणकार साधकांकडून छायाचित्रे काढण्यास शिकवले.
३. अंतर्मनातून केलेली प्रार्थना गुरुदेवांपर्यंत पोचत असल्याच्या संदर्भात साधकाला आलेली प्रचीती
एकदा मी चारचाकी गाडी चालवत असतांना गुरुदेव मागे बसले होते. तेव्हा मी प्रार्थना केली, ‘देवा, मला तुझ्या चरणांशी ठेव.’ त्या वेळी परम पूज्यांनी एक पाय पुढच्या दोन सीटच्या मधून पुढे केला. तेव्हा माझ्या मनात आले, ‘देवाला आपल्या मनातील समजते.’ मी पुन्हा ‘देवा, मला तुझ्या चरणांशी ठेव’, असे मनात म्हटल्यावर परम पूज्यांनी दुसराही पाय पुढच्या दोन सीटमधून पुढे केला.’
(समाप्त)
– श्री. सागर म्हात्रे (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ४२ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२५.३.२०२४)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |