समाजाची ढासळलेली नीतीमत्ता दर्शवणारे सर्वेक्षण
नवी देहली – कोलकाता येथील ‘राधा-गोविंद’ (आर्.जी) कर वैद्यकीय महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या केल्याच्या घटनेनंतर ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ने (आय.एम्.ए.ने) ऑनलाइन सर्वेक्षण केले. यात सहभागी झालेल्या सुमारे ३५ टक्के महिला डॉक्टरांनी स्वीकृती दिली की, त्यांना रात्रपाळी करतांना सुरक्षित वाटत नाही.
१. एका महिला डॉक्टरने असेही नोंदवले की, ती नेहमी तिच्या हँडबॅगमध्ये चाकू आणि मिरपूड स्प्रे ठेवते; कारण कामाची खोली अंधार्या ठिकाणी आहे.
२. काही डॉक्टरांनी आपत्कालीन कक्षात गैरवर्तनाविषयी तक्रारी केल्या. एका महिला डॉक्टरने सांगितले की, गर्दीच्या आपत्कालीन कक्षात त्यांना अनेकदा ‘वाईट स्पर्शा’चा सामना करावा लागला.
३. ‘केरळ राज्य युनिट’च्या ‘रिसर्च सेल’ने हे सर्वेक्षण केले होते. त्याचे अध्यक्ष डॉ. राजीव जयदेवन् म्हणाले की, २२ राज्यांतील डॉक्टरांनी या सर्वेक्षणात भाग घेतला. सर्वेक्षणासाठी आवश्यक माहिती गूगल फॉर्मद्वारे भारतभरातील सरकारी आणि खाजगी डॉक्टरांना पाठवण्यात आली होती. २४ घंट्यांत ३ सहस्र ८८५ प्रतिक्रिया प्राप्त झाल्या.
४. डॉ. जयदेवन् म्हणाले की, आतापर्यंतच्या सर्वेक्षणातून जे काही समोर आले आहे त्यात सुरक्षा कर्मचार्यांची संख्या वाढवणे, सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, केंद्रीय सुरक्षा कायदा (सीपीए) लागू करणे, सुरक्षितता वाढवण्यासाठी अलार्म सिस्टमचा समावेश करणे आणि लॉकसह सुरक्षित ‘ड्युटी रूम’ इत्यादी गोष्टींचा समावेश आहे.
५. सर्वोच्च न्यायालयाने २० ऑगस्ट या दिवशी वैद्यकीय व्यावसायिकांच्या सुरक्षेसाठी १४ सदस्यांचे राष्ट्रीय टास्क फोर्स स्थापन केले असून त्यात ९ डॉक्टर आणि केंद्र सरकारचे ५ अधिकारी यांचा समावेश आहे.
संपादकीय भूमिकाउच्चशिक्षित आणि समाजात आदराने पाहिल्या जाणार्या डॉक्टरांची जर ही परिस्थिती, तर सामान्य मुली आणि महिला यांच्यावर समाजात वावरतांना काय परिस्थिती ओढवत असेल, याचा विचारच न केलेला बरा ! |