आगाऊ रक्कम दर्शन साखळीत ‘श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समिती’पैकी कुणी आहे का ? याची चौकशी करा !

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर संरक्षण कृती समितीची मागणी

डावीकडून ह.भ.प. रामकृष्ण हनुमंत महाराज वीर, ह.भ.प. शाम महाराज उखळीकर, जिल्हाधिकारी कुमार विश्वास, ह.भ.प. देवव्रत (राणा) महाराज वासकर आणि श्री. गणेश लंके

सोलापूर, २९ ऑगस्ट (वार्ता.) – पंढरपूर येथे ठाणे येथील भाविक श्री. चेतन काबाडे यांनी ४ सहस्र रुपये रक्कम श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी दिली. या प्रकरणी दर्शन झाल्यावर पावती न मिळाल्याने त्यांची फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. या प्रकरणी सुमित संभाजी शिंदे यांच्यावर पंढरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यापूर्वीही असे प्रकार घडल्यावर श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर संरक्षण कृती समितीने मंदिर प्रशासन, पदाधिकारी आणि शहर पोलीस ठाणे यांच्याकडे तक्रारी प्रविष्ट केल्या होत्या. त्या वेळीही केवळ दलालांवर गुन्हे नोंद करून काही कालावधीसाठी सुरक्षारक्षकांवर कारवाई करून प्रकरण दाबले गेले. तरी आगाऊ रक्कम दर्शन साखळीत पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीपैकी कुणी आहे का ? याची सखोल चौकशी व्हावी, या मागणीचे निवेदन श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर संरक्षण कृती समितीच्या वतीने सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना देण्यात आले.

जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या दर्शनाच्या काळ्या बाजाराची साखळी अद्याप समोर आलेली नाही अथवा मंदिरे समितीकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. तरी या प्रकरणात जिल्हाधिकार्‍यांनी लक्ष घालून या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि संबंधितांवर कारवाई करून विठ्ठलभक्तांना न्याय द्यावा. या प्रसंगी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर संरक्षण कृती समितीचे श्री. गणेश लंके, वारकरी संप्रदाय पाईक संघाचे संस्थापक ह.भ.प. देवव्रत (राणा) महाराज वासकर आणि राष्ट्रीय प्रवक्ते ह.भ.प. रामकृष्ण हनुमंत महाराज वीर, तसेच ह.भ.प. शाम महाराज उखळीकर उपस्थित होते.


दर्शन व्यवस्था निःशुल्क ‘टाईम टोकन’ पद्धतीने लवकर चालू करा ! – वारकरी संप्रदाय पाईक संघ

सोलापूर, २९ ऑगस्ट (वार्ता.) – शासनाने श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर दर्शन व्यवस्था ही ‘टाईम टोकन’ (वारकर्‍यांना दर्शनासाठी ठरवून दिलेली वेळ) पद्धतीने संमत केली आहे. ही व्यवस्था श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर अधिनियम १९७३ मधील कलम क्रमांक ३२/२/ब अन्वये नि:शुल्क असणे आवश्यक आहे. शासनाचा महाराष्ट्रातील प्रमुख मंदिरांसाठी स्वतंत्र अध्यादेश आहे. तरी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर दर्शन व्यवस्था निःशुल्क ‘टाईम टोकन’ पद्धतीने लवकर चालू करावी, या मागणीचे निवेदन वारकरी संप्रदाय पाईक संघाच्या वतीने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना देण्यात आले. या प्रसंगी वारकरी संप्रदाय पाईक संघाचे संस्थापक ह.भ.प. देवव्रत (राणा) महाराज वासकर आणि राष्ट्रीय प्रवक्ते ह.भ.प. रामकृष्ण हनुमंत महाराज वीर, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर संरक्षण कृती समितीचे श्री. गणेश लंके, ह.भ.प. शाम महाराज उखळीकर उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की,

१. दर्शन व्यवस्थेसाठी दर्शन मंडपाची निर्मिती श्री ज्ञानेश्वर दर्शन मंडपात दुरुस्ती करून होऊ शकते का ? किंवा नवीन दर्शन मंडप हा छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील खादी ग्रामोद्योगच्या जागेवर आणि तेथून ‘स्कायवॉक’ (रांग खाली न आणता थेट मंदिराकडे आणि बाहेर) केल्यास हे ठिकाण भक्तनिवास, रेल्वे, एस्.टी. अशी ठिकाणे भाविकांना सोयीस्कर पडतील अशा अंतरावर असल्याचा लाभ होईल.

२. ‘टाईम टोकन’ दर्शन व्यवस्थेसाठी ‘वारकरी संप्रदाय पाईक संघ’ आणि ‘साधकाश्रम संस्था आळंदी देवाची’ यांच्या वतीने तांत्रिक साहाय्याची सिद्धता आहे. जिल्हाधिकार्‍यांची अनुमती मिळाल्यास या क्षेत्रात काम करणार्‍या उत्तम संस्थेचे सहकार्य मिळवून देण्यास प्रयत्नशील राहू.

३. दर्शन व्यवस्थेसाठी जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून त्यात वारकरी संप्रदायाच्या प्रतिनिधीचा समावेश करावा.