हिंदुत्वनिष्ठांना कह्यात घेतल्याने पोलिसांची दुटप्पी भूमिका उघड !
कोल्हापूर, २३ ऑगस्ट (वार्ता.) – बांगलादेशातील हिंदूंवर होणारे अत्याचार, महंत रामगिरी महाराज यांना समर्थन, तसेच हिंदुत्वावरील विविध आघातांच्या निषेधार्थ हिंदुत्वनिष्ठांनी २३ ऑगस्टला पुकारलेल्या बंदला कोल्हापूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सकाळपासूनच छत्रपती शिवाजी महाराज चौक, राजारामपुरी, लक्ष्मीपुरी, दसरा चौक, तसेच शहरातील अनेक मुख्य पेठा बंद होत्या. शाळा, महाविद्यालये, तसेच विविध आस्थापनेही बंद होती.
या संदर्भात हिंदुत्वनिष्ठांनी सकाळी ९ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीजवळ एकत्र येऊन आरती करण्याचे आवाहन केले होते. हा बंद शांततामय मार्गाने चालू असतांना पोलिसांनी मात्र अकारण दडपशाही करत छत्रपती शिवाजी महाराज चौकात आलेल्या आणि शहरात अनेक ठिकाणी हिंदु एकता आंदोलन, हिंदु महासभा, शिवसेना, सकल हिंदु समाज, अखिल भारत हिंदु सभा यांसह संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांना कह्यात घेऊन विविध ठिकाणी पोलीस ठाण्यांमध्ये सायंकाळपर्यंत बसवून ठेवले होते. काही पदाधिकारी, कार्यकर्ते यांना, तर कर्नाटक हद्दीत नेऊन परत महाराष्ट्रात घेऊन आले. यामुळे विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी ‘जिल्हाधिकारी कार्यालयावर मुसलमानांनी काढलेल्या मोर्चाच्या प्रसंगी पोलिसांनी कोणतीच कारवाई केली नाही, उलट शांततेच्या मार्गाने आंदोलन करणार्या हिंदुत्वनिष्ठांवर मात्र पोलिसी कारवाईचा बडगा उगारला’, अशी संतप्त प्रतिक्रिया प्रसिद्धीमाध्यमांकडे व्यक्त केली.