महावितरण आस्थापनात कार्यरत असतांना ६३ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. नीलेश नागरे (वय ४४ वर्षे) यांनी केलेले व्यष्टी आणि समष्टी साधनेचे प्रयत्न !

श्री. नीलेश सहदेव नागरे महावितरण आस्थापन, निफाड (नाशिक) येथे उपकार्यकारी अभियंता या पदावर कार्यरत आहेत. ते कार्यालयातही व्यष्टी आणि समष्टी साधना करण्याचा प्रयत्न करतात. या लेखात श्री. नीलेश नागरे सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करत असतांना आरंभीच्या काळात त्यांना आलेल्या अनुभूतींविषयी दिले आहे.

श्री. नीलेश नागरे

१. ‘अभियांत्रिकी पदवी परीक्षेत चांगले गुण मिळणे’, हे केवळ साधनेमुळे शक्य झाले’, असे साधकाच्या लक्षात येणे आणि त्याने साधना जोमाने करण्याचा निश्चय करणे

वर्ष २००१ पासून मी सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करू लागलो. वर्ष २००१ मध्ये मला अभियांत्रिकीच्या पदवी परीक्षेत शेवटच्या वर्षात अन्य मित्रांपेक्षा पुष्कळ चांगले गुण मिळाले. ‘‘मी एवढा हुशार नसतांनाही हे कसे घडले ?’, हे समजणे माझ्या बुद्धीच्या पलीकडचे आहे आणि ‘हे केवळ साधनेने शक्य झाले’, हे माझ्या लक्षात आले. तेव्हा मी साधना जोमाने करण्याचा निश्चय केला.

२. साधकाने अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांना मनापासून शिकवल्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना ७५ टक्क्यांहून अधिक गुण मिळणे आणि या अनुभूतीमुळे साधकाची श्रद्धा दृढ होणे

माझे शिक्षण पूर्ण झाल्यावर गुरुकृपेने मला एका अभियांत्रिकी महाविद्यालयात नोकरी मिळाली. ‘प्रत्येक गोष्ट मनापासून करायची’, हे मला साधनेमुळे समजले आहे. मी जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी विद्यालयात विद्यार्थ्यांना शिकवतांना त्यांचा वर्गातच अभ्यास करून घेत होतो. सर्व विद्यार्थ्यांना ७५ टक्क्यांहून अधिक गुण मिळाले. ही मला आलेली दुसरी मोठी अनुभूती ! त्यामुळे माझी श्रद्धा दृढ झाली.

३. महावितरण आस्थापनात नोकरी मिळण्यासाठी दिलेल्या मुलाखतीच्या वेळी परीक्षकांनी विचारलेला प्रश्न आणि साधकाला सुचलेले बुद्धीअगम्य उत्तर अन् त्याला झालेली गुरुकृपेची जाणीव

वर्ष २००३ मध्ये गुरुकृपेने मी महावितरण आस्थापनाच्या (एम्.एस्.ई.बी.च्या) लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालो. माझी मुलाखत पवई (मुंबई) येथे होती. मी मुलाखतीला गेल्यावर मला ४ सदस्यांच्या गटाने विविध तांत्रिक प्रश्न विचारले. त्यांनी मला शेवटी विचारले, ‘‘तुम्ही महाविद्यालयात शिकवण्याचे (लेक्चरशिप) सोडून इकडे का आला आहात ? आम्ही तुमची निवड का करावी ?’’ त्या वेळी मी उत्स्फूर्तपणे त्यांना साधनेविषयी सांगितले, ‘‘आमच्या गुरूंनी आम्हाला ‘प्रत्येक गोष्टीचे अध्यात्मीकरण करा’, असे सांगितले आहे. मलासुद्धा महावितरण आस्थापनाचे (एम्.एस्.ई.बी.चे) अध्यात्मीकरण करायचे आहे.’’ माझे हे उत्तर ऐकून सर्वांना पुष्कळ आनंद झाला. ‘माझी निवड होणार’, याची मला शाश्वती वाटली. मी त्यांना दिलेल्या उत्तराचा कधीच विचार केला नव्हता. ‘मला हे कसे सुचले ? मी असे कसे बोललो ?’ हे बुद्धीअगम्य आहे. ‘गुरुदेव मला अध्यात्माच्या दिशेने घेऊन जात आहेत’, याची मला अनुभूती आली.

४. धर्माचरण करणे आणि प्रतिदिन काम करतांना ‘गुरूंची सेवा करत आहे’, असा भाव ठेवल्याने उत्साह अन् आनंद अनुभवणे

सनातन संस्थेमुळे धर्माचरण करण्याचे महत्त्व माझ्या लक्षात आले. मी नियमित कपाळावर टिळा लावणे, सात्त्विक वेशभूषा करणे, स्पंदनांचा अभ्यास करणे इत्यादी कृती आचरणात आणू लागलो. मी धर्माचरण करत असल्याने मला एक वेगळाच आत्मविश्वास वाटू लागला. मी प्रतिदिन काम करतांना ‘गुरूंची सेवा करत आहे’, असा भाव ठेवत असल्याने मला सतत उत्साह आणि आनंद वाटू लागला आहे.

५. कार्यालयात करत असलेले साधनेचे प्रयत्न आणि त्यांना झालेले लाभ

५ अ. कार्यालयात आल्यावर ‘गुरूंचा सेवक असून ग्राहकांची सेवा करण्याची संधी मिळाली आहे’, असा भाव ठेवल्याने कुणाकडूनही अपेक्षा नसणे : माझ्या कार्यालयातील खोलीत मी श्रीकृष्णाचे चित्र लावले आहे. मी कार्यालयात आल्यावर ‘मी गुरूंचा (देवाचा) सेवक आहे आणि मला ग्राहकांची सेवा करण्याची संधी मिळाली आहे’, हा भाव ठेवत असल्याने मला कुठलाही अहं किंवा कुणाकडूनही अपेक्षा नसते. माझा प्रत्येक व्यक्तीशी प्रेमाने संवाद होतो. ग्राहकांना माझ्याशी बोलतांना कुठलेही दडपण येत नाही. माझ्याकडे येणारा प्रत्येक ग्राहक, अधिकारी आणि कर्मचारी आनंदी होतो.

५ आ. साधनेमुळे ‘ग्राहकांच्या कुठल्याही स्वरूपाच्या गार्‍हाण्याकडे जातीने लक्ष देऊन ते सोडवावे’, असे वाटणे आणि साधकाने अशाच प्रकारचे आचरण करण्याची प्रेरणा त्याच्या समवेत काम करणारे सर्व अधिकारी अन् कर्मचारी यांना देणे : साधनेमुळे मला ‘ग्राहकांच्या कुठल्याही स्वरूपाच्या गार्‍हाण्यांकडे जातीने लक्ष देऊन ते तात्काळ सोडवावे’, असे वाटते. ग्राहकांच्या प्रत्येक गार्‍हाण्याचे पूर्णपणे निराकरण होईपर्यंत माझ्याकडून त्याचा पाठपुरावा केला जातो. मी अशाच प्रकारचे आचरण करण्याची प्रेरणा माझ्या समवेत काम करणारे सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांना दिली आहे. त्यामुळे आस्थापनातील उपविभाग, तसेच सर्व शाखा कार्यालये यांतील वातावरण नेहमीच खेळीमेळीचे आणि आनंदाचे असते. मला भगवंताची अनुभूती पदोपदी येते.

मी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये काम केले असल्यामुळे विविध ठिकाणी सर्वच स्तरांवर पुष्कळ चांगले संबंध निर्माण झाले आहेत. त्यांना महावितरणच्या कामांमध्ये कुठल्याही स्वरूपाची अडचण आल्यास मला भ्रमणभाष करतात. त्या वेळी माझा ‘समोरच्या व्यक्तीची अडचण स्वतःचीच अडचण आहे आणि गुरूंनी मला त्यांची अडचण सोडवण्याची संधी दिली आहे. मी ही संधी सोडणार नाही’, असा विचार होऊन त्या व्यक्तीला पूर्णपणे साहाय्य करण्याचा प्रयत्न होतो. ईश्वरी कृपेने बहुतांश अडचणी सोडवल्या जातात. (क्रमशः)

– श्री. नीलेश नागरे (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ४४ वर्षे), नाशिक (४.५.२०२३)

लेखाचा पुढील भाग पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/826576.html

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक