महावितरण आस्थापनात कार्यरत असतांना ६३ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. नीलेश नागरे (वय ४४ वर्षे) यांनी केलेले व्यष्टी आणि समष्टी साधनेचे प्रयत्न !

‘श्री. नीलेश सहदेव नागरे महावितरण आस्थापन, निफाड (नाशिक) येथे उपकार्यकारी अभियंता या पदावर कार्यरत आहेत. ते कार्यालयातही व्यष्टी आणि समष्टी साधना करण्याचा प्रयत्न करतात. २० ऑगस्ट यादिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण श्री. नीलेश नागरे सनातन संस्थेच्या संपर्कात आल्यानंतर त्यांना आरंभीच्या काळात आलेल्या अनुभूतींविषयी जाणून घेतले. या लेखात आपण ते कार्यालयात करत असलेल्या साधनेच्या प्रयत्नांविषयी जाणून घेऊया.

लेखाचा भाग १ पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/826242.html

श्री. नीलेश नागरे

५. कार्यालयात करत असलेले साधनेचे प्रयत्न आणि त्यांना झालेले लाभ

५ इ. ‘गुरुकृपा आणि साधना’ यांमुळे साधकाला बैठकांविषयी आधीच लक्षात आल्याने बैठकांच्या वेळी सर्वांचे चेहरे प्रसन्न असणे : अन्य ठिकाणी अधिकारीवर्ग कार्यालयीन बैठका घेतांना त्यांच्या खालच्या स्तरावरचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी वर्ग यांच्यावर एक प्रकारचा ताण असतो. ‘गुरुकृपा आणि साधना’ यांमुळे मला बैठकांविषयी आधीच लक्षात येत असल्याने मी बैठक घेत असतांना सर्वांचे चेहरे प्रसन्न असतात. ‘नकारात्मक वातावरण सकारात्मक करणे, सर्वांना सकारात्मक दृष्टीकोन देऊन वेगवेगळ्या गोष्टी सांगून प्रेरणा देणे, कामांमध्ये मागे पडत असणार्‍या कर्मचार्‍यांच्या वैयक्तिक समस्यांविषयी जाणून घेणे, त्यावर परिणामकारक उपाययोजना करणे’ इत्यादी कृतींमुळे फलनिष्पत्ती चांगली  मिळते’, असे मला अनेक प्रसंगांत अनुभवायला आले आहे. मी नेहमी पुढाकार घेऊन आणि अध्यात्माची जोड देऊन प्रत्येक कृती करतो. मी पत्नी आणि मुले यांना साधनेविषयी सांगतो. ‘ईश्वर मला वेळोवेळी वेगवेगळी सूत्रे सुचवतो आणि माझ्याकडून ती सूत्रे आचरणात आणून घेतो’, अशी अनुभूती मला सतत येत असते.

५ ई. उच्चपदस्थ व्यक्तींना सनातननिर्मित देवतांची प्रतिमा किंवा सात्त्विक उत्पादने भेट देणे : मला विविध कार्यक्रमांत बोलावले जाते. तेव्हा मी त्यांना भेट स्वरूपात सनातननिर्मित श्रीकृष्ण किंवा श्री गणेश यांची प्रतिमा किंवा अन्य सात्त्विक उत्पादने देतो. मी उच्चपदस्थ अधिकार्‍यांना सनातनच्या साहित्याविषयी माहिती देऊन सनातनचे साहित्य भेट स्वरूपात देतो. नंतर ते स्वतःहून सनातनच्या साहित्याची मागणी करतात.

५ उ. नियुक्ती झालेल्या ठिकाणी आणि कार्यालयात सात्त्विकता निर्माण करण्याचा प्रयत्न करणे अन् सहकार्‍यांनाही त्यासाठी साहाय्य करणे : ‘माझी नियुक्ती झालेल्या ठिकाणी सभोवतीच्या प्रत्येक गोष्टीत सात्त्विकता कशी निर्माण होईल ?’, यासाठी मी जागरूक असतो. त्या संदर्भात मी चिंतन करून तात्काळ कृतीही करतो. ‘ज्या ठिकाणी स्वच्छता आणि नीटनेटकेपणा असतो, त्या ठिकाणी ईश्वराचा वास असतो’, हा प.पू. गुरुमाऊलींनी दिलेला दृष्टीकोन मी आचरणात आणतो, तसेच कार्यालयातील अन्य सहकार्‍यांना याविषयी सांगून त्यांनाही हे सूत्र आचरणात आणता येण्यासाठी साहाय्य करतो.

५ ऊ. ईश्वरी अधिष्ठान ठेवून कार्यालयीन कामे करणे आणि कार्यालयात होणार्‍या सर्व बैठकांतून सर्वांना तशा प्रकारची शिकवण देण्याचा प्रयत्न करणे

‘सामर्थ्य आहे चळवळेचें । जो जो करील तयाचें ।
परंतु येथें भगवंताचें । अधिष्ठान पाहिजे ।।’

– दासबोध, दशक २०, समास ४, ओवी २६

अर्थ : प्रत्येकामध्ये फार मोठी चळवळ करण्याचे सामर्थ्य असते. काही जण त्या दृष्टीने प्रयत्न करतातही; परंतु ते प्रयत्न यशस्वी होण्यासाठी त्या प्रयत्नांना भगवंताचे अधिष्ठान असणे अत्यंत आवश्यक आहे.

या उक्तीप्रमाणे मी भगवंताचे अधिष्ठान ठेवून कार्यालयातील सर्व कामे (थकबाकी वसुली करणे, ‘सर्व्हे’ करणे इत्यादी) करतो, तसेच कार्यालयातील सर्व बैठकांतून सर्वांना तशा प्रकारची शिकवण देण्याचा प्रयत्न करतो. सर्वच स्तरांवर निफाड उपविभागाचे नाव नेहमीच वरच्या क्रमांकावर असते. ‘गुरु सर्व करून घेत आहेत’, हे माझ्या लक्षात येते.

५ ए. गुरुदेवांच्या कृपेने साधकाला ‘शेतकरी ग्राहकांना सत्कार स्वरूपात जपमाळ भेट म्हणून देणे आणि साधना सांगणे’, असे करण्यास सुचणे आणि त्याचा चांगला परिणाम दिसून येणे : ‘कृषी वीज धोरण २०२०’ या योजनेच्या अंतर्गत शेतकरी बांधवांनी वीजदेयक पूर्ण भरल्यावर त्यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात येतो. असे सगळीकडेच होत असते. तेव्हा गुरुकृपेने माझ्याकडून ‘या सत्कारांच्या वेळी साधनेचा भाग कसा जोडता येईल ?’, असा विचार झाला. ‘अशा ग्राहकांना सनातनची २७ मण्यांची जपमाळ भेट म्हणून देणे आणि साधना सांगणे’, अशी सेवा गुरुदेवांच्या कृपेने मला सुचली अन् त्यांनी माझ्याकडून करून घेतली. त्याचा सकारात्मक परिणाम, म्हणजे ज्यांना जपमाळ दिली, त्यांनी इतरांना सांगितले आणि नंतर ग्राहक स्वतःहून विजेचे देयक भरू लागले. ग्राहक स्वतःहून जपमाळेची मागणी करू लागले.

(क्रमशः)

– श्री. नीलेश नागरे (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ४४ वर्षे), नाशिक (४.५.२०२३)

लेखाचा भाग ३  वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/827020.html