कोकणातील परकीय !

प्रतिकात्मक छायाचित्र

सृष्टीसौंदर्याने नटलेले; आंबा, काजू यांसारख्या फळबागांनी बहरलेले, लांब समुद्रकिनारा लाभलेले, अजून बर्‍याच प्रमाणात शहरीकरणापासून दूर असलेले कोकण ! तुरळक लोकवस्ती, भातशेतीवर उदरनिर्वाह करणारे, मासेमारी करणारे, शिक्षणापासून चार हात लांब असलेले, आंब्याच्या-काजूच्या बागात राबणार्‍या कोकणवासियांना आपले शांत आणि सुखी जीवन पालटण्याची अवदसा सुचली. येथे उद्योगधंदे, कारखाने नाहीत, शहरीकरण नाही, मोठे दवाखाने नाहीत, तर ‘शहरात जाऊन पैसा मिळवावा’, या विचाराने कोकणातील जवळजवळ प्रत्येक घरातील तरुणाई मुंबईकडे धावली. त्यांना मुंबईची भुरळ पडली. मुंबईत आल्यावर प्रथम कापड गिरणीत आणि नंतर नोकरी मिळेल तिथे काही सहस्र रुपयांसाठी दिवसभर काबाडकष्ट करू लागले. कोकणातून मुंबईला आलेल्या जवळजवळ ८० टक्के लोकांना हेच धकाधकीचे प्रदूषित जीवन जगावे लागत आहे. हेच कष्ट त्यांनी गावात राहून काहीतरी कामधंदा किंवा शेती करण्यात घालवले असते, तर तेवढे पैसे सहज मिळून सुखासमाधानाचे निसर्गाच्या सान्निध्यात प्रदूषणमुक्त जीवन जगता आले असते.

कोकणवासियांनी कोकण सोडल्यामुळे अन्य राज्यांतील लोकांनाही कोकणात रोजगार उपलब्ध झाला आहे. कोकणात अन्य धर्मांतील जवळजवळ स्थानिक आणि परकीय ७० टक्के लोक भाजी किंवा फळे विकणे, भंगार गोळा करणे, कोणतीही मजुरीची कामे करणे यांसारखे व्यवसाय करतात. त्यांना त्यात कमीपणा वाटत नाही. हापूस आंब्याच्या बागांत १ लाखांहून अधिक नेपाळी लोक काम करत आहेत. मासेमारांच्या नौकांवर ओडिशा, छत्तीसगड येथील शेकडो तरुण काम करतांना दिसत आहेत. कोकणी हॉटेल, रिसॉर्टमध्ये गढवाल (उत्तराखंड) आणि उत्तर भारतातील विविध राज्यांतून आलेल्या शेकडो तरुणांना रोजगार मिळाला आहे. बांधकाम क्षेत्रात विदर्भ, मराठवाडा आणि कर्नाटक येथील तरुणांनी चांगला जम बसवला आहे. शासकीय इमारती, पूल आणि रस्ते कर्नाटकातील व्यावसायिक बांधत आहेत. बेकरी व्यवसाय, अननस आणि रबर यांची शेती यांमध्ये केरळमधील तरुण घुसले आहेत. कोकणातील ५ सहस्र कोटी आंब्याची दलाली अन्य राज्यांतील लोक करतात. १५ सहस्र कोटी रुपयांचा मासेविक्री व्यवसाय उत्तर भारतियांनी कह्यात घेतला आहे. मिठाई, आईस्क्रीम आणि बांधकाम वस्तूंची दुकाने गुजराती अन् मारवाडी लोकांनी उभी केली आहेत. हे लोक मुलांसह येथील मातीशी एकरूप होतात. लक्षावधी परप्रांतियांना कोकणात रोजगार मिळतो; मात्र कोकणवासियांची घरे रिकामी झाली आहेत, ओस पडली आहेत, गावांचे वृद्धाश्रम झाले आहेत. हे सर्व चित्र पाहिल्यावर कुठे तरी काही तरी चुकत असल्याचे लक्षात येत आहे. कोकणवासियांची ‘चाकरमानी’ ही मानसिकता पालटली पाहिजे, याची जाणीव होते !

– श्री. अशोक लिमकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.