महाराष्ट्राची ‘जीवनवाहिनी’ म्हणून ‘एस्.टी.’कडे पाहिले जाते. एस्.टी.चे मोठ्या प्रमाणात खासगीकरण होत असल्यामुळे अपघातांची मालिकाच चालू झाली आहे. मध्यंतरीच्या कालावधीमध्ये शिवशाही बसगाड्यांच्या अपघात सत्रामुळे प्रवाशांनी शिवशाही बसने प्रवास करण्याचा धसकाच घेतला होता. गत ५ वर्षांत एस्.टी.चे १४ सहस्र ६७२ अपघात झाले आहेत. यामध्ये १ सहस्र ७८४ जणांना जीव गमवावा लागला आहे, तर १८ सहस्र ५५६ जण गंभीर घायाळ झाले आहेत. ‘ग्राहकांच्या सेवेसाठी…’, हे ब्रीद प्रत्यक्षात उतरवत ‘लाल परी’ राज्यातील दर्याखोर्यांतून प्रवाशांना इच्छित स्थळी सुरक्षित पोचवत होती; मात्र ‘खासगीकरण झाल्याने एस्.टी.वरील सरकारचे नियंत्रण न्यूून झाले आहे कि काय ?’, असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडत आहे. ज्या वेळी एस्.टी.वर सरकारचे पूर्ण नियंत्रण होते, तेव्हा अपघातांची संख्या अल्प होती. परिणामी चालक आणि वाहक यांना सुयोग्य प्रशिक्षण मिळत होते, तसेच कामाचा कालावधी ठरवून दिलेला असायचा. त्यामुळे सेवेचा कालावधी व्यवस्थित होता. परिणामी ग्राहकांना चांगल्या प्रतीची सेवा एस्.टी.कडून मिळत होती; मात्र ठराविक विभागातील खासगीकरणामुळे चालक आणि वाहक यांना कोणतेही प्रशिक्षण दिले जात नाही, तसेच त्यांचे मानधनही वेळेवर दिले जात नाही. त्यामुळे अल्प कालावधीमध्ये बस फेर्या उरकून घरी जाण्याचा सपाटा चालक-वाहक लावतात. याचा भुर्दंड अपघातांच्या स्वरूपात सामान्य जनतेला सोसावा लागतो. अपघातानंतर मृतांच्या नातेवाइकांना ५ लाख रुपयांचे अर्थसाहाय्य शासन करत असले, तरी गमावलेला जीव ते परत देऊ शकणार आहेत का ? मुंबईमधील ‘बेस्ट’ बसच्या ताफ्यामध्ये ३ सहस्रांपैकी २ सहस्र बसगाड्या या भाडेकरार तत्त्वावर चालवल्या जातात. या भाडेकरार तत्त्वाचा पुरवठा करणारा ठेकेदारच बसगाड्यांसाठी आवश्यक मनुष्यबळाची व्यवस्था करतो. त्यामध्ये बस चालक-वाहक आणि इतर घटक यांचा समावेश आहे. त्यामुळे अनेकदा नेमलेले बसचालक नवीन असतात. त्यांना मुंबईच्या रस्त्यावरील वर्दळीच्या ठिकाणी बसगाड्या चालवतांना विविध अडचणी येतात. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत चालले आहे.
वाहक अप्रशिक्षित असल्याने ‘ग्राहकांशी संवाद कसा साधायचा ?’, ‘येणार्या अडचणींवर मात कशी करायची ?’ हे न समजल्याने वाहक आणि ग्राहक यांच्यामध्येही बर्याचदा वादाचे प्रसंग उद्भवतात. एस्.टी. आता चांगला लाभ मिळवत आहे. महामंडळाने बसगाड्यांची अवस्था सुधारावी, कर्मचार्यांना योग्य प्रशिक्षण द्यावे, तसेच त्यांना वेळेत वेतन द्यावे. यामुळे एस्.टी. महामंडळाचा यशाचा आलेख चढता राहील. महामंडळ प्रशासनाने ‘प्रवाशांच्या सेवेसाठी…’ हे ब्रीद सत्यात उतरवावे, हीच अपेक्षा आहे.
– श्री. राहुल देवीदास कोल्हापुरे, सातारा.