
प्रयागराज, २० जानेवारी (वार्ता.) – १९ जानेवारी या दिवशी कुंभमेळ्यातील गीताप्रेसच्या २०० तंबूंना आग लागून त्या जळून खाक झाल्या. आगीत भस्म झालेल्या तंबूंच्या ठिकाणी शासनाकडून पुन्हा नव्याने तंबू उभारून दिले जाणार आहेत, अशी माहिती गीताभवनचे व्यवस्थापक श्री. गौरीशंकर मोहता यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीला दिली. २० जानेवारी सकाळपासून आगीत अर्धवट जळलेले साहित्य, राख आदी उचलण्याचे काम चालू करण्यात आले आहे. यानंतर या जागेवर पूर्ववत कुटी बनवण्याचे काम चालू करण्यात येणार आहे.

याविषयी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीला माहिती देतांना श्री. गौरीशंकर मोहता म्हणाले की, ‘दुर्घटनेनंतरही गीता प्रेसद्वारे चालणारे नियमितचा नित्यक्रम चालू आहेत. तंबू जळून खाक झाल्याने येथे रहात असलेल्या आमच्या सदस्यांना तात्पुरते आजूबाजूचे आखाडे आणि तंबू यांमध्ये स्थलांतरीत करण्यात आले आहे. शासनाकडून सर्वोतोपरी साहाय्य केले जात आहे. आगीत जळालेल्या जागेची स्वच्छता पूर्ण झाल्यावर येथे पुन्हा नवीन तंबू उभारण्याचे काम चालू केले जाईल.’’
भाविक, संतगण यांना प्रसाद देण्याचे कार्य चालू !
एकीकडे जळालेल्या तंबूंच्या ठिकाणी स्वच्छतेचे काम चालू असतांना, सदस्यांचे स्थलांतर होत असूनही गीताप्रेसकडून साधू संतगण आणि भाविक यांना नियमति प्रसाद देण्याचे कार्य सकाळपासूनच चालू करण्यात आले. २० जानेवारी सकाळी शेकडो साधूंनी गीताप्रेसच्या शिबिरामध्ये प्रसाद ग्रहण केला.