त्रिची (तमिळनाडू) येथे पार पडले ‘ज्योतिष आणि वास्तू अधिवेशन’ !
त्रिची (तमिळनाडू) – ज्योतिषी हा ईश्वराचा दूत आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये गर्व नको. एका ज्योतिषाने दुसर्या ज्योतिषाचा अपमान करू नये, त्यांना नावे ठेवू नये. असे करणे हे पाप आहे. एखाद्या ज्योतिषाला जे ठाऊक नाही, त्याविषयी ‘मी माझ्या गुरूंना विचारून सांगतो’, असे सांगणे अपेक्षित आहे.
ज्योतिषाचे आचार आणि कृती हे धर्मशास्त्राला धरून असावेत. ‘आपली चुकीची कृती वा वागणे यांमुळे ऋषीनिर्मित ज्योतिषशास्त्राचा अपमान होतो’, हे लक्षात ठेवावे. ज्योतिष आणि ज्योतिषशास्त्र यांना पुष्कळ न्यून लेखले जाते. याकडे दुर्लक्ष करून ‘आपण दैवी कार्य करत आहोत’, हा भाव ठेवावा आणि पुढे जावे. प्रत्येक ३-४ मासांनी अशा प्रकारचे अधिवेशन आयोजित करावे. सर्व ज्योतिषी एकत्र आल्यास आपल्याला एकमेकांकडून शिकता येईल आणि त्यातून संघटित भाव निर्माण होईल. अधिवेशनात ज्योतिषींनी विविध विषयांवरील चर्चेत सहभागी होऊन प्रश्न विचारावेत, जेणेकरून आपल्याला ज्ञान मिळेल. ‘भगवंताने ज्योतिषशास्त्र मनुष्याला का दिले असेल ?’, असा प्रश्न विचारून आपण मूळ विषयापर्यंत जायला हवे, असे मार्गदर्शन सप्तर्षी जीवनाडीपट्टीवाचक पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांनी केले.
संपूर्ण विश्वामध्ये रामराज्य निर्माण करण्यासाठी ज्योतिषींनी शास्त्रानुसार उपाय सुचवावेत ! – श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ, सनातन संस्था
सप्तर्षी जीवनाडीपट्टीमध्ये येणारे संदेश पू. डॉ. ॐ उलगनाथन्जी हे आपल्याला नेहमी सांगत असतात. सप्तर्षी जीवनाडीपट्टीच्या वाचनातून विनाशकाळाविषयीही ते आपल्याला सतर्क करत असतात. सध्या संपूर्ण जगावर विनाशकाळ घोंगावत आहे. त्यापासून रक्षण होण्यासाठी आणि संपूर्ण विश्वामध्ये रामराज्य निर्माण करण्यासाठी ज्योतिषींनी आम्हाला मार्गदर्शन करावे. याचसमवेत राष्ट्राचे भवितव्य काय आहे ? हेही आम्हाला ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून सांगावे, जेणेकरून तीव्र साधना करून भारतासह संपूर्ण विश्वामध्ये शांती निर्माण करता येईल.
त्रिची (तमिळनाडू) येथे ११ ऑगस्ट २०२४ या दिवशी आयोजित केलेल्या ‘ज्योतिष आणि वास्तू अधिवेशना’च्या उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करतांना ते मार्गदर्शन करत होते. या अधिवेशनाचे उद्घाटन पू. डॉ. ॐ उलगनाथन्, त्रिची येथील अरममिगु अडीगल स्वामीजी आणि सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
या अधिवेशनाचे आयोजन श्री. ए.एन्. राजशेखर यांनी केले असून श्री. संथना कृष्णन् हे त्याचे सहआयोजक आहेत. या अधिवेशनात १०० हून अधिक ज्योतिषी सहभागी झाले होते.