सातारा येथे शिक्षक संघटनांचा भव्य मोर्चा !

शिक्षक संघटनांनी सातारा येथे भव्य मोर्चा काढला

सातारा, ८ ऑगस्ट (वार्ता.) – विविध मागण्यांसाठी २७ हून अधिक शिक्षक संघटनांनी सातारा येथे भव्य मोर्चा काढला. राजवाडा येथून चालू झालेला मोर्चा शिवतीर्थमार्गे जिल्हाधिकारी कार्यालय येथे पोचल्यावर मोर्च्याचे रूपांतर सभेत झाले. मान्यवरांची भाषणे झाल्यानंतर शिक्षक संघटनांच्या शिष्टमंडळाच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनामध्ये केलेल्या विविध मागण्या

१. शासनाकडे विविध मागण्या प्रलंबित असून १५ मार्च २०२४ या दिवशी भरती झालेल्या सेवकांच्या शासन निर्णयात दुरुस्ती करण्यात यावी.

२. जिथे शाळा तेथे मुख्याध्यापक पद संमत करण्यात यावे.

३. १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त विनाअनुदानित, अंशतः अनुदानित, अर्धवेळ शिक्षक, शिक्षणसेवक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांना ‘जुनी पेन्शन योजना’ लागू करावी.

४. प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेला टप्पा अनुदान प्रचलित पद्धतीने द्यावे.

५. शाळेच्या वर्षांचा विचार करून १०० टक्के अनुदान घोषित करावे.

६. ‘पवित्र पोर्टल’द्वारे शिक्षक नियुक्ती करावी.

७. संस्थेला शिक्षक नियुक्तीसाठी अनुमती द्यावी.

८. शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांच्या भरतीस मान्यता मिळावी.

९. चतुर्थश्रेणी कर्मचार्‍यांची मानधनावर नेमणूक करण्याऐवजी पूर्वीप्रमाणे वेतनावर नेमणूक व्हावी.

१०. अल्पभाषिक आणि अल्पसंख्यांक शाळांतील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागांतील रिक्त पदांची १०० टक्के शिक्षक भरती करण्याची अनुमती मिळावी.

११. शाळांमध्ये कला आणि क्रीडा शिक्षकांची पदे भरण्यास अनुमती मिळावी.