दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : सैफ अली खान घरी परतला; भांडुपमधील बंद मॉलमध्ये मृतदेह…


सैफ अली खान घरी परतला

मुंबई – १६ जानेवारी या दिवशी झालेल्या आक्रमणानंतर लिलावती रुग्णालयात भरती असलेला अभिनेता सैफ अली खान २१ जानेवारी या दिवशी घरी परतला. चोरी करण्यासाठी आलेल्या बांगलादेशी कुस्तीपटूने त्याच्यावर आक्रमण करून त्याला घायाळ केले होते. यानंतर बांगलादेशी घुसखोरांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.


भांडुपमधील बंद मॉलमध्ये मृतदेह

मुंबई – भांडुप येथे काही महिन्यांपासून बंद अवस्थेत असलेल्या ‘ड्रीम्स मॉल’मध्ये एका महिलेचा मृतदेह आढळला. ही महिला ३५ ते ४० वर्षे वयाची असल्याचा प्राथमिक अंदाज आहे; मात्र अद्याप तिची ओळख पटलेली नाही. २१ जानेवारीला सकाळी मॉलच्या तळघरामध्ये साचलेल्या पाण्यात हा मृतदेह तरंगताना आढळला. कालही एका वृद्ध महिलेचा मृतदेह मरीन ड्राईव्ह येथील हॉटेल ट्रायडंटमध्ये आढळला होता.


२४ आणि २५ जानेवारीला पश्चिम रेल्वेवर ‘ब्लॉक’

(‘ब्लॉक’ म्हणजे तांत्रिक कामांसाठी लोकलगाड्यांच्या बंद ठेवणे किंवा त्याच्या वेळा पालटणे)

मुंबई –  पश्चिम उपनगरात रहाणार्‍या आणि प्रवासासाठी पश्चिम रेल्वेवर अवलंबून असलेल्या प्रवाशांना येत्या २४ आणि २५ जानेवारी या दिवशी कामावरून घराकडे लवकर परतावे लागणार आहे; कारण माहीम आणि वांद्रे स्थानकादरम्यान पूल क्रमांक २० च्या पुनर्बांधणीसाठी शेवटच्या लोकलगाड्यांमधील वेळांत पालट करण्यात आला आहे.


नाशिक येथे पाण्यासाठी नागरिक रस्त्यावर

नाशिक – येथील मखमलाबाद रोडवरील अनेक भागात बर्‍याच वर्षांपासून एकाच वेळेस पाणीपुरवठा होत असल्यामुळे नागरिक संतप्त झाले. संतप्त नागरिकांनी ‘रस्ता बंद’ आंदोलन केले. या वेळी नागरिकांनी हातात फलक धरले होते.

संपादकीय भूमिका: स्वातंत्र्याच्या ७७ वर्षांनंतरही पाण्यासारख्या मूलभूत सुविधेसाठी नागरिकांना रस्त्यावर यावे लागणे प्रशासनाला लज्जास्पद !


मुंबई शेअर बाजार चढला आणि कोसळला !

मुंबई – अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा शपथग्रहण सोहळा २० जानेवारी या दिवशी भारतीय वेळेनुसार रात्री पार पडला. या वेळी त्यांनी विविध घोषणा केल्या. त्यांच्या धोरणांचा भारतालाही लाभ होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई शेअर बाजार २१ जानेवारी या दिवशी सकाळी जोरदार वर चढला; मात्र दुपारी बाजार मोठ्या प्रमाणात कोसळला. अमेरिकेने कॅनडा आणि मॅक्सिको यांच्यावर २५ टक्के कर लादण्याची घोषणा केल्याने जगभरात उलथापालथ होऊ शकते, असे तज्ञांचे म्हणणे आहे. याचा परिणाम मुंबई शेअर बाजारावरही झाला.