Baba Ramdev : आम्‍ही बांगलादेश निर्माण करू शकतो, तर हिंदूंच्‍या रक्षणासाठी हस्‍तक्षेपही करू शकतो ! – योगऋषी रामदेवबाबा

योगऋषी रामदेवबाबा यांची स्‍पष्‍टोक्‍ती !

हरिद्वार (उत्तराखंड) – बांगलादेशामध्‍ये हिंसाचार शिगेला पोचला आहे. जमात-ए-इस्‍लामी आणि सर्व कट्टरतावादी शक्‍ती त्‍यांचे क्रौर्य दाखवत आहेत. अशा कोणत्‍याही घटनेची पुनरावृत्ती होता कामा नये. ते खपवून घेतले जाणार नाही. जर आपण बांगलादेश निर्माण करू शकलो, तर आपल्‍या हिंदु बांधवांच्‍या रक्षणासाठी तिथेही हस्‍तक्षेप करू शकतो, असे विधान योगऋषी रामदेव बाबा यांनी केले आहेत.

जगाला हिंदूंची शक्‍ती दाखवावी लागेल !

रामदेवबाबा पुढे म्‍हणाले की, बांगलादेशातील आपल्‍या हिंदु बांधवांवर कोणताही अत्‍याचार, अतिरेक किंवा अन्‍याय होणार नाही, याची निश्‍चिती करण्‍यासाठी संपूर्ण देशाला एकजूट रहावे लागेल. जगात ज्‍या प्रकारे इस्‍लामी कट्टरतावाद वाढत आहे आणि आता भारताच्‍या शेजारीही त्‍याने दार ठोठावले आहे, ते आपल्‍या देशासाठी अत्‍यंत घातक ठरू शकते. हिंदु मुलींच्‍या सन्‍मानाचा प्रश्‍न ऐरणीवर येण्‍याची भीती वाटते. इस्‍लामी कट्टरपंथी बांगलादेशातील हिंदूंवर जे करत आहेत, ते चुकीचे आहे. आपल्‍याला भारतात एकत्र येऊन हिंदूंची शक्‍ती जगाला दाखवावी लागेल. इस्‍लामी कट्टरपंथीयांच्‍या बाजूने काही राजकीय लोक, सामाजिक आणि धार्मिक आतंकवादी बोलत आहेत. त्‍यांना बांगलादेशासारखी परिस्‍थिती भारतात व्‍हावी, असे वाटते. अशा लोकांनाही रोखावे लागेल.