India Russia Relations : ‘रशियाशी चांगले संबंध आहेत’, या कारणामुळे भारतावर दबाव आणणे अयोग्य ! – सर्गेई लॅवरोव्ह, परराष्ट्रमंत्री, रशिया

रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लॅवरोव्ह यांची भारताची बाजू घेत पाश्‍चात्त्य देशांवर टीका

सर्गेई लॅवरोव्ह

न्यूयॉर्क (अमेरिका) – माझा विश्‍वास आहे की, भारत ही एक महान शक्ती आहे, जी स्वतःचे राष्ट्रीय हित ठरवते आणि स्वतःचे भागीदार निवडते. आम्हाला ठाऊक आहे की, भारतावर प्रचंड दबाव आहे, जो पूर्णपणे अन्यायकारक आहे, असे विधान रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लॅवरोव्ह (Sergey Lavrov) यांनी केले आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यात नुकत्याच झालेल्या बैठकीवरील युक्रेनच्या टिप्पण्यांना लॅवरोव्ह यांनी ‘अपमानास्पद’ म्हटले आहे. ते येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

१. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की यांनी पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या भेटीवर म्हटले होते, ‘जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीच्या नेत्याने मॉस्कोमध्ये जगातील सर्वांत मोठ्या खुनी गुन्हेगाराला मिठी मारतांना पहाणे फार निराशाजनक आहे. हा शांततेच्या प्रयत्नांना धक्का आहे.’ त्यांच्या या वक्तव्यावर भारताने अप्रसन्नता व्यक्त केली होती.

२. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की यांच्या वक्तव्याचा संदर्भ देत लॅवरोव्ह म्हणाले, ‘‘हे अतिशय अपमानास्पद होते. याविषयी युक्रेनच्या राजदूताला बोलावून जाब विचारण्यात आला.’’ युक्रेनच्या काही राजदूतांनी केलेल्या टिप्पण्यांचा संदर्भ देत लावरोव्ह म्हणाले की, राजदूत खरोखरच गुंड असल्यासारखे वागत होते. त्यामुळे मला वाटते की, भारत सर्वकाही ठीक करत आहे.

३. लॅवरोव्ह यांनी नमूद केले की, भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी पाश्‍चिमात्य देशांना भेट दिल्यानंतर या प्रश्‍नांची उत्तरे दिली आहेत, ज्यामध्ये भारत रशियाकडून अधिक तेल का खरेदी करत आहे ?, याही प्रश्‍नाचा समावेश आहे. जयशंकर यांनी काही निर्बंध असूनही पाश्‍चात्त्य देशांनी रशियाकडून गॅस आणि तेल यांची खरेदी वाढवली असल्याचे दर्शवणारी आकडेवारी उद्धृत केली. भारत स्वत: ठरवेल की, कुणाशी  कसा व्यवहार करायचा आणि स्वतःच्या राष्ट्रीय हितांचे संरक्षण कसे करायचे ?