सध्या वाढत असलेले पचनाचे त्रास, तसेच घसादुखी, ताप आणि सर्दी या आजारांविषयी पाळावयाचे नियम !

पावसाळ्यात काय काळजी घ्यावी ? याविषयीचे लिखाण २२ जून २०२४ या दिवशीच्या दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध केलेले आहे; पण सध्याचे पचन आणि घसा, ताप, सर्दी या आजारांचे रुग्ण बघता पुढील काही नियम पाळायला हवेत –

१. रात्री ८ वाजण्याच्या आत जेवण किंवा हलका आहार (घावन / फुलका /फळभाजी / भाताचे प्रकार) घ्यावा.

वैद्या(सौ.) स्वराली शेंड्ये

२. विशेषतः प्रदूषित शहरात रहाणार्‍या आणि गाडीवर फिरणार्‍या लोकांनी ‘मास्क’ (मुखपट्टी) अन् हेल्मेट (शिरस्त्राण) घालणे.

३. सतत आले किंवा बाकी मसाले अधिक प्रमाणात घालून केलेले काढे न पिणे.

४. सांधेदुखी, सर्दी इत्यादी बळावू नये; म्हणून वातानुकूलित खोलीमध्ये (‘एसी’मध्ये) अपरिहार्य काम असता कानात कापूस बोळे, जॅकेट अथवा स्वेटर घालणे. स्वतःला सर्दी किंवा घसादुखी असतांना ‘मास्क’ वापरणे. लोकांमध्ये काम करत असतांना दिवसातून एकदा कोमट पाणी आणि हळद यांच्या गुळण्या करणे.

५. ज्येष्ठ व्यक्ती आणि पचन मंद असणार्‍या व्यक्तींनी जेवतांना कोमट पाणी पिणे.

६. पोट साफ ठेवण्यासाठी प्रयत्न करणे. त्यासाठी त्रिफळा किंवा विकत आणलेल्या विविध पावडर न घेता पोट साफ होण्यासाठी वेगच येत नसल्यास, तसेच अग्नी चांगला ठेवण्यासाठी हलका आहार अन् खाण्याची पथ्ये शक्यतो पाळावीत. शौचाला खडा होत असल्यास मनुका, दूध आणि तूप घ्यावे. हे घेऊनही शौचाला व्यवस्थित न झाल्यास वा आजार बरा होत नसल्यास आपल्या वैद्यांना विचारावे.

– वैद्या (सौ.) स्वराली शेंड्ये, यशप्रभा आयुर्वेद, पुणे. (९.७.२०२४)