थंडीतील आजारपणे आणि त्यावर घ्यावयाचे उपचार !

वैद्या (सौ.) स्वराली शेंड्ये

शहरातील आणि गावातील थंडी ही वेगळी असते. शहरातील थंडीमध्ये आजारपणे येतात. सध्या परत सर्दी, खोकला यांचे रुग्ण वाढले आहेत. शहरांमध्ये वेड्यासारखे चालू असणारे बांधकाम, सततचे नूतनीकरण, न्यून झालेली झाडे यांमुळे आसपासच्या हवेमध्ये तरंगत रहाणारे धूलिकण, सिमेंटचे कण हे प्रदूषण करणारे घटक हे थंडीतील हवा जड असल्याने उडून न जाता आपल्या आसपासच्या हवेत अधिक रहातात, ज्यामुळे मुख्यत्वेकरून श्‍वसनासंबंधी त्रास आणि त्या संसर्गाने ताप लक्षणे उत्पन्न होतात. धुके हे ‘फॉग’ नसून ‘स्मॉग’ (धुके आणि धूर यांचे मिश्रण) वर्गातील असते.

या थंडीत सर्दी, खोकला इत्यादी ‘अ‍ॅलर्जी’चे रोग होत रहातात. त्यामुळे तुम्ही कुठे कुठे वाचले असेल की, ‘थंडीमध्ये आरोग्य उत्तम रहाते, माणूस आजारी पडत नाही’; पण असे प्रत्यक्षात दिसत नाही. अशा वेळी सरधोपटपणे ‘अग्नी उत्तम असतो, चला आता काहीही खाऊ-पिऊ’, असा दृष्टीकोन त्रासदायक ठरतो. शहरात तरी थंडीमध्ये प्रदूषणाची घनता आजूबाजूच्या हवेत अधिक टिकून रहात असल्याने लोक आजारी पडतांना दिसतात.

आपण काय करू शकतो ?

१. मुख्यतः नियमित व्यायाम आणि श्‍वसनाचे व्यायाम करण्याची सवय लावायला प्रारंभ करा. शरिरात गेलेल्या प्रदूषकाने होणारे आजार याने टळतात.

२. स्वतःचा नियमित व्यायाम नसेल आणि कफाचे वारंवार त्रास होत असतील, तर थंडीमध्ये विशेषकरून ‘भरपूर पालेभाज्या आणि फळे खा, पाणी भरपूर प्या’, हा सल्ला अजिबात ऐकू नका. याविषयी कुठल्याच गोष्टीत टोक गाठू नका.

३. घरातून बाहेर पडतांना नाकपुड्यांमध्ये तूपाचे बोट फिरवा.

४. सुंठ, मिरी, आले, लसूण हे मसाल्याचे पदार्थ आहारात असू दे. त्यासह तूप, लोणी हे स्निग्धांशही असले पाहिजेत. मिरचीसारखे दाह वाढवणारे पदार्थ मात्र टाळा.

५. कोमट पाणी, उकळून आटवलेले पाणी आणि तहान लागेल तेवढेच पाणी पिण्याची सवय कायमसाठी उपयोगी आहे.

६. वास्तूविशारद (आर्किटेक्ट), ‘इंटेरियर डेकोरेटर’ (वास्तूची अंतर्गत रचना), फर्निचर व्यवसाय इत्यादी व्यवसायांच्या संबंधाने होणारा त्रास टाळण्यासाठी मुखपट्टीचा वापर करायला हरकत नाही.

या व्यतिरिक्त ‘आयुर्वेदाची दिनचर्या, ऋतुप्रमाणे वर्तणूक, कुठलेही टोक न गाठता डोळे उघडे ठेवून आजूबाजूच्या वातावरणात पालट होतील, तसे स्वतःमध्ये पालट करत जाणे’, हे केले, तर आरोग्याविषयक बरेचसे छोटे-मोठे त्रास टळतात. त्यातून कधीही त्रास झाल्यास आयुर्वेद वैद्यांचा सल्ला आर्वजून घ्या.

– वैद्या (सौ.) स्वराली शेंड्ये, यशप्रभा आयुर्वेद, पुणे.

थंडीत आपल्या मुलांच्या पायांना रात्री झोपण्याआधी औषधी सिद्ध तेल (तीळ तेल / त्यापासून बनवलेले तेल) नक्की लावा. संपूर्ण पायाला प्रतिदिन शक्य नसले, तरी गुडघा, पोटरी आणि तळवे यांना तेल नक्की लावा. यासह स्वतःचे पाय आणि मणका यांनाही तेलाचा हात फिरवा. – वैद्या (सौ.) स्वराली शेंड्ये