सरकारने हिंदु समाजाच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये !

धुळे येथे सकल हिंदु समाजाकडून जिल्हा प्रशासनाला निवेदन

निवेदन देण्यासाठी जमलेले विविध संघटनांचे हिंदुत्वनिष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्ते

धुळे, ९ जुलै (वार्ता.) – छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले महाराष्ट्रातील गडदुर्ग म्हणजे महाराष्ट्राचे वैभव आहेत; मात्र त्यांच्या संवर्धनाकडे महाराष्ट्र सरकारने अक्षम्य दुर्लक्ष केलेले आहे. आता या गडदुर्गांवर अनधिकृत बांधकामे करून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वैभवावरच दरोडा टाकला जात आहे. यामुळे समस्त हिंदु समाजात संतापाचे वातावरण आहे. सरकारने हिंदु समाजाच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. छत्रपती शिवरायांच्या गडदुर्गांचे विद्रूपीकरण करणारी अनधिकृत बांधकामे पाडून संबंधितांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी येथील सकल हिंदु समाजाकडून करण्यात आली. यासंदर्भात ९ जुलै या दिवशी शहरातील राणाप्रताप चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पदयात्रेद्वारे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले.

आंदोलनात सहभागी संघटना आणि राजकीय पक्ष !

विशाळगड मुक्तीसंग्रामाच्या या आंदोलनास भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, ठाकरे पक्ष, विश्व हिंदु परिषद, बजरंग दल, हिंदु जनजागृती समिती, किल्ले लळींग संवर्धन समिती, चंद्रशेखर आझाद शिवजयंती उत्सव समिती, हिंदु एकता आंदोलन, साक्रीरोड शिवजयंती उत्सव समिती, हिंदु राष्ट्र सेना, स्वराज्य फाऊंडेशन, छत्रपती फाऊंडेशन, इंदिरा महिला बचत गट, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्यासह अनेकांनी जाहीर पाठिंबा दिला आहे.