सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी एका शिबिरासाठी केलेले आध्यात्मिक स्तरावरील उपाय

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ

‘२ ते ७ जुलै २०२४ या कालावधीत रामनाथी, फोंडा, गोवा येथील सनातन संस्थेच्या आश्रमात साधकांसाठी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर प्रतिदिन सकाळी ९.३० वाजता आरंभ होते आणि रात्री ११.३० पर्यंत चालते. यामध्ये साधकांना मार्गदर्शन करण्यासाठी धर्मप्रचारक संतही सहभागी झाले आहेत. या शिबिरामध्ये जे काही अडथळे आले, तसेच धर्मप्रचारक संतांना जे त्रास झाले, त्यांवर केलेले नामजपादी आध्यात्मिक उपाय येथे दिले आहेत.

२.७.२०२४ (शिबिराचा पहिला दिवस)

१. सकाळी ११.३० वाजता धर्मप्रचारक सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांचा घसा दुखू लागणे

मी त्यांच्यासाठी उपाय शोधले असता मला ‘निर्गुण’ हा नामजप मिळाला आणि सहस्रार अन् विशुद्धचक्र ही स्थाने मिळाली. मी ‘माझा देह हा त्यांचाच आहे’, असा भाव ठेवून स्वतःवर उपाय केले. मी माझ्या उजव्या हाताचा तळवा सहस्रारच्या वर १ – २ सें.मी. अंतरावर धरून आणि डाव्या हाताचा तळवा विशुद्धचक्राच्या समोर १ – २ सें.मी. अंतरावर धरून उपाय केले. १५ – २० मिनिटे उपाय केल्यावर मला लक्षात आले, ‘आता सद्गुरु नीलेशदादा यांच्या मणिपूरचक्रावर त्रास जाणवत आहे’; म्हणून मी माझ्या डाव्या हाताचा तळवा आता विशुद्धचक्राऐवजी मणिपूरचक्रासमोर १ – २ सें.मी. अंतरावर धरला अन् ‘महाशून्य’, हा नामजप करू लागलो. पोटामध्ये पोकळी असल्याने वाईट शक्तींना तेथे त्रासदायक शक्ती साठवणे सोपे असते; म्हणून बहुतेक वेळा ‘मणिपूरचक्र’ हे उपायांचे स्थान येते. मणिपूरचक्रावर २० मिनिटे उपाय केल्यावर सद्गुरु नीलेशदादा यांचा त्रास दूर झाल्याचे मला जाणवले; म्हणून मी उपाय करणे थांबवले.

२. शिबिर चालू असलेल्या सभागृहात दाब जाणवत असणे

दुपारी ३ वाजता मला शिबिरातील एका साधकाने सभागृहात दाब जाणवत असल्याचे सांगितले. तेव्हा सूक्ष्मातून परीक्षण केल्यावर  ‘शिबिराचे व्यासपीठ असलेल्या दिशेकडून त्रासदायक शक्ती येत आहे आणि त्यामुळे सभागृहात दाब जाणवत आहे’, असे जाणवले. यावरून ‘अनिष्ट शक्ती आक्रमण करण्यात किती हुशार असतात’, हे लक्षात येते. व्यासपीठ असलेल्या दिशेकडून त्रासदायक शक्ती सोडल्याने अनिष्ट शक्तींना व्यासपिठावर असलेल्या मार्गदर्शकांना, तसेच व्यासपिठासमोर असलेल्या साधकांना एकाच वेळी त्रास देता येत होता. या त्रासावर उपाय म्हणून मी व्यासपिठाकडे तोंड करून ३ – ४ रिकामे खोके लावायला सांगितले. (‘एक बाजू उघडी असलेला रिकामा खोका त्रासदायक शक्ती येत असलेल्या दिशेकडे त्याच्या उघड्या बाजूचे तोंड करून ठेवल्यास येणारी त्रासदायक शक्ती तो खोका आकर्षित करून घेतो आणि ती त्रासदायक शक्ती आपल्या पोकळीमध्ये नष्ट करतो. त्यामुळे त्या त्रासदायक शक्तीचा त्रास होणे थांबते.’ – संकलक) अशा प्रकारे खोक्यांचे उपाय केल्यावर २ – ३ मिनिटांतच सभागृहात जाणवणारा दाब दूर झाला.

३. सायंकाळी ५.२० वाजता सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांना त्यांच्या शरिराची उजवी बाजू दुखत असल्याचे जाणवणे 

मी सूक्ष्मातून परीक्षण केल्यावर मला लक्षात आले, ‘सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या शरिराच्या केवळ उजव्या भागावर त्रासदायक शक्तीचे आवरण आले आहे.’ मी सद्गुरु डॉ. पिंगळे यांच्यासाठी माझ्या शरिरावर उपाय केले. प्रथम मी ‘माझ्या उजव्या हाताचा तळवा माझ्या शरिराच्या दिशेने आणि त्यावर माझ्या डाव्या हाताचा तळवा बाहेरच्या दिशेने ठेवणे’, अशी मुद्रा केली. ती मुद्रा मी माझ्या सहस्रारपासून ते स्वाधिष्ठानचक्रापर्यंत असलेल्या प्रत्येक चक्रासमोर १ – २ सें.मी. अंतरावर आणि १ – २ मिनिटे धरली. तेव्हा मी ‘निर्गुण’ हा नामजप केला. त्यामुळे ‘सद्गुरु डॉ. पिंगळे यांच्या शरिरावर असलेले त्रासदायक शक्तीचे आवरण नष्ट झाले आहे’, असे मला जाणवले. मी हे उपाय १५ मिनिटे केले. त्यानंतर सद्गुरु डॉ. पिंगळे यांना ७० टक्के बरे वाटू लागले.

४. सायंकाळी ५.४० वाजता धर्मप्रचारक पू. रमानंद गौडा यांना ताप आल्यासारखे वाटू लागणे

मी पू. रमानंद गौडा यांच्यासाठी स्वतःचे सहस्रार आणि अनाहतचक्र यांच्यावर ‘महाशून्य’ हा नामजप करत १५ मिनिटे उपाय केले. त्यानंतर त्यांना थोड्या प्रमाणात बरे वाटू लागले. डॉक्टरांनी त्यांना औषधही दिले.

५. सायंकाळी ६ वाजता संतांना ग्लानी येत असणे

मी सर्व संतांसाठी एकत्रित नामजपादी उपाय केले. प्रथम मी सर्वांवरचे त्रासदायक शक्तीचे आवरण काढले. शरिरावर आवरण येणे, हे ग्लानी येण्याचे एक कारण आहे. त्यानंतर मी ध्यान लावून सर्व संतांसाठी १० मिनिटे उपाय केले.

३.७.२०२४ (शिबिराचा दुसरा दिवस)

१. सकाळी ८.२० वाजता श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे डोके, पाठ आणि पाय दुखत असणे

तेव्हा श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई यांच्या शरिरावर त्रासदायक शक्तीचे आवरण आले होते. प्रथम मी ते आवरण काढले. त्यानंतर मी माझे सहस्रार आणि मणिपूरचक्र यांच्यावर वरीलप्रमाणे न्यास करून ‘निर्गुण’ हा नामजप करत श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई यांच्यासाठी २५ मिनिटे उपाय केले.

२. सद्गुरु नीलेश सिंगबाळ, तसेच आणखी ३ संत यांना ग्लानीमुळे झोपेतून उठता न येणे आणि त्यामुळे शिबिराला वेळेवर जाता न येणे

मला सकाळी ९.३० वाजता याविषयी सांगण्यात आले. मी लगेचच त्या संतांसाठी सामूहिक उपाय करणे आरंभ केले. प्रथम मी त्यांच्यावरचे त्रासदायक शक्तीचे आवरण काढले. त्यानंतर माझे सहस्रार आणि अनाहतचक्र यांवर वरीलप्रमाणे न्यास करून ‘महाशून्य’ हा नामजप करत २० मिनिटे उपाय केले. या उपायांमुळे ते संत सकाळी सव्वा दहा वाजेपर्यंत शिबिरात पोचू शकले. शिबीराला आरंभ होण्याची वेळ सकाळी ९.३० ही होती.

३. सकाळी १०.२० वाजता धर्मप्रसारक सद्गुरु अनुराधा वाडेकर यांनी शिबिरात दाब जाणवत असल्याचे कळवणे

तेव्हा अनिष्ट शक्ती वरून त्रासदायक शक्ती सोडत असल्याचे जाणवले. अनिष्ट शक्ती अशा प्रकारे दाब निर्माण करून सर्वांवर आक्रमण करतात. त्यामुळे झोप येणे, अस्वस्थ वाटणे, उत्साह न वाटणे, न सुचणे, विषयाचे आकलन न होणे इत्यादी त्रास होतात. असे झाल्यावर शिबिराची किंवा सत्संगाची फलनिष्पत्ती पूर्ण मिळत नाही. सभागृहात जाणवणारा दाब दूर होण्यासाठी मी व्यासपिठावर ३ – ४ खोके वरच्या दिशेला तोंड करून लावण्यास सांगितले. तसे केल्यावर दाब दूर झाला.

४. सकाळी १०.५५ वाजता शिबिरात पुन्हा दाब जाणवू लागणे

या वेळी मी व्यासपिठाच्या दिशेने खोके लावण्यास सांगितले. त्यामुळे दाब दूर झाला.

५. रात्री ८ वाजता धर्मप्रचारक पू. (सौ.) संगीता जाधव यांची कंबर दुखू लागणे

मला पू. जाधवकाकू यांचे स्वाधिष्ठानचक्र आणि सहस्रार यांवर त्रास जाणवला. तो दूर होण्यासाठी मी माझ्या त्या स्थानांवर वरीलप्रमाणे न्यास करून ‘महाशून्य’ हा नामजप करत उपाय केले. हे उपाय ३० मिनिटे केल्यावर पू. जाधवकाकू यांचा त्रास दूर झाल्याचे मला जाणवले. तेव्हा त्यांना याविषयी विचारल्यावर त्यांचीही कंबरदुखी दूर झाली होती.’

– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, पीएच्.डी., महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (४.७.२०२४)

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.

आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.