१. ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना मनातील त्रासदायक विचार सांगूया’, असा विचार आल्यापासून त्रासदायक विचार न्यून होऊन त्रासही उणावणे
‘मे २०२४ मध्ये माझ्या मनात भूतकाळातील काही प्रसंगांचे विचार येत होते. त्यामुळे माझे मन अस्थिर होऊन नियमित होणारे साधनेचे प्रयत्न करण्यास अडथळे निर्माण होत होते. माझ्या स्तरावर प्रयत्न करूनही मला त्यातून बाहेर पडता येत नव्हते. २ – ३ दिवसानंतर माझ्या मनात विचार आला, ‘हे सर्व विचार श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना सांगूया’, केवळ हा विचार आल्यापासून माझ्या मनातील त्रासदायक विचार न्यून होऊन मला होणारा त्रासही ६५ ते ७० टक्के उणावला.
२. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना आत्मनिवेदन पत्ररूपात लिहिल्यावर मनातील त्रासदायक विचार नष्ट होऊन आनंद अनुभवता येणे अन् साधनेचे प्रयत्न सहजतेने होणे
दुसर्या दिवशी मी श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांना सांगण्यासाठी आत्मनिवेदन पत्ररूपात लिहून काढले. नंतर लगेच माझ्या मनातील सर्व त्रासदायक विचार नष्ट झाले आणि माझे मन हलके झाले. मला आतून स्थिरता आणि आनंद अनुभवता येऊ लागला. माझे व्यष्टी साधनेचे प्रयत्न सहजतेने होऊ लागले. माझ्या मनाची सकारात्मकता आणि उत्साह यात वाढ झाली.
३. ‘संत आणि गुरु यांना सर्व कळत असून ते सर्वज्ञानी असणे अन् ते प्रत्येक क्षणी भक्तांची काळजी घेत असणे’, याची प्रचीती येणे
माझ्या मनातील विचार केवळ आत्मनिवेदन रूपात लिहून काढल्यावर श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांना ते देण्यापूर्वीच मला त्यांच्या कृपेचा लाभ झाला. संत आणि गुरु यांना सर्व कळतच असते. ते सर्वज्ञानी असतात. ‘प्रत्येक क्षणी ते भक्तांची काळजी घेत असतात’, याची प्रचीती या प्रसंगात भगवंताच्या कृपेने मला अनुभवता आली.
‘गुरूंचे अस्तित्व कार्य कसे करते ? भगवंत भक्ताच्या हाकेला धावून कसा येतो ?’, हे या अनुभूतीतून मला शिकायला मिळाले. मी परम पूज्य गुरुमाऊली (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) आणि श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या सुकोमल चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते. ‘आपली अखंड कृपादृष्टी आमच्यावर राहू दे’, अशी प्रार्थना !’
– कु. विद्या विलास गरुड, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१३.५.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |