पालट हवा; पण तारतम्याने !

प्रतिकात्मक छायाचित्र

साधारण ५०-६० वर्षे वय असलेली व्यक्ती जुन्या आठवणींना उजाळा देते, तेव्हा तिच्या चेहर्‍यावर येणारे समाधान आणि आनंद यांचा परिणाम म्हणून ऐकणारी व्यक्तीही ते क्षण अनुभवून सुखावते. पूर्वी मनोरंजनाची साधने किरकोळ होती. वर्षभरात येणारे विविध सण, उत्सव, सुट्टीत गावी येणारे, तसेच विवाह, मुंज यांसाठी ८-१० दिवस आधी येणारे नातेवाईक हाच काय तो पालट ! हेच मनोरंजन ! दूरदर्शन हे वर्ष १९६५ मध्ये आले, तरी आजच्या सारख्या पुष्कळ वाहिन्या नव्हत्या. काही लोक क्वचित् नाट्यगृहात किंवा चित्रपटगृहात जात, व्याख्यानाला जात किंवा वाचन करत. तिन्ही सांजेला घरात ‘शुभंकरोती’ एकत्रित म्हणण्याचा नियमच होता.

आता शुभंकरोतीची जागा दूरदर्शनवरील मालिकांनी घेतली आहे. सण-उत्सव यांकडे केवळ मजा, दिनक्रमातील ‘ब्रेक’ (सुट्टीचा भाग) म्हणून पाहिले जाते. विवाह, मुंज यांसाठी सध्या बहुतांश ठिकाणी थेट कार्यालयातच येतात. २०-२५ वर्षांपूर्वी मनोरंजनाची साधने अल्प असली, तरी माणसे एकमेकांशी जोडलेली होती. लहान मुले एकत्रित येऊन खेळत असल्याने कधी कुणी एकटे नव्हते. एखाद्या मुलाला वाटणारी भीती किंवा त्याच्यातील उणीव त्याचे सवंगडी भरून काढायचे, अभ्यासात एकमेकांना साहाय्य करायचे. कुणी दादागिरी केल्यास त्याला एकटे पाडून चूकही दाखवली जाई आणि आधीचे विसरून काही क्षणांतच खिलाडू वृत्तीने पुन्हा सामावूनही घेतले जाई. घरी केलेला वेगळा पदार्थ शेजारी आवर्जून दिला जात असे. ‘आज मनोरंजनाची साधने पुष्कळ आणि व्यक्ती मात्र एकटी !’, असे चित्र झाले आहे. ‘केबल’वर अनेक वाहिन्या, ‘ओटीटी’वर अनेक ‘व्हिडिओ’ आहेत, ‘भ्रमणभाषचे खेळ’ आहेत; पण समवेत कुणी नाही. याचा परिणाम व्यक्तीचा असलेला संवाद न्यून होण्यात होत आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत लांब रहाणार्‍या नातेवाइकांना पत्र पाठवले जाई. त्यातून पुष्कळ सारी आपुलकी, प्रेम व्यक्त होई. यामुळे व्यक्ती प्रत्यक्ष भेटावी, असा जिवंतपणा त्या निर्जीव पत्रात मायेच्या ओलाव्याने यायचा. आज एकमेकांशी संवाद साधण्यासाठी अनेक साधने आहेत; पण भावनांची जागा ‘इमोजी’ने (भ्रमणभाषमधील चिन्हांनी) घेतली अन् कृत्रिमता निर्माण झाली. यातून पूर्वीचे सगळे योग्य होते, असे नाही; मात्र काळासमवेत माणसांची वृत्तीही पालटली आहे. पूर्वी अनेक जण एकमेकांना विश्वासाने ओळखत होते. आज ती स्थिती नाही. विश्वास टाकल्यास फसवणूक पदरात पडण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा सध्याचा काळ आहे. अनैतिकता वाढल्याने माणसामाणसातील विश्वास अल्प झाला आहे. काळानुरूप पालटाचा स्वीकार केलाच पाहिजे; परंतु पूर्वापार आलेल्या चांगल्या गोष्टीही जपल्या पाहिजेत. मुख्य म्हणजे समाजाविषयीची संवेदनशीलता कायम ठेवली पाहिजे !

– सौ. स्नेहा ताम्हनकर, रत्नागिरी.