रत्नागिरी जिल्ह्यातील ३० विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे ३८ प्रतिनिधी महोत्सवात सहभागी होणार !

२४ ते ३० जून या कालावधीत गोवा येथे ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’!

रत्नागिरी – हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या कार्याला गती देण्यासाठी प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही बारावे ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ अर्थात् ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव २४ ते ३० जून २०२४ या कालावधीत ‘श्री रामनाथ देवस्थान’, फोंडा, गोवा येथे होणार आहे. या महोत्सवात रत्नागिरी जिल्ह्यातील ३० विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे ३८ प्रतिनिधी सहभागी होणार आहेत, अशी माहिती  हिंदु जनजागृती समितीचे श्री. संजय जोशी यांनी येथील पत्रकार परिषदेत दिली.

या वेळी महाराष्ट्र मंदिर महासंघाचे श्री. सुरेश शिंदे, महाराष्ट्र मंदिर महासंघ दक्षिण रत्नागिरीचे समन्वयक श्री. सुनील सहस्रबुद्धे आणि रत्नागिरी येथील हिंदुत्वनिष्ठ श्री. राकेश नलावडे उपस्थित होते.

श्री. संजय जोशी पुढे म्हणाले की,

१. पाचशे वर्षांच्या संघर्षांनंतर अयोध्येत उभे राहिलेले प्रभु श्रीरामाचे मंदिर हे हिंदु राष्ट्र निर्मितीच्या दिशेने पडलेले पहिले पाऊल आहे; मात्र लोकसभा निवडणुकीनंतरची देशातील परिस्थिती पहाता हिंदूंच्या समस्या सोडवण्यासाठी हिंदूंची ‘इकोसिस्टीम’ निर्माण करून नियोजनबद्ध पद्धतीने कार्य करण्याची आवश्यकता आहे.

२. राष्ट्रविरोधी आणि विदेशी शक्ती भारताला अस्थिर करण्यासाठी जोमाने सक्रीय झाल्या आहेत. हिंदूंवरील आक्रमणे वाढली आहेत. अशा वेळी हिंदूंना जाती-पातीच्या भांडणांत गुंतवून त्यांच्यात फूट पाडण्याचे षड्यंत्र आखले जात आहे; मात्र हिंदूंच्या संघटनामुळे ही षड्यंत्रे यशस्वी होणार नाहीत. जागतिक स्तरावर विविध देशांमधील वाढत जाणारी युद्धे-अस्थिरता पहाता हिंदु धर्म हा एकमात्र धर्म आहे की, जो विश्वबंधुत्वाची आणि ‘वसुधैव कुटुम्बकम् ।’ ची संकल्पना मांडून सर्व समाजाला जोडू शकतो अन् एकसंघ ठेवू शकतो.

३.  यंदाच्या अधिवेशनामध्ये हिंदु राष्ट्राशी संबंधित विविध विषयांवर तज्ञ मान्यवरांचे परिसंवाद, ‘सनातन धर्माची वैचारिक सुरक्षा’,‘धर्म आणि राष्ट्रविरोधी ‘नॅरेटिव्ह’ला प्रत्युत्तर’, ‘वैश्विक स्तरावर हिंदुत्वाचे रक्षण’ यांसारख्या विविध विषयांसमवेतच हिंदु राष्ट्राच्या पायाभरणीसाठी आवश्यक विषयांवर या महोत्सवामध्ये विचारमंथन होणार आहे.

४. रत्नागिरी जिल्ह्यातील भगवान श्री परशुराम देवस्थानाचे विश्वस्त आणि श्री सतनाम वारकरी संप्रदायाचे प्रमुख संयोजक अभय सहस्रबुद्धे, रत्नागिरी जिल्हा गुरव समाजाचे अध्यक्ष श्री. लक्ष्मण गुरव, शिवप्रतिष्ठान रत्नागिरी जिल्हाप्रमुख श्री. गणेश गायकवाड, उद्योजक श्री. दीपक देवल यांच्यासह जिल्ह्यातील ३८ हिंदुत्वनिष्ठ या महोत्सवाला उपस्थित रहाणार आहेत.

महाराष्ट्र मंदिर महासंघाचे श्री. सुरेश शिंदे म्हणाले की, या अधिवेशनाला अमेरिका, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, घाना, नेपाळ आणि बांगलादेश या देशांतून प्रतिनिधी येणार आहेत. या देशांसह भारतातील २६ राज्यांतील १००० हून अधिक हिंदु संघटनांच्या २००० हून अधिक प्रतिनिधींना निमंत्रित करण्यात आले आहे. यात प्रामुख्याने इंदूर येथील महामंडलेश्वर स्वामी प्रणवानंद सरस्वती महाराज, ‘इंटरनॅशनल वेदांत सोसायटी’चे स्वामी निर्गुणानंदगिरी महाराज, छत्तीसगड येथील श्रीरामबालकदास महात्यागी महाराज, ‘शदाणी दरबार’चे प.पू. डॉ. युधिष्ठिरलाल महाराज आदी संतांची वंदनीय उपस्थिती या अधिवेशनाला लाभणार आहे.

प्रामुख्याने श्रीरामजन्मभूमी मुक्तीसाठी, तसेच काशी येथील ज्ञानवापी मशिदीच्या विरोधात न्यायालयीन लढा देणारे अधिवक्ता (पू.) हरिशंकर जैन आणि त्यांचे सुपुत्र अधिवक्ता विष्णु शंकर जैन, सर्वोच्च न्यायालयातील अधिवक्ता अश्विनी उपाध्याय, ‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारका’चे कार्याध्यक्ष श्री. रणजीत सावरकर, तेलंगाणा येथील हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजा सिंह, ‘हिंदु इकोसिस्टीम’चे संस्थापक श्री. कपिल मिश्रा, भारताचे माजी माहिती आयुक्त तथा ‘सेव कल्चर सेव भारत’चे संस्थापक श्री. उदय माहूरकर यांच्यासह वरिष्ठ अधिवक्ता, उद्योजक, विचारवंत, लेखक, मंदिर विश्वस्त, तसेच अनेक समविचारी सामाजिक, राष्ट्रीय आणि आध्यात्मिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित रहाणार आहेत.

अधिवेशनाचे थेट प्रक्षेपण

या अधिवेशनाचे थेट प्रक्षेपण हिंदु जनजागृती समितीचे संकेतस्थळ  HinduJagruti.org  याद्वारे, तसेच समितीच्या ‘HinduJagruti’ या ‘यू ट्यूब’चॅनेल आणि facebook.com/hjshindi1 या ‘फेसबुक’द्वारेही केले जाणार आहे. जगभरातील हिंदुत्वनिष्ठांनी या ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’चा लाभ घ्यावा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आले.