Tamil Nadu Illicit Liquor Case : तमिळनाडूत विषारी दारू प्‍यायल्‍याने ३६ जणांचा मृत्‍यू, तर ७० जण रुग्‍णालयात भरती !

चेन्‍नई (तमिळनाडू) – तमिळनाडूच्‍या कल्लाकुरीची जिल्‍ह्यात विषारी दारू प्‍यायल्‍याने ३६ जणांचा मृत्‍यू झाला. तसेच ७० हून अधिक लोकांना उपचारासाठी रुग्‍णालयात भरती करण्‍यात आले आहे. दुसरीकडे पुद्दुचेरी येथेही विषारी दारू प्‍यायल्‍याने १५ जणांना रुग्‍णालयात भरती करण्‍यात आले आहे. यांतील काही जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

या प्रकरणी पोलिसांनी ४९ वर्षीय गोविंदराज उपाख्‍य कन्‍नूकुट्टी याला अटक केली आहे. त्‍याच्‍याकडून तब्‍बल २०० लिटर दारू जप्‍त केली आहे. या दारूचे नमुने तातडीने विल्लुपूरम् येथे तपासणीसाठी पाठवण्‍यात आले. त्‍यामध्‍ये विषारी मिथेनॉलचे मोठे प्रमाण असल्‍याचे आढळून आले.

गुन्‍हेगारांना दयामाया दाखवली जाणार नाही ! – मुख्‍यमंत्री स्‍टॅलिन

मुख्‍यमंत्री स्‍टॅलिन

मुख्‍यमंत्री एम्.के. स्‍टॅलिन यांनी या घटनेविषयी दुःख व्‍यक्‍त करत ‘कामचुकार अधिकार्‍यांवरही कारवाई करण्‍यात येईल’, असे म्‍हटले आहे. त्‍यांनी एक्‍सवर केलेल्‍या पोस्‍टमध्‍ये म्‍हटले आहे की, जर लोकांनी अशा बेकायदेशीर दारू बनवण्‍याच्‍या प्रकारांविषयी तक्रार केली, तर त्‍यावर तातडीने कारवाई केली जाईल. (जनतेने तक्रार करण्‍यापूर्वी पोलिसांना याची माहिती का मिळत नाही ? याचे उत्तर स्‍टॅलिन यांनी दिले पाहिजे ! – संपादक) अशा गुन्‍हेगारांवर अजिबात दया दाखवली जाणार नाही. (अशा घटनांना मुख्‍यमंत्री या नात्‍याने तेही उत्तरदायी आहेत. ते त्‍यांच्‍या पदाचे त्‍यागपत्र देतील का ? – संपादक)

संपादकीय भूमिका 

  • देशात नेहमीच विषारी दारू प्‍यायाल्‍याने मोठ्या संख्‍येने लोकांचा मृत्‍यू झाल्‍याच्‍या घटना घडत असतात; मात्र त्‍या कायमस्‍वरूपी रोखण्‍यासाठी ना केंद्र स्‍तरावर ना राज्‍य स्‍तरावर उपाययोजना केली जाते. त्‍यामुळे अशा घटना घडत रहातात, हे सर्वपक्षीय सरकारांना लज्‍जास्‍पद !
  • सनातन धर्माला नष्‍ट करण्‍याच्‍या गप्‍पा मारणार्‍या सत्ताधारी द्रविड मुन्‍नेत्र कळघम् पक्षाने अशा प्रकारची गुन्‍हेगारी प्रथम नष्‍ट करून दाखवावी !