संशयित गणेश मिस्कीन आणि अमित बद्दी यांच्या विरोधात कोणताही ठोस पुरावा नसल्याने त्यांना जामीन संमत करावा ! – अधिवक्ता समीर पटवर्धन

कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरण

कोल्हापूर – कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणात पोलिसांनी अटक केलेले संशयित गणेश मिस्कीन आणि अमित बद्दी हे प्रत्यक्ष गुन्हा घडला, त्या दिवशी कोल्हापूर येथे होते, असा कोणताही पुरावा पोलिसांनी सादर केलेला नाही. या प्रकरणात वापरलेली गाडी अद्याप पोलिसांनी जप्त केलेली नाही. कॉ. पानसरे यांच्या हत्येचा कट या दोघांनी रचला आणि त्यांनी तो तडीस नेला, या संदर्भातीलही कोणताही ठोस पुरावा सरकारी पक्षाने सादर केलेला नाही. त्यामुळे संशयित गणेश मिस्कीन आणि अमित बद्दी यांच्या विरोधात कोणताही ठोस पुरावा नसल्याने त्यांना जामीन संमत करावा, असा युक्तीवाद अधिवक्ता समीर पटवर्धन यांनी केला. कॉ. पानसरे हत्या प्रकरणातील संशयित गणेश मिस्कीन आणि अमित बद्दी यांना जामीन मिळण्यासाठी आवेदन सादर करण्यात आले असून त्या संदर्भात अधिवक्ता समीर पटवर्धन यांनी युक्तीवाद केला.

कॉ. पानसरे हत्येच्या प्रकरणाची सुनावणी जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एस्.एस्. तांबे यांच्यासमोर चालू आहे. सरकारी पक्षाच्या वतीने अधिवक्ता शिवाजीराव राणे उपस्थित होते. या वेळी अधिवक्त्या प्रीती पाटील उपस्थित होत्या. या प्रकरणाची पुढील सुनावणी १८ जून या दिवशी होणार आहे.

अधिवक्ता समीर पटवर्धन

या प्रसंगी अधिवक्ता समीर पटवर्धन म्हणाले की,

१. सरकारी पक्षाच्या वतीने सादर करण्यात आलेला साक्षीदार सागर लाखे हा त्याने दिलेल्या जबाबात ‘कोल्हापूर येथील धर्माचे काम करायचे आहे’, असे मी बेळगाव येथील एका बैठकीत ऐकल्याचे सांगतो. प्रत्यक्षात हे वक्तव्य १२ संशयितांपैकी कुणी केले ? तसेच धर्माचे काम म्हणजे नेमके काय ? हे काहीच सिद्ध होत नाही.

२. या प्रकरणात एकूण १० आरोपींना पोलिसांनी अटक केली असून प्रत्येकाला १४ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. त्या कालावधीत कुणाकडूनही गुन्ह्यात वापरलेली दुचाकी, बंदूक अथवा अन्य कोणतीही वस्तू जप्त करण्यात आलेली नाही.

३. वरील आरोपींवर केवळ संशय आहे, एवढे पुरेसे नसून त्यांचा हत्येतील सहभागाविषयी सरकारी पक्ष कोणताही ठोस पुरावा आजपर्यंत सादर करू शकलेला नाही. या अन्वेषणात विविध दिवसांचे डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांचे भ्रमणभाष ‘लोकेशन’ पोलिसांनी सादर केले आहे, तसे अन्य कुणाचेही ‘लोकेशन’ पोलिसांनी न्यायालयासमोर आणलेले नाही. ज्याद्वारे हे संशयित कोल्हापुरात येऊन गेले, हे सिद्ध होऊ शकेल.

४. सर्वोच्च न्यायालयाने ‘दीर्घकाळ चालणार्‍या खटल्यांमध्ये संशयितांना केवळ संशयाच्या जोरावर कारागृहात न ठेवता जामीन संमत करावा’, असे अनेक निकालांमध्ये सांगितले आहे.


अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर

…आणखी किती काळ संशयित वासुदेव सूर्यवंशी आणि अमित डेगवेकर हे कारागृहात रहाणार आहेत ? – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर

सरकारी पक्षाच्या वतीने सागर लाखे नावाच्या ज्या साक्षीदाराची साक्ष न्यायालयात सादर करण्यात आली आहे, तो कलम १६१ खाली वेगळा जबाब देतो, तर कलम १६४ खाली वेगळा जबाब देतो. या प्रकरणातील एक साक्षीदार राजेश बंगेरा याचा तर न्यायदंडाधिकार्‍यांसमोर जबाबच घेतलेला नाही. हा खटला चालू झाल्यापासून ५ वर्षांहून अधिक काळ संशयित वासुदेव सूर्यवंशी आणि अमित डेगवेकर हे कारागृहात आहेत. प्रत्यक्ष खटला चालून आणखी किती काळ ते कारागृहात रहाणार आहेत ? असा प्रश्न अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी उपस्थित केला. ‘संशयित वासुदेव सूयवंशी आणि अमित डेगवेकर यांना जामीन संमत करावा’, यासाठी प्रविष्ट (दाखल) केलेल्या याचिकेवर युक्तीवाद करतांना अधिवक्ता इचलकरंजीकर यांनी हा प्रश्न उपस्थित केला.

अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर पुढे म्हणाले की,

१. या प्रकरणात संशयित शरद कळसकर याचा जो जबाब नोंदवण्यात आलेला आहे, तो कर्नाटक राज्यात एका पोलीस अधिकार्‍यांसमोर नोंदवण्यात आलेला आहे. हा जबाब न्यायदंडाधिकार्‍यांसमोर नोंदवण्यात आलेला नाही. त्यामुळे तो महाराष्ट्रात लागू होत नाही, तसेच हाच जबाब पुणे येथील डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणात ज्या संशयितांच्या विरोधात वापरण्यात आला, ते अधिवक्ता संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

२. समीर गायकवाड यांची अटक सोडल्यास या प्रकरणात पोलिसांनी स्वत:हून नवीन अन्वेषण करून कुणाला तरी पकडले आहे, असे झालेले नसून केवळ अन्य खटल्यांमधील आरोपींना कॉ. पानसरे प्रकरणात अटक करण्यात आली आहे.

३. या प्रकरणातील एक संशयित वासुदेव सूर्यवंशी याने हत्या करण्यासाठी दुचाकी चोरली, असे पोलिसांचे म्हणणे असून त्याला अटक होऊन आज ५ वर्षे होऊन गेली; मात्र त्याने वापरलेली दुचाकी अद्याप पोलिसांनी जप्त केलेली नाही, तसेच ज्या व्यक्तीची दुचाकी चोरी झाली, त्या व्यक्तीने नोंदवलेला प्रथमदर्शी अहवालही पोलिसांनी न्यायालयासमोर सादर केलेला नाही. त्यामुळे खरोखरच दुचाकी चोरी झाली का ? हाही सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे.

४. यातील अन्य साक्षीदार प्रवीण चतुर हेही पोलीस आणि न्यायाधीश यांच्यासमोर वेगवेगळा जबाब देतात, तसेच संशयितांपैकी कुणाच्याही विरोधात थेट सबळ पुरावा नाही.