आपत्तीविरोधात लढण्यासाठी चिपळूण नगर परिषदेकडून २ दिवसांचे प्रशिक्षण


चिपळूण – पावसाळ्यात अचानक उद्भवणारी परिस्थिती अथवा अन्य आपत्ती ओढावल्यास त्याला तोंड कसे द्यावे ? याविषयी येथील नगर परिषद प्रशासनाने आतापासूनच सिद्धता चालू केली आहे. या आपत्तीच्या विरोधात लढण्यासाठी साहाय्य कार्यासाठी धावणार्‍या व्यक्तींना १४ मेपासून २ दिवसांचे प्रशिक्षण देण्यात येत आहे.यामध्ये हौशी जलतरणपटू आणि कर्मचार्‍यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला आहे. २२ जुलै २०२१ या वर्षी शहरात महापुराने एकच हाहाकार उडाला होता. या वेळी बचाव कार्य वेळेत न झाल्याने हानी झाली होती. या पार्श्वभूमीवर हे प्रशिक्षण देण्यात येत आहे.

त्यामुळे यावर्षीच्या पावसाळ्यात अशी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झालीच तर त्याला कशा प्रकारे सामोरे जावे ? वेळीच साहाय्य कसे पोचवता येईल आणि होणारी हानी कशी  टाळता येईल, यासाठी चिपळूण नगर परिषद आतापासूनच सतर्क झाली आहे. नगर परिषद प्रशासनाने यासाठी पुणे येथील अस्तित्व लाईफ सेव्हिंग इंडिया प्रा. लि. ची नियुक्ती केली आहे. वाशिष्ठी नदीतील गांधारेश्वर मंदिरालगतच्या डोहात हे प्रशिक्षण चालू करण्यात आले आहे.


या वेळी शहरातील मुरादपूर, शंकरवाडी, पाग आणि बाजारपेठ परिसरातील तरुणांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. विशेष म्हणजे शहरातील काही तरुण सहभागी झाले आहेत. या वेळी वाशिष्ठी नदीपात्राच्या मध्यवर्ती भागात जाऊन परत काठावर येणार्‍या तरुणांची या प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली. पुणे येथील अस्तित्व लाईफ सेव्हिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक भूषण देशपांडे यांनी तरुणांना मार्गदर्शन केले. या वेळी मुख्याधिकारी विशाल भोसले आणि प्रशासकीय अधिकारी पेढांबकर उपस्थित होते.