ठाणे, कल्याण आणि डोंबिवली येथे हिंदु नववर्षाचे उत्साहात स्वागत !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुढी उभारतांना

ठाणे, ९ एप्रिल (वार्ता.) – श्री कौपिनेश्वर महाराज की जय, हर हर महादेव, जय श्रीराम, जय जय श्रीराम अशा घोषणा देत ठाणेकरांनी स्वागतयात्रेच्या माध्यमातून नववर्षाचे स्वागत केले. ढोल-ताशांचा गजर, सायकल रॅली, पारंपरिक वेशभूषा, रांगोळ्यांच्या पायघड्या, जिम्नॅस्टिकची प्रात्यक्षिके, दुचाकी फेरी, घोडागाडी आणि चित्ररथ स्वागतयात्रेचे विशेष आकर्षण ठरले. या स्वागतयात्रेत ६० हून अधिक संस्था सहभागी झाल्या होत्या. सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्तेही या नववर्ष स्वागतयात्रेत सहभागी झाले होते. नववर्ष स्वागत यात्रांमुळे ठाणे, कल्याण आणि डोंबिवली येथील नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालखी खांद्यावर घेतल्यावर त्यांनीही ‘हर हर महादेव’ अशा घोषणा दिल्या. डोंबिवली येथील श्री गणेश मंदिर संस्थान आयोजित स्वागत यात्रेला भागशाळा मैदान येथून ज्येष्ठ विधीज्ञ अधिवक्ता उज्ज्वल निकम यांच्या उपस्थितीत श्री गणेशाचे पूजन करून पालखी सोहळ्याला प्रारंभ झाला.