हिंदु जनजागृती समितीची मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे मागणी
पणजी, २६ मार्च (वार्ता.) : प्रसिद्ध अभिनेते रणदीप हुडा यांनी दिग्दर्शित केलेला ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा चित्रपट गोव्यासह देशभर प्रदर्शित झाला आहे. थोर क्रांतीकारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या उत्तुंग कार्यावर हा चित्रपट प्रकाश टाकतो. हा चित्रपट विद्यार्थीवर्गापासून प्रौढांपर्यंत सर्वांनीच पहावा, असाच आहे. त्यामुळे हा चित्रपट गोवा राज्यात करमुक्त करावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की,
आज शालेय पाठ्यपुस्तकांमधून दुर्दैवाने क्रांतीकारकांविषयी जुजबी, तर कधी चुकीची माहिती दिली जाते. विद्यार्थ्यांना क्रांतीकारकांविषयी सविस्तर आणि खरी माहिती मिळाल्यास त्यांना क्रांतीकारकांविषयी आपुलकी निर्माण होऊन देशप्रेम वृद्धींगत होण्यास अधिक साहाय्य होईल. या चित्रपटात स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अंदमानमध्ये भोगलेल्या काळ्या पाण्याच्या शिक्षेची भयावहता अधिक सखोलपणे मांडण्यात आली आहे. इतक्या नरकयातना होत असूनही त्यांनी जिद्द सोडली नाही, हे आजकाल छोट्या छोट्या कारणांमुळे आत्महत्या करणार्या युवा पिढीसाठी आदर्श उदाहरण आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे राष्ट्रप्रेम, हिंदुत्व, राजकारण, समाजकारण, साहित्यलेखन, समाजातील दीनदुबळांच्या उद्धारासाठीचे कार्य आदी उत्तुंग कार्य युवापिढीला मार्गदर्शक ठरेल. या चित्रपटाद्वारे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी पसरवला जात असलेला अपसमज सहजपणे दूर होऊ शकतो. त्यामुळे हा चित्रपट गोव्यात लवकरात लवकर करमुक्त करावा.