समष्टी सोहळे आध्यात्मिक आणि भावाच्या स्तरावर करण्याचे महत्त्व !

‘२२.१.२०२४ या दिवशी अयोध्येत श्री रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. या सोहळ्यासाठी संपूर्ण देशात विविध संघटनांनी विविध उपक्रम राबवले. त्यांतील काही उपक्रम आध्यात्मिक स्तरावर राबवले गेले. ‘समष्टी सोहळा आध्यात्मिक आणि भावाच्या स्तरावर केल्यावर त्याचा कसा परिणाम होतो ?’, याचे मी एका देवळात अनुभवलेले उदाहरण येथे दिले आहे.

श्री. निषाद देशमुख

१. एका देवळात सूक्ष्मातून अंधार जाणवणे

मी एका देवळात गेलो होतो. या देवळावर वाईट शक्ती सूक्ष्मातून करत असलेल्या आक्रमणांमुळे त्रासदायक शक्तीचे आवरण आले होते. त्यामुळे मला देवळात सूक्ष्मातून अंधार जाणवायचा.

२. अयोध्येत होणार्‍या श्री रामलल्लाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्यानिमित्त त्या देवळात श्रीरामाचा सामूहिक आणि भावपूर्ण नामजप केला गेल्यामुळे देवळातील सूक्ष्म अंधार न्यून होऊन चैतन्य वाढणे

अयोध्येत होणार्‍या श्री रामलल्लाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याच्या निमित्ताने त्या सोहळ्याच्या काही दिवस आधीपासून देवळात श्रीरामाचा नामजप लावून सामूहिक नामजपाचे आयोजन करण्यात आले होते. त्या देवळात सामूहिक नामजप चालू झाल्यावर दुसर्‍याच दिवशी मी त्या देवळात गेलो होतो. प्रत्यक्षात ते देऊळ वेगळ्या देवतेचे असूनही ‘आधीच्या तुलनेत त्या देवळावर आलेले त्रासदायक आवरण आणि त्यामुळे जाणवणारा अंधार ६० ते ७० टक्के न्यून झाला अन् देवतेच्या तत्त्वात वाढही झाली’, असे मला जाणवले.

३. सामूहिक नामजप थांबवल्यावरही पुढे ४ – ५ दिवस देवळातील चैतन्य टिकून रहाणे

श्री रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होईपर्यंत त्या देवळात श्रीरामाचा सामूहिक नामजप केला गेला. त्यामुळे देवळातील सूक्ष्म अंधार नाहीसा झाला होता आणि मला तिथे चैतन्य जाणवत होते. सामूहिक नामजप थांबवल्यानंतरही मला पुढे ४ – ५ दिवस तिथे चैतन्य जाणवत होते.

या प्रसंगातून ‘समष्टी सोहळे संतांच्या मार्गदर्शनानुसार आणि भावाच्या स्तरावर केले, तर त्याचे देवळांवर, पर्यायाने समाजावर आध्यात्मिक आणि दीर्घकालीन सकारात्मक परिणाम होतात. त्यामुळे समाजाच्या सात्त्विकतेत वाढ होते’, असे मला शिकता आले.’

– श्री. निषाद देशमुख (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान, आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), फोंडा, गोवा. (१.२.२०२४, दुपारी ४.४५ ते संध्याकाळी ५.०७)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • सूक्ष्म-ज्ञानाविषयीचा प्रयोग : काही साधक सूक्ष्मातील कळण्याच्या क्षमतेचा अभ्यास म्हणून ‘एखाद्या वस्तूविषयी मन आणि बुद्धी यांच्या पलीकडे काय जाणवते’, याची चाचणी करतात. याला ‘सूक्ष्म-ज्ञानाविषयीचा प्रयोग’ म्हणतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक