India Pak Nuclear Test : भारत आणि पाकिस्तान हेदेखील पुन्हा करू शकतात अणूचाचणी !

जगातील अनेक देश अणूचाचण्यांची योजना आखत आहेत !

इस्लामाबाद (पाकिस्तान) – ‘बुलेटिन ऑफ द टॉमिक सायंटिस्ट्स’च्या मासिकाच्या ताज्या अंकात एका अहवालाचा संदर्भ देत दावा करण्यात आला आहे की, ‘भारत आणि पाकिस्तान हे देश पुन्हा अणूचाचणी करू शकतात.’ हा अहवाल युरोपीयन संसदेचे आण्विक विषयावरील वैज्ञानिक सल्लागार आणि आण्विक सुरक्षा तज्ञ फ्रँकोइस डियाझ मौरिन यांनी बनवला आहे.

१. ‘बुलेटिन ऑफ द टॉमिक सायंटिस्ट्स’हे मासिक वर्ष १९४५ मध्ये अल्बर्ट आइनस्टाईन आणि मॅनहॅटन प्रकल्पाशी संबंधित शास्त्रज्ञ यांनी चालू केले होते. मॅनहॅटन प्रकल्प हा पहिल्या अणुबाँबची रचना आणि विकास होता.

२. या अहवालानुसार, आंतरराष्ट्रीय कराराच्या अंतर्गत अण्वस्त्र स्फोटांवर बंदी असतांनाही अण्वस्त्र चाचणीचे सूत्र पुन्हा एकदा केंद्रस्थानी आहे. उपग्रहांनी काढलेल्या छायाचित्रांवरून असे दिसून आले आहे की, वर्ष २०२१ पासून जगातील ३ सर्वांत मोठ्या अणुशक्ती अमेरिका, रशिया आणि चीन या देशांमध्ये आण्विक चाचणी ठिकाणी बांधकामाच्या हालचाली वाढल्या आहेत. भारत आणि पाकिस्तान, ज्यांच्या शेवटच्या अणू चाचण्या वर्ष १९९८ मध्ये घेण्यात आल्या होत्या आणि त्यांनी सर्वसमावेशक चाचणी बंदी करारावर (सीटीबीटी) स्वाक्षरी केलेली नाही, ते देखील चाचणीसाठी उत्सुक आहेत.

३. अहवालात म्हटले आहे की, भारताने वर्ष १९९८ नंतर स्वतःहून पुढील चाचण्यांवर स्थगिती घोषित केली; परंतु अनेक भारतीय अणूशास्त्रज्ञांनी हे अनावश्यक आणि घाईचे पाऊल मानले. आवश्यकता भासल्यास ही स्थगिती केव्हाही उठवली जाऊ शकते, असे शास्त्रज्ञांनी सांगितले होते.

४. तज्ञांचा असा विश्‍वास आहे की, रशिया नोवाया झेमल्या येथे आणि चीन लोप नूर येथे अणूचाचणीच्या ठिकाणी भूमिगत बोगदे वाढवत आहे. रशियाने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ‘सीटीबीटी’च्या अटींमधून माघार घेतली होती.

५. अमेरिकेतील ‘नॅशनल न्यूक्लियर सिक्युरिटी अ‍ॅडमिनिस्ट्रेशन’ नेवाडा येथील अणूचाचणी स्थळाचा विस्तार करत आहे. अमेरिकेच्या विरोधकांपैकी कुणीही अणूचाचणी केली, तर ६ महिन्यांत अमेरिका अणूचाचणी करण्यास सिद्ध होईल.

६. २१ व्या शतकात अण्वस्त्रांची चाचणी करणारा एकमेव देश असलेला उत्तर कोरिया हा आणखी एक भूमिगत अण्वस्त्र चाचणी करण्यास सज्ज आहे.

७. इराणने आण्विक देशांच्या सूचीमध्ये सहभागी होण्याची तांत्रिक क्षमता दाखवली आहे.

८. दक्षिण कोरिया आणि सौदी अरेबिया म्हणतात की, ते प्रादेशिक आण्विक धोक्यांना प्रतिसाद म्हणून अण्वस्त्रे विकसित करू शकतात.