दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : राहुल गांधींना बाँबने उडवण्याची धमकी देणारा नाशिक येथून कह्यात !; चाळीसगाव येथे मोकाट कुत्र्याचा २५ जणांना चावा !…

राहुल गांधींना बाँबने उडवण्याची धमकी देणारा नाशिक येथून कह्यात !

नाशिक – काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी ‘भारत जोडो न्याय यात्रे’च्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यामध्ये येणार आहेत. या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यात त्यांच्या यात्रेची सिद्धता करण्यात येत आहे. माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्याप्रमाणे राहुल गांधी यांनाही बाँबने उडवून देण्याची धमकी नाशिक पोलिसांना देण्यात आली होती. त्यानुसार नाशिक पोलिसांनी तात्काळ कारवाई करत गंगापूर येथून धमकी देणार्‍याला कह्यात घेतले आहे. याविषयी आतंकवादविरोधी पथक आणि नाशिक पोलीस यांच्या सहकार्याने सुरक्षा व्यवस्थेत आणखी वाढ करण्यात आली आहे.


चाळीसगाव येथे मोकाट कुत्र्याचा २५ जणांना चावा !

चाळीसगाव – येथील काही परिसरात एका पिसाळलेल्या कुत्र्याने २० ते २५ जणांना चावा घेतला. काही तरुणांनी कुत्र्याला पकडण्याचा प्रयत्न केला; पण तो पळून गेला. पालिकेच्या स्वच्छता कर्मचार्‍यांनी त्याला पकडले. कुत्र्याने ज्यांना चावा घेतला, त्यांनी रुग्णालयात जाऊन उपचार घेतले.

संपादकीय भूमिका

मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त प्रशासन कधी करणार ?


मुंबईत पाणीकपात नाही !

मुंबई – राज्य शासनाच्या हमीमुळे मुंबईच्या पाणीपुरठ्यातील प्रस्तावित १० टक्के कपात होणार नसून ही पाणीकपात मागे घेण्याचा निर्णय बृहन्मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे. मुंबईच्या पाण्याचा तुटवडा निभावणी साठ्यातून उपलब्ध करून देण्याची हमी राज्यशासनाने दिली आहे. असे असले, तरीही मुंबईकरांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन पालिकेने केले आहे.


देहलीतून गुंड बोलावून पत्नीकडून पतीची हत्या !

नातेसंबंध संपुष्टात आल्याचे दर्शवणारी घटना !

अंबरनाथ – अनैतिक संबंधांत अडचण ठरत असल्याच्या कारणाने पत्नीने पतीची प्रियकराच्या साहाय्याने हत्या केली. तिने देहली येथून गुंड बोलावून त्यांना ३० लाख रुपयांची सुपारी दिली. पोलिसांनी मुख्य आरोपी पत्नीसह तिचा प्रियकर आणि सुपारी घेऊन हत्या करणारे दोन मारेकरी गुंड यांना अटक केली आहे. यातील एक आरोपी अल्पवयीन आहे.


डासोत्पत्ती आढळल्यास ठाणे पालिकेची दंडात्मक कारवाई !

ठाणे – येथील महापालिका क्षेत्रातील खासगी मालकीच्या मोकळ्या जागा, बांधकाम स्थळे, व्यापारी संकुले, तसेच आस्थापनाच्या मालकीच्या मालमत्ता येथे डासांची उत्पत्तीस्थाने आढळल्यास १० सहस्र रुपयांची दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला आहे. रहाते घर, मालकीचे आवार किंवा वाणिज्य संकुल येथे डासोत्पत्तीची स्थाने आढळल्यास १ सहस्र रुपये, शासकीय, निमशासकीय कार्यालये, ट्रस्ट अथवा संस्था यांच्या ठिकाणी ५ सहस्र रुपयांचा दंड केला जाईल. ‘


अमरेंद्र मिश्रा याच्या जामीन अर्जाला घोसाळकर कुटुंबियांचा विरोध !

अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येचे प्रकरण 

मुंबई – उद्धव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेला आक्रमणकर्ता मॉरिस नरोन्हा याचा अंगरक्षक अमरेंद्र मिश्रा याने सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला; पण घोसाळकर यांच्या पत्नी तेजस्विनी यांनी हस्तक्षेप अर्जाद्वारे जामिनाला विरोध केला आहे. न्यायालयाने सगळ्या पक्षकारांची बाजू ऐकल्यानंतर मिश्रा याच्या जामीन अर्जावर ५ मार्चला निर्णय देण्याचे ठरले.