स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी रचलेले हिंदूंचे ‘एकतागान’ !

सावरकर यांची राजकीय मतप्रणाली सर्वज्ञात आहे. ‘हिंदुस्थान हा अविभाज्य असून तो हिंदूंचा आहे, हिंदूंचाच राहिला पाहिजे’, हा त्यांचा मूलमंत्र सर्वकालिक आहे. त्यांची राष्ट्रीय वृत्ती जिवंत आणि निर्भेळ असल्यामुळे त्यांच्या खासगी जीवनात अन् सार्वजनिक जीवनात कुठेही विसंगती आढळत नाही. ‘देशातील हिंदू एकच आहेत. ते जातीजातींमध्ये  विभागले जाऊ शकत नाहीत’, हे त्यांनी वर्ष १९२५ मध्ये हिंदूंचे ‘एकतागान’ या कवितेतून स्पष्ट शब्दांत सांगितले आहे. रत्नागिरीच्या जवळ शिरगाव येथे अखिल हिंदु मेळाव्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी हिंदूंचे ‘एकतागान’ हे पद लिहिले. ते वर्ष होते १९२५ ! मोठमोठ्या सभांमधून ब्राह्मणांपासून ते अगदी तळागाळातील जातीपर्यंत हिंदूंच्या सहस्रावधी नरनारींकडून एका आवाजात हे पद संपूर्ण महाराष्ट्रात गायले जात होते. विविध भाषांमध्ये या पदाचा अनुवाद करण्यात आला. देशातील अनेक प्रांतात ते गायले जात होते.

श्री. दुर्गेश परुळकर

या कवितेतून व्यक्त केलेले विचार हे हिंदु सांस्कृतिक परंपरेची साक्ष देणारे आहेत. आद्यशंकराचार्य यांनी अन्नपूर्णादेवी स्तोत्र रचले. त्या स्तोत्रातील

‘माता च पार्वती देवी पिता देवो महेश्वरः ।
बान्धवाः शिवभक्ताश्च स्वदेशो भुवनत्रयम् ।।’

– अन्नपूर्णास्तोत्र, श्लोक १२

अर्थ : देवी पार्वती माझी माता, देवाधिदेव महादेव माझे पिता, शिवभक्त माझे बांधव आणि तिन्ही भुवने माझा स्वदेश आहेत.

या पंक्तींचे स्मरण करून देणारी सावरकर यांची ‘हिंदूंचे एकतागान’ ही कविता आहे. या कवितेचा आरंभ त्याची साक्ष देतो. (या कवितेतील शब्दांमध्ये व्याकरणदृष्ट्या कोणतेही पालट केलेले नाहीत, याची वाचकांनी नोंद घ्यावी. – संपादक)

तुम्ही आम्ही सकल हिंदू बंधूबंधू ।
तो महादेवजी पिता आपुला चला तया वंदू ।। ध्रु ।।

ब्राह्मण वा क्षत्रिय चांग ।
जरी झाला कसलेही रूप वा रंग ।
जरी त्याला तो महार अथवा मांग ।
सकलांला ही एकची आई हिंदुजाति आम्हांस तिला वंदू  ।। १ ।।

एकची देश हा आपुल्या ।
प्रेमाचा एकची छंद जीवाच्या ।
कवनाचा एकची धर्म हा आम्हां ।
सकलांचा ही हिंदुजातिची गंगा आम्ही तिचे सकल बिंदू ।। २ ।।

रघुवीर रामचंद्राचा ।
जो भक्त गोविंदपदांबुजिं जो जो ।
अनुरक्त गीतेची गाऊनी पूजी ।
भगवंत तो हिंदूधर्मनौकेत बसुनिया तरतो भवसिंधु ।। ३ ।।

उभयांनि दोष उभयांचे ।
खोडावे द्वेषासी दुष्ट रूढीसी ।
सोडावे सख्यासि आईच्यासाठी ।
जोडावे अम्हि अपराधांसी विसरूनी प्रेमा पुन्हा पुन्हा सांधू ।। ४ ।।

लेकुरे हिंदुजातीचीं ।
ही आम्ही आमुच्या हिंदुधर्मासी ।
त्या कामीं प्राण देऊनी रक्षू ।
परिणामीं या झेंड्याखाली पूर्वजांची ऐकाची नांदूं ।। ५ ।।

– कवी विनायक दामोदर सावरकर

संकलक : श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक, डोंबिवली. (२६.२.२०२४)