कुर्ला (मुंबई) येथील प्रकार !
पोलिसांसमवेत धक्काबुक्की
मुंबई – मुंबई महानगरपालिकेने वंचित बहुजन आघाडीचे एक अनधिकृत कार्यालय पाडल्याने पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. त्यांनी कुर्ला रेल्वेस्थानकाकडे जाणारा रस्ता रोखून धरला. कार्यकर्त्यांची संख्या वाढत असल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. मुंबई पोलिसांनी राखीव पोलीस दलाची अतिरिक्त कुमक मागवून घेतली आहे. मुंबई महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाकडून १५ फेब्रुवारी या दिवशी कुर्ला-चुनाभट्टी येथे असलेले वंचित बहुजन आघाडीचे कार्यालय तोडण्यात आले होते.
आक्रमक कार्यकर्त्यांनी पालिका कार्यालयाचे प्रवेशद्वार तोडण्याचा प्रयत्न केला. या वेळी पोलीस आणि कार्यकर्ते यांच्यात धक्काबुक्की झाली. त्यात वंचित आघाडीचे कार्यकर्ते घायाळ झाले आहेत. ‘जोपर्यंत पालिका पुन्हा हे कार्यालय उभे करून देत नाही, तोपर्यंत वंचित बहुजन आघाडी शांत रहाणार नाही. संबंधित अधिकार्यांवर कारवाई व्हावी’, अशी मागणी त्यांनी या वेळी केली.