अमेरिकेतील प्रतिष्ठित टाइम्स स्क्वेअर परिसरात श्री रामललाच्या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण दाखवणार !

श्री रामलला विशेष !

(श्री रामलला म्हणजे श्रीरामाचे बालरूप)

न्यूयॉर्कमधील प्रतिष्ठित ‘टाइम्स स्क्वेअर’

नवी देहली – अयोध्या येथे २२ जानेवारी या दिवशी श्री रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. यानिमित्ताने भारतभर उत्साहाचे वातावरण असून त्यानिमित्ताने देशात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. २२ जानेवारी या दिवशी होणार्‍या या सोहळ्याचे भारतातच नव्हे, तर अमेरिकेतही थेट प्रक्षेपण दाखवले जाणार आहे. न्यूयॉर्कमधील प्रतिष्ठित ‘टाइम्स स्क्वेअर’ परिसरात याचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. ‘टाइम्स स्क्वेअर’ हा न्यूयॉर्क शहरातील मध्यवर्ती भाग आहे. हा चौक पर्यटन, व्यवसाय आणि मनोरंजन यांचे मोठे केंद्र आहे.

विदेशातील भारतीय दूतावासांमध्येही सोहळ्याचे थेट प्रक्षेपण

विदेशातील विविध भारतीय दूतावासांमध्येही श्री रामललाच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळ्याचे थेट प्रक्षेपण दाखवले जाणार आहे. भाजपने या सोहळ्याचे तळागाळात थेट प्रक्षेपण दाखवण्याचे नियोजन केले आहे. या सोहळ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करणार आहेत. अयोध्येतील श्री रामललाच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या निमित्ताने आयोजित वेगवेगळ्या विधींना १६ जानेवारीपासूनच आरंभ होईल. २२ जानेवारीच्या सोहळ्याला अनुमाने ६० सहस्र लोक उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे.