भारतीय संशोधनपद्धत आणि संत वाङ्मयाचा अभ्यास करण्याची पद्धत !

प्रबोधन लेखमालिका

आतापर्यंत दैनिक ‘सनातन प्रभात’मधून संतांचे अध्यात्मविषयक लिखाण प्रसिद्ध केले जाते. अशा आध्यात्मिक स्तरावर अभ्यासलेल्या विषयांची मांडणी मानसिक आणि बौद्धिक या स्तरांवर कशा प्रकारे केली जाते ? ते कळावे यासाठी येथून पुढे प्रसिद्ध होणार्‍या या लेखमालेद्वारे प्रसिद्ध करत आहोत.

‘महाराष्ट्राची अस्मिता संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांनी कायम ठेवली होती. यामुळेच महाराष्ट्र जिवंत आहे. रोमचा नाश का झाला ? याचे कारण सांगतांना इतिहासकाराने ‘आध्यात्मिक अधिष्ठानाची कमतरता’, असे लिहिले आहे. कोणत्याही राष्ट्राची एक वििशष्ट अस्मिता असते. तिला तत्त्वज्ञान आणि त्याला अनुसरून असलेली काही जीवनमूल्ये आधारभूत असतात. ती अस्मिता नष्ट झाली, तर राष्ट्रही नाहीसे होते. आज आपल्याला स्वराज्य मिळाले असले, तरी बौद्धिक पारतंत्र्य कायम आहे आणि यामुळेच नवीन राष्ट्र उत्पन्न करण्याची अभद्र वाणी निघते. भारतात ज्या ज्या वेळेला अस्मिता नष्ट होण्याचा प्रसंग आला, त्या त्या वेळेला थोर विभूति जन्मास येऊन त्यांनी ही अस्मिता कायम ठेवली. श्री शंकराचार्यांनी भारतवर्षात जे कार्य केले, तेच कार्य संत श्री ज्ञानेश्वर यांनी महाराष्ट्रात केले. म्हणूनच संतांनी संत ज्ञानेश्वर यांची ‘महाराष्ट्राचा पाया’ म्हणून स्तुती केली.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना संत आणि लेखक यांच्या लिखाणाच्या माध्यमातून विविध विषयांची मांडणी मानसिक आणि बौद्धिक या स्तरांवर कशा प्रकारे केली जाते, ते शिकायला मिळणे !

‘मला कोणत्याही विषयाचा का? कसे? कशामुळे अशा परिभाषेत अभ्यास करण्याची आवड आहे. अध्यात्म जाणून घेण्यास प्रारंभ केल्यावर प्रारंभी काही संत आणि गुरुप्राप्तीनंतर माझे गुरु प.पू. भक्तराज महाराज यांच्याकडून मला अशाच प्रकारे ज्ञान मिळाले. साधनेत प्रगती केल्यावर ईश्वराकडून मिळणारे ज्ञानही आता अशाच प्रकारे मिळत आहे. त्यामुळे मी केलेले लिखाण केवळ आध्यात्मिक स्तरावरील आहे. माझा कधीही त्या विषयांच्या संदर्भातील मानसिक आणि बौद्धिक या स्तरांवरील लेखकांच्या ज्ञानाचा अभ्यास झाला नाही. आता ग्रंथलिखाणासाठी अनेक संत आणि लेखक यांचे ग्रंथ वाचतांना याची उणीव भरून निघत आहे. मी आध्यात्मिक स्तरावर अभ्यासलेल्या विषयांची मांडणी मानसिक आणि बौद्धिक या स्तरांवर कशा प्रकारे केली जाते, हे मला त्यांतून कळत आहे.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. इतिहासाच्या दृष्टीने वाङ्मयाचा विचार

संत ज्ञानेश्वर यांचे कार्य त्यांच्या वाङ्मयावरून ठरवावयाचे आहे. संत ज्ञानेश्वर यांच्या वाङ्मयाला २ अंगे आहेत. पहिले अंतरंग, म्हणजे अध्यात्मशास्त्राचा अभ्यास करणे. यामध्ये प्राचीन काळापासून दोन तर्‍हेने अभ्यास करण्याचा परिपाठ आहे. दुसरे बहिरंग मी याच दृष्टीने इतिहासाच्या चष्म्यातून हे नाव दिले आहे. पूर्वीचे काळी वेद हे सर्व राष्ट्राचे अस्मितेचे स्थान होते. यांत साहित्याचे सौंदर्य आणि चातुर्य यांचा समावेश होतो. इतिहासाच्या दृष्टीनेच आपल्याला वाङ्मयाचा विचार करावयाचा आहे. पूर्वी इतिहास आणि पुराण यांच्या साहाय्याने वेदांचे स्पष्टीकरण अन् रक्षण करण्याचे धोरण होते. आजच्याप्रमाणे दिनांकानुसार आणि तपशीलवार इतिहासाची पूर्वीच्या लोकांना मातब्बरी वाटत नव्हती; परंतु त्यांना इतिहासाची कल्पनाच नव्हती, असे म्हणणे चुकीचे होईल. अलीकडील इतिहासाची भिस्त समकालीन पुराव्यावर असते आणि हा पुरावा परिपूर्ण अन् योग्य कधीच नसतो. या इतिहासात तर्काला फारच प्राधान्य देण्यात येते, त्यामुळे बरेच दोष उद्भवतात. लेखकाने आपल्या बुद्धीच्या तर्कावर आधारलेला कार्यकारी संबंध पुष्कळ वेळेला चुकीचा ठरतो. समकालीन पुराव्याचे महत्त्व कितपत आहे, हे आता कळू लागले आहे. कार्यकारणभाव, स्थित्यंतरे इत्यादी गोष्टी आपल्या बुद्धीने आता उलगडण्याची जी सध्याची पद्धत आहे, ती फार अन्यायकारक आहे.

२. सध्या इतिहासाची करण्यात येणारी विकृती

नेपोलियनचा इतिहासकार अबॉट याने म्हटले आहे की, Historians treats on dangerous ground when he speaks of motives (इतिहासकार जेव्हा उद्देशांविषयी बोलतात, तेव्हा त्यांना धोकादायक पद्धतीची वागणूक मिळते.) गोल्ड स्टगरने म्हटल्याप्रमाणे ‘लेखक आपला संभवनीय तर्क म्हणून मांडतो आणि तोच पुढे सिद्धांत म्हणून समजला जातो. उदाहरणार्थ ‘ज्ञानेश्वर दर्शना’त सरदार मिरीकर यांनी ‘माहेश’ या शब्दासंबंधी एक संभवनीय कल्पना मांडली आणि पुढे तिला सिद्धांताचे स्वरूप देऊन विवेचन केले. ज्या वेळी संशोधक हेतूंचा आरोप करतो, त्या वेळेला चुकण्याची शक्यता फारच असते.’ गोल्ड स्टगर म्हणतो त्याप्रमाणे As if the personal feelings of prof. Weber has the weight of scientific reasoning. (जणू प्रा. विबर यांच्या वैयक्तिक भावनांना वैज्ञानिक तर्काचा आधार आहे.)

आणखी एक उदाहरण डॉ. पु.व. सहस्रबुद्धे यांचे आहे. ते म्हणतात, ‘‘आगरकरादी लेखकांचे कार्य विवेकनिष्ठ होते आणि ज्ञानेश्वरांचे श्रद्धानिष्ठ होते; पण असा भेद करावयाला आधार काय ?

ही गोष्ट त्यांनी विवेकपूर्ण केली नाही, असे कसे म्हणता येईल. या अशा विधानांत एक हेत्वाभास असतो. विवेकाची व्याख्या आपल्या मनासारखी करतात आणि त्या व्याख्येप्रमाणे ज्ञानेश्वर झाले नाहीत म्हणून ते विवेकहीन होते, असा तर्क करतात. ‘बंडखोरी करणारे ते विवेकनिष्ठ आणि इतर विवेकनिष्ठ नाहीत’, असे सोयीस्करपणे समजले जाते; कारण विवेक, म्हणजे कारण हाही बुद्धीच्या पूर्ण अनुभवावरच आधारलेला असतो. सरस्वती मंदिरात बेझंटबाई न जाता त्या बाहेरच्या पायरीवर बसून राहिल्या, तेव्हा त्यांना असे सांगण्यात आले, ‘तुम्हाला आत जाण्यास काहीच हरकत नाही.’ त्यांनी त्याला उत्तर देतांना असे सांगितले, ‘या मर्यादा तुम्ही मानल्या आहेत म्हणून मी त्या पाळीन.’ या वेळेला त्या बाईंनी ज्या विवेकाने सांगितले, त्याला विवेकहीन म्हणणे, म्हणजे अशा तर्‍हेने अलीकडे इतिहासाची विकृति करण्यात येते. या विकृत ऐतिहासिक दृष्टीमुळे फार अन्याय होतो आणि तसा अन्याय ज्ञानेश्वरादी संतांवरही झालेला आहे.’’

३. पाश्चात्त्य आणि पौर्वात्य देशांतील इतिहासाविषयीची भिन्नता

पाश्चात्त्य आणि पौर्वात्य देशांतील भिन्नता अशी आहे –

अ. पाश्चात्त्यांपेक्षा भारतीय इतिहास वास्तविक का होत नाही ? : पाश्चात्त्य इतिहास पुष्कळच अबाधित आणि विस्तृत आहे. पाश्चात्त्य देशांत इतिहासाचे जे लिखाण झाले आहे, ते आजतागायत जसेच्या तसेच सापडते. त्यांच्यात इतिहास लिहिण्याची हौस होती आणि अजूनही त्यांनी ती राखून ठेवली आहे; परंतु आपल्याकडे इतिहास लिहिण्याची पद्धत नव्हती. ग्रंथांच्या परंपरा तुटल्या आणि त्यांचा नाशही फार प्रमाणात झाला. उदाहरणार्थ ‘अगस्ति संहिते’ची १६ व्या शतकांतील प्रत सापडली आहे; परंतु इतर जुन्या प्रति नष्ट झाल्या आहेत. आपल्याकडील ग्रंथ संपत्तीचा अपार नाश झाला असल्याकारणाने इतिहास लिहितांना अनेक खिंडारे पडतात. डॉ. आंबेडकर यांनी ही गोष्ट मान्यही केली आहे आणि ती आपल्या कल्पनेने इतिहासकार भरून काढण्याचा प्रयत्न करतो. त्या वेळेला हा इतिहास वास्तविक होत नाही.

आ. पाश्चात्त्य आणि भारतीय समाजातील भेद : पाश्चात्त्य देशांचे समाज पुष्कळसे एकथरी आहेत; परंतु आपणाकडे अनेक थर असतात. पाश्चात्त्यांमध्ये मर्यादित काळ आणि प्रदेश घेतला, तर त्यात एकजिनसीपणा आढळून येतो; परंतु आपल्याकडे तसे नाही.

इ. पाश्चात्त्य इतिहासाचा आधुनिक भारतियांवर असलेला पगडा : पाश्चात्त्यांमध्ये सहिष्णुता फार अल्प आहे; परंतु आपल्याकडे सहिष्णुता आणि समन्वय फार दिसून येतो. त्यामुळे आपल्याकडे एकाच वेळी वेगवेगळे प्रकार दिसून येतात. पाश्चात्त्यांना कल्पना येत नाही की, वेगवेगळ्या कल्पना बाळगणारे एकत्र कसे राहू शकतात ? त्यांना ही कल्पना नसेल; कारण त्यांना भारताचा इतिहास ठाऊक नाही; परंतु हिंदु माणूस ही गोष्ट विसरतो, याचे नवल वाटते. उदाहरणार्थ विठ्ठल कवीच्या काव्यात श्रीचक्राचे वर्णन आले. यामुळे डॉ. कोलते यांना वाटले की, हा दुसराच कुणीतरी असला पाहिजे; परंतु ते ही गोष्ट विसरतात की, पांडुरंग भक्ती ही वैयक्तिक होती आणि श्रीचक्र उपासना ही परंपरेमुळे आलेली आहे. आपल्याकडे कुलदैवत आणि इष्टदैवत अशी दोन्ही दैवते एकाच व्यक्तीला असू शकतात. नवीन सुशिक्षित मनावर पाश्चात्त्य इतिहासाचा केवढा जबरदस्त पगडा बसला आहे, हे या उदाहरणावरून दिसून येते.

४. पाश्चात्त्यांनी भारतीय इतिहास विकृत आणि हिंदूंची अस्मिता नष्ट करण्यासाठी केलेले प्रयत्न

‘भारताचा इतिहास विकृत करण्याचा प्रयत्न पाश्चात्त्यांनी जाणुनबुजून केलेला आहे’, असे मला वाटते. ‘पाश्चात्त्य इतिहासकारांनी भारताची अस्मिता नष्ट करण्याचा कटच रचला होता’, असे सप्रमाण दाखवता येते. फ्रेंच राज्यक्रांतीच्या वेळी अँबे डुबाय हिंदुस्थानात आला होता. त्याने येथे २५ हून अधिक वर्षे राहून भारतीय लोकांसंबंधी माहिती मिळवली. त्या अनुभवाचे त्याने एक पुस्तक सिद्ध केले. त्यात त्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या, त्यात मुख्य अशी की, या लोकांवर ख्रिस्ती लोकांचे वजन पडणार नाही. ते नास्तिक होतील; पण ख्रिस्ती होणार नाहीत. मग त्याकरता एकच गोष्ट केली पाहिजे. तो म्हणतो, ‘‘We must begin by undermining their religion & polity very foundation of the society & we must give them new ideas and a new life.’’ (आपण त्यांचा धर्माचा पाया न्यून करून, तसेच त्यांना नवीन कल्पना आणि नवे जीवन देऊन आरंभ केला पाहिजे.) ही सर्व माहिती त्याने ईस्ट इंडिया कंपनीला विकली. कंपनीने ख्रिस्ती धर्माचे प्रसार कार्य करण्याकरता काही पगारी लोक नेमले. त्यापैकी मॅक्सम्युलर हा एक होता.

हिंदूंची अस्मिता नष्ट करता यावी; म्हणून त्यांनी एक युक्ती काढली. ती म्हणजे ‘पूर्वीचा आणि आजचा वैदिक धर्म वेगळा ! ब्राह्मण ग्रंथाचे लेखक यांनी वेदांचा अर्थ वेगळाच केलेला आहे; कारण ते वेदकालापासून फार दूर होते. ते लबाड किंवा अज्ञानी तरी होते. वेदांचा अर्थ लावण्याविषयी चालत आलेली परंपरा आम्ही मानणार नाही. कोषांच्या साहाय्याने आम्ही अर्थ लावू आणि आमचाच अर्थ योग्य आहे.’ मॅक्सम्युलरने अर्थ लावण्याची जी रित स्वीकारली, ती एका उदाहरणाने समजावून घेता येईल. बर्‍याच काळानंतर समर्थ रामदासस्वामींचे ‘मनाचे श्लोक’ सापडले. त्यातील ‘समाधान साधूचे नियोगे’, या ओळीचा अर्थ लावण्याचा विद्वान मंडळी प्रयत्न करत आहेत. ‘समाधान’ आणि ‘नियोग’ या शब्दांतून ‘नियोग अन् संतति उत्पन्न करणे’, असा शब्दकोषाच्या साहाय्याने गूढ अर्थ काढला आणि परंपरागत अर्थ खोटा ठरवला. जवळजवळ याच्यासारखीच स्थिति पाश्चात्त्यांनी वैदिक वाङ्मयाची केली आहे आणि पारतंत्र्यामुळे उत्पन्न झालेल्या न्यूनगंडातून समाजसुधारकांची चळवळ निघाली.

५. पाश्चात्त्य विचारसरणीप्रमाणे संत वाङ्मयावर चुकीचे आरोप करण्यात येणे

डॉ. केतकर म्हणतात, ‘‘इंग्रज ब्रिटिशांच्या नोकरवर्गाची ही चळवळ आहे. रानड्यांनी प्रार्थना समाज वाढवण्याकरता हीच युक्ती सुचवली. पुराणांमधील गोष्टींचा अर्थ स्वतःच्या सोयीचा लावून घेण्याकरताही हीच युक्ती सुचवली. उदाहरणार्थ नल-दमयंतीचे आख्यान पुनर्विवाहाला अनुकूल आहे. संत वाङ्मयावरही असे आरोप करण्यांत आले आहेत. ‘युरोपातील सुधारणांप्रमाणे (‘रिफर्मेशन’प्रमाणे) वारकरी संप्रदाय होता’, अशी चुकीची कल्पना या लोकांनी करून घेतली. युरोपची परिस्थिती महाराष्ट्रावर लादली. या सादृश्यातून अभ्यास करून भलत्याच कार्याचा आरोप केला. सुधारकांनी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर यांच्या काळातील घेतलेली पार्श्वभूमी हीच मुळी चुकीची आहे. महाराष्ट्रात युरोपासारखा उपाध्यांचा जुलूम नव्हता.’’ रेने म्हणतो, ‘‘Brahmin was not a priest in religious sense of the term.’’ (धार्मिक संज्ञेनुसार ब्राह्मण हे पुजारी नव्हेत.) उदाहरणार्थ सौ. शांताबाई भिडे म्हणतात, ‘‘संत ज्ञानेश्वर यांनी पंढरपूरच्या वाळवंटात चातुर्वर्णाला मूठमाती दिली. ‘ज्ञानेश्वरांनी म्हणे वेदांच्या विरुद्ध बंड केले’; पण वाङ्मयांत असा पुरावा कुठेच सापडत नाही. या युरोपीय पद्धतीच्या इतिहासामुळे सर्व संतांवर फार अन्याय झाला आहे. संतांचे कार्य सुधारणांचे नव्हते, पूर्वनिर्माणाचे (‘प्रिफर्मेशन’चे) होते. भलतेच कार्य संतांवर लादण्यात आले. आगरकर यांना मार्टीन लुथरची उपमा देतात; पण दोहोंमध्ये जमीन अस्मानाचा भेद आहे.’’

सौ. भिडे यांच्या भाषेत धर्माचे स्वरूप शुद्ध आणि शबल (मिश्र) असे दुहीत आहे; पण तिने असे कुठून काढले कोण जाणे. त्यांनी ज्ञानेश्वरी वाचली कि नाही ? अशी शंका येते. डॉ. कोलते यांनी तर स्पष्ट सांगितले आहे की, ‘विधीनिषेधाचे बंड फार होते’; पण त्याचा अर्थ असा होत नाही की, त्यांना ते नकोसे होते; कारण त्यांच्या वाङ्मयातच असे लिहिले आहे की, ‘भारतवर्षात सर्व थरांच्या लोकांना उपयोगी पडावी’, अशी ग्रंथरचना करावी लागत असे.’ ही गोष्ट लक्षात घेऊन वाङ्मयाचा अभ्यास करावयाला पाहिजे.’

– लेखक : अज्ञात (साभार : मासिक ‘प्रज्ञालोक’, ऑक्टोबर ते डिसेंबर २०२३)

संपादकीय भूमिका

पाश्चात्त्य देशांत इतिहास अबाधित राखण्यासाठी जे प्रयत्न होतात, त्याप्रमाणे भारतियांनी स्वदेशाचा इतिहास संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत !