दोघांच्या मातांची मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडे मागणी
मंगळुरू (कर्नाटक) – येथे वर्ष २०१५ मध्ये झालेल्या दंगलीत प्रशांत पुजारी आणि वर्ष २०१९ च्या दंगलीत दीपक राव यांच्या हत्या झाल्या होत्या. या दोन्ही प्रकरणांत अद्याप गुन्हेगारांना शिक्षा झालेली नाही. या संदर्भात प्रशांत यांची आई यशोदा पुजारी आणि दीपक राव यांची आई प्रेमा राव यांनी दक्षिण कन्नड जिल्हाधिकारी मुल्लई मुहीलन यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे. याद्वारे त्यांनी या प्रकरणांसाठी विशेष न्यायालय स्थापन करण्याची मागणी केली आहे.
गौरी लंकेश आणि कलबुर्गी हत्यांच्या प्रकरणी विशेष न्यायालयांची झाली आहे स्थापना !
या निवेदनात म्हटले आहे की, या दोन्ही प्रकरणांची चौकशी त्वरित होऊन अपराध्यांना शिक्षा होईल, याच्या प्रतीक्षेत होतो; परंतु न्यायालयीन सुनावणी आमच्या अनुमानानुसार शीघ्र गतीने झाली नाही. अलीकडे नियतकालिकांच्या माध्यमातून एक विषय लक्षात आला आहे की, गौरी लंकेश आणि कलबुर्गी यांच्या हत्यांच्या प्रकरणासाठी आपण (मुख्यमंत्री) विशेष न्यायालयाची स्थापना करून शीघ्र गतीने अपराध्यांना शिक्षा होईल, असा विश्वास दिला आहे, हे अत्यंत गौरवास्पद आहे. याच पद्धतीने आपण दीपक राव आणि प्रशांत पुजारी हत्या प्रकरणांची विशेष न्यायालयाच्या माध्यमातून चौकशी करून अपराध्यांना त्वरित शिक्षा देऊन माझ्या आमच्या मुलांना न्याय द्यावा, अशी विनंती आहे.