नागपूर, १९ डिसेंबर (वार्ता.) – नाशिकमधील मालेगाव येथील एम्.एस्.जी. महाविद्यालयात करिअर मार्गदर्शनाच्या नावाखाली हिंदु विद्यार्थ्यांना एका विशिष्ट धर्माची माहिती देऊन त्यांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी मागणी नाशिक येथील भाजपचे आमदार राहुल ढिकले यांनी १९ डिसेंबर या दिवशी विधानसभेत औचित्याच्या सूत्राद्वारे केली.
११ जून या दिवशी एम्.एस्.जी. महाविद्यालयात इयत्ता १० आणि १२ वी च्या हिंदु विद्यार्थ्यांना ‘करिअर’ मार्गदर्शनाच्या नावाखाली धर्मांतरासाठी प्रयत्न करण्यात आले. या वेळी मार्गदर्शनासाठी आलेल्या पुणे येथील ‘डिफेन करिअर इंस्टीट्यूट’चे अनिल गुट्टी यांनी मार्गदर्शन करतांना धार्मिक तेढ निर्माण होईल, असे वक्तव्य केले. केंद्रीय बाल हक्क आयोगाने या प्रकरणी अनिल गुट्टी यांना नोटीस पाठवली आहे. या प्रकाराच्या विरोधात २ जुलै या दिवशी हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला; परंतु या प्रकरणी अद्यापही कारवाई झालेली नसल्याची माहिती राहुल ढिकले यांनी विधानसभेत दिली.