जेजुरीच्या खंडोबा गडावर शंकराचार्यांच्या हस्ते घटस्थापना !

जेजुरी (जिल्हा पुणे) – जेजुरीच्या खंडोबा गडावर १३ डिसेंबर या दिवशी करवीर पिठाचे शंकराचार्य श्री नृसिंह भारती यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली. सनई चौघड्याच्या मंगलमय सुरात सकाळी साडेअकरा वाजता गडामधील नवरात्र महालात श्री खंडोबा म्हाळसादेवींच्या मूर्ती आणून वेदमंत्राच्या जयघोषात घटस्थापना करण्यात आली. वेदमूर्ती शशिकांत सेवेकरी आणि मंगेश खाडे यांनी कार्यक्रमाचे पौरोहित्य केले.

श्री खंडोबा मंदिरामध्ये उत्सवानिमित्त विविध धार्मिक विधी केले जात आहेत. प्रतिदिन वाघ्या मुरळी, गोंधळी स्थानिक कलावंत गडावर गाणी म्हणून उपस्थित असतात. पुजारी सेवक अन्नदान मंडळाकडून प्रतिदिन १० सहस्र भाविकांना विनामूल्य पंचपक्वान्नांचे भोजन देण्याची व्यवस्था केली आहे.

या वेळी श्री मार्तंड देवस्थानचे मुख्य विश्वस्त पोपटराव खोमणे, विश्वस्त मंगेश घोणे, पुजारी गणेश आगलावे, मल्हार बारभाई आदींनी मुख्य मंदिरातून उत्सव मूर्ती वाजत गाजत नवरात्र महालात आणल्या आणि तेथे सर्वांच्या हस्ते पूजा करण्यात आली.