अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अवेळी पडलेल्या पावसावरील चर्चेचा विरोधकांचा प्रस्ताव !

विरोधक सभागृहबाहेर आंदोलन करताना

नागपूर – विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभा आणि विधान परिषद या विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांत विरोधकांनी स्थगन प्रस्तावाद्वारे अवेळी पडलेल्या पावसामुळे झालेल्या हानीवर चर्चा करण्याची मागणी केली. विधीमंडळाच्या पुढील कामकाजात यावर चर्चा होणार असल्यामुळे दोन्ही सभागृहांत या विषयावर चर्चा नाकारण्यात आली.

७ डिसेंबर या ‘वन्दे मातरम्’ आणि त्यानंतर ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या महाराष्ट्र गीताने विधीमंडळाच्या कामकाजाला प्रारंभ झाला. दोन्ही सभागृहात अध्यादेश पटलावर ठेवण्यात आले. पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या. विधानसभेस अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी संजय शिरसाट, समीर कुणावार, चेतन तुपे आणि श्रीमती यशोमती ठाकूर यांची तालिका सभापती म्हणून निवड केली. विधान परिषदेत उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी निरंजन डावखरे, अनिकेत तटकरे, धीरज लिंगाडे आणि नरेंद्र दराडे या आमदारांची तालिका सभापती म्हणून निवड केली. यानंतर माजी राज्यमंत्री गोवर्धन शर्मा, माजी उपाध्यक्ष बबनराव ढाकणे, माजी सदस्य गुलाबराव पाटील, वसंतराव कार्लेकर, गोविंद शेंडे, दिगंबर विशे यांच्या निधनाविषयी शोकप्रस्ताव सादर करण्यात आला.