देहू, आळंदी आणि पंढरपूर येथे अत्याधुनिक बसस्थानके उभारण्याचा राज्यशासनाचा निर्णय !

पुणे – पुणे जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र देहू, आळंदी आणि पंढरपूर या परिसरांमध्ये निर्माण होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अत्याधुनिक बसस्थानक बांधण्यात येतील. स्वयंचलित जिना (रॅम्प) असलेले वाहनतळ उभारण्यात येईल, तसेच इलेक्ट्रिक वाहने घेऊन येणार्‍या भाविकांसाठी प्रभारणाची (चार्जिंगची) सुविधाही उपलब्ध केली जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. ते मंत्रालयामध्ये एका बैठकीच्या वेळी बोलत होते.

तीर्थक्षेत्र देहू, आळंदी आणि पंढरपूर येथे आषाढी, कार्तिकी वारी यांसह वर्षभर मोठ्या प्रमाणामध्ये भाविक दर्शनासाठी येत असतात. या ठिकाणी सुसज्ज वाहनतळाची व्यवस्था नाही. रस्त्याच्या कडेला वाहने लावली जातात. त्यामुळे नेहमीच वाहतूक कोंडी होत असते. येणार्‍या भाविकांना वाहतूककोंडीचा त्रास होऊ नये, याकरता पुरेशा वाहनतळाची व्यवस्था असणे आवश्यक आहे. एस्.टी. बसस्थानकांच्या इमारतीवर ‘रॅम्प’च्या सुविधेसह वाहनतळ उभारण्याचा प्रस्ताव सिद्ध करावा, अशा सूचनाही या वेळी अजित पवार यांनी केल्या.